एडिसनने जिवंत हत्तीणीला विजेचा झटका देऊन मारलं होतं का ? काय आहे या क्रूरतेमागची गोष्ट ?
१९०३ साली अमेरिकेत टॉप्सी नावाची हत्तीण इलेक्ट्रोक्युशन म्हणजे विजेचे शॉक देऊन जाहीररीत्या मारण्यात आली होती. या घटनेची ८४ सेकंदाची फिल्म कोनी आयलंडवर येणाऱ्या पर्यटकांना एडिसन कंपनीतर्फे पैसे घेऊन दाखवण्यात यायची. मुक्या प्राण्यांच्या छळाची ही फिल्म माणसं आनंदाने बघायची.
टॉप्सीला का मारण्यात आलं होतं ? खुद्द जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांनी तिला मारलं का ? आजच्या लेखात जाणून घेऊया.
टॉप्सीचा जन्म आग्नेय आशियातला. १८७५ च्या जवळपास अगदी लहान असताना तिला गुप्तपणे अमेरिकेला नेण्यात आलं. अमेरिकेत ती फॉरपॉफ सर्कस मध्ये दाखल झाली. यानंतर ती आयुष्यभर वेगवेगळ्या मालकांकडे स्थलांतरित होत राहिली. मालक बदलले तरी तिला सांभाळण्याची पद्धत बदलली नाही. भूतदया हा प्रकार त्याकाळी फारसा प्रचलित नव्हता. टॉप्सीला मिळालेली वागणूक वाईट होती. त्यामुळे ती रागीट होत गेली.
१९०३ च्या काळात ती अमेरिकेच्या कोनी आयलंडवरील लुना पार्क प्राणीसंग्रहालयात होती. तिला सांभाळणाऱ्या ३ जणांचा तिने जीव घेतला होता. त्यातल्या एकाने तर हद्दच केली होती. त्याने टॉप्सीला सिगारचे चटके दिले होते. टॉप्सीने रागावून त्याचा जीव घेतला होता. प्राणिसंग्रहालय या प्रकाराला कंटाळलं होतं. टॉप्सीपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी तिला फाशी देण्यात येणार होती. असं म्हणतात की याच दरम्यान एडिसन कंपनी एका प्रयोगासाठी प्राण्यांच्या शोधात होतं. लुना पार्क प्राणीसंग्रहालयाने या क्षणाचा फायदा घेत टॉप्सी एडिसन कंपनीकडे सुपूर्द केली.
प्राण्यांचा जीव घेणारा हा कोणता प्रयोग होता ?
(थॉमस एडिसन)
यासाठी आणखी एक गोष्ट जाणून घ्यावी लागेल. ती अशी की, तो काळ विजेचा वापर नुकताच सुरु झालेला काळ होता. विजेचा दिवा तयार करणारे एडिसन आणि जॉर्ज वेस्टिंगहाउस यांच्यात वीज युद्ध सुरु होतं. एडिसन महाशयांचं म्हणणं होतं की विजेचा ‘डायरेक्ट करंट’ (डीसी) हा प्रकार जास्त सुरक्षित आहे, तर जॉर्ज वेस्टिंगहाउस यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘अल्टरनेटिंग करंट’ (एसी) जास्त सुरक्षित होता.
(स्रोत)
एका मताप्रमाणे एडिसन यांनी आपलं मत कसं बरोबर आहे हे दाखवण्यासाठी अनेक प्राण्यांना विजेचे झटके देऊन प्रयोग केले. दुसऱ्या एका मताप्रमाणे कंपनी जरी एडिसन यांच्या नावाने असली तरी या प्राण्यांच्या आणि टॉप्सीच्या मृत्यूशी एडिसन यांचा प्रत्यक्ष संबंध नाही. काही इतिहासतज्ञ असंही म्हणतात की एसी सुरक्षित की डीसी हा वाद हत्तीच्या मृत्युच्या १० वर्षापूर्वीच संपला होता. ज्या शॉर्टफिल्ममध्ये टॉप्सीला मारताना दाखवलं आहे त्याच्या शेवटी एडिसन यांचं नाव दिलेलं असल्याने जगभर एडिसन यांचं नाव टॉप्सीशी जोडलं गेलं.
काही का असेना पण या सगळ्यात टॉप्सीचा जीव गेला हे मात्र खरं. ४ जानेवारी १९०३ रोजी १५०० प्रेक्षकांसमोर तिला ठेवण्यात आलं. आधी तिला विषारी अन्न देण्यात आलं. त्यानंतर तिच्या मागच्या आणि पुढच्या पायांना तांब्याच्या तारा लावण्यात आल्या. ‘अल्टरनेटिंग करंट’ (एसी)तिच्या पूर्ण शरीरातून जाईल याची पूर्ण खात्री करण्यात आली. त्यानंतर काय घडलं हे तुम्ही फिल्ममध्येच पाहा.
काळ बदलला पण प्राण्यांसोबत होणाऱ्या हिंसा कमी झालेल्या नाहीत. गेल्या वर्षी दिल्लीच्या एका तरुणाने कुत्र्याला गच्चीवरून फेकल्याची बातमी तुम्हाला आठवत असेलच ! गेल्या महिन्यात महाराष्ट्रात घडलेली घटना महत्त्वाची आहे. एका बैलाला JCB च्या सहाय्याने ठेचून मारण्यात आलं होतं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
प्राणीदया, भूतदया हा काहीवेळा चेष्टेचा विषय पण झालाय. क्रौर्याविरुद्ध कायदे १९५९ पासून आहेत पण या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. एक चांगली गोष्टही पाहायला मिळत आहे. सोशल मीडियामुळे अशा प्रकारांच्या विरोधात लोक बोलत आहेत. खास करून तरुण वर्ग या विरोधात ठामपणे उभा आहे.