computer

बॉलीवूडने प्रसिद्ध केलेली भारतातली १० ठिकाणं !!

भारतीय सिनेमात रोमॅन्स, ड्रामा, ट्रॅजेडीला जेवढं महत्त्व आहे,तेवढंच सिनेमा कसा दिसतो याला देखील आहे. सिनेमा चकचकीत दिसला की तो हिट ठरतो असं जुनं गणित होतं. त्यामुळेच तर सिनेमांचं चित्रीकरण करण्यासाठी खास लोकेशन्स ठरवली जायची. हिट सिनेमांनी आपल्या सोबत या ठिकाणांना पण प्रसिद्ध केलं. उदाहरणार्थ, थ्री इडियट्स सिनेमा. थ्री इडियट्स रिलीज झाल्यानंतर शेवटच्या दृश्यात दाखवलेला तलाव कुठे आहे आणि तिथे कसं जाता येईल याचं वेड आलं होतं. 

आज आम्ही हिंदी सिनेमाने प्रसिद्ध केलेल्या अशाच मोजक्या १० ठिकाणांची यादी आणली आहे. 

१. आमेर किल्ला

आमेर किल्ल्यात ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमाचा सुरुवातीचा भाग चित्रित करण्यात आला होता. त्यासोबत सलमान खानचा ‘वीर’, ‘बोलबच्चन’ आणि 'जोधा अकबर' हे सिनेमे देखील या किल्ल्यात चित्रित झाले आहेत.

२. आग्वादा किल्ला

दिल चाहता है सिनेमातला तो प्रसिद्ध किल्ल्यावरचा सीन गोव्यातल्या आग्वादा किल्ल्यावर चित्रित करण्यात आला होता. रंगीला, गोलमाल, हनिमून ट्रॅव्हेल्स या सिनेमाचं शुटींग देखील या किल्ल्यावर झालं आहे.

३. हिडींबा मंदिर, मनाली

डोंगरदऱ्या, जंगल या प्रकारच्या स्थळांसाठी मनाली हे नेहमीच प्रसिद्ध राहिलेलं आहे. राजेश खन्नाचा ‘आप की कसम’ आणि ऋषी कपूरचा ‘हीना’ या दोन्ही सिनेमांनी मनालीला प्रसिद्ध केलं. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘यह जवानी है दीवानी’ सिनेमाने पुन्हा एकदा मनालीला चर्चेत आणलं होतं. सिनेमातील एका दृश्यात मनालीचं ‘हिडींबा मंदिर’ दाखवण्यात आलं आहे. सिनेमामुळे या मंदिराला भेट देणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. 

हे सगळं असलं, तरी मनालीतलं हिडींबा मंदिर पाह्यलं की थेट रोजा सिनेमाच आठवतो, हो ना?

४. पांगोंग त्सो तलाव, लडाख

थ्री इडियट्स सिनेमातलं शेवटचं दृश्य याच ठिकाणी चित्रित करण्यात आलं होतं.  ड्रोनच्या आधारे घेण्यात आलेलं हे दृश्य इतकं अफलातून होतं की सिनेमामुळे या तलावाला भेट देणाऱ्यांची संख्या एका रात्रीत वाढली. या परिसरातच ‘दिल से’, ‘जब तक है जान’ या सिनेमांचं शूटिंग झालं आहे.

५. वाराणसी

तसं बघायला गेलं तर वाराणसीचे घाट हे फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. त्याला आणखी प्रसिद्ध करण्याचं काम रांझणा सिनेमाने केलं. या सिनेमाचा इंटरव्हाल आधीचा बराचसा भाग वाराणसीच्या घाटांच्या भोवती फिरतो.

६. हावडा ब्रिज

बॉलीवूडचे दादामुनी अशोक कुमार यांचा हावडा ब्रिज नावाचा चित्रपट देखील आलेला. याखेरीज अनेक हिंदी सिनेमांमध्ये हावडा ब्रिज दिसला आहे. बंगालचा उल्लेख आल्यावर हावडा ब्रिज दिसला नाही असं होतच नाही. विद्या बालनचा ‘कहानी’, रणवीर-अर्जुन कपूरचा ‘गुंडे’, आणि रणवीरचा ‘बर्फी’ सिनेमात पण हावडा ब्रिज दिसला होता.
 

७. सुवर्णमंदिर, अमृतसर

सिनेमात दिसलेलं सुवर्णमंदिर असा जर विचार केला तर ‘रब ने बना दी जोडी’ हा सिनेमा नक्कीच आठवतो. याखेरीज ‘रंग दे बसंती’ सिनेमा आठवल्याशिवाय राहत नाही. या सिनेमातलं गुरुग्रंथसाहिब मधल्या ओळी असलेलं ‘एक ओंकार’ गाणं प्रसिद्ध झालं होतं. 

नुकतंच आमीर खानच्या आगामी ‘लाल सिंग चढ्ढा’ सिनेमाचं चित्रीकरण सुवर्णमंदिर येथे पार पडलं.

८. मुन्नारच्या चहाच्या बागा, केरळ

मुन्नार येथील चहाच्या बागा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सिनेमानंतर अचानक प्रकाशझोतात आल्या. यापूर्वी या ठिकाणी निशब्द आणि ‘लाईफ ऑफ पाय’ सिनेमांच शुटींग झालं आहे.

९. उदयपुरचा महाल, राजस्थान

‘यह जवानी है दीवानी’, ‘रामलीला’ या दोन सिनेमांचं चित्रीकरण उदयपुरच्या महालात झालं आहे. याखेरीज १९८३ साली आलेल्या जेम्स बॉंड मालिकेतल्या ‘ऑक्टोपसी’ सिनेमात हा महाल दिसला होता.

१०. गुलमर्ग, काश्मीर

काश्मीरचं गुलमर्ग हे ठिकाण बॉलीवूडचं लाडकं राहिलेलं आहे. अनेक गाणी, दृश्य या भागात चित्रित झाली आहेत. ये जवानी है दिवानी, हायवे, रॉकस्टार आणि हैदर या सिनेमांतल्या कथानकाचा मोठा भाग हा गुलमर्गच्या परिसरात घडतो. 

याखेरीज एक अपवादात्मक ठिकाण म्हणजे वाईचा घाट. आजकाल बऱ्याचशा सिनेमांमध्ये आपण जो उत्तर भारतातला प्रदेश बघतो तो खरं तर आपल्या महाराष्ट्रातल्या वाईचा घाट असतो.

 

तर मंडळी, ही होती बॉलीवूडने प्रसिद्ध केलेली भारतातली मोजकी १० ठिकाणं. तुम्हाला आणखी ठिकाणं आठवत असतील तर नक्की सुचवा.

सबस्क्राईब करा

* indicates required