एकाचवेळी ९३००० सैनिकांना शरण आणण्याऱ्या भारतीय लष्कराची ही १२ वैशिष्ट्ये माहित असायलाच हवीत!!
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी
रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या, प्राणांस घेऊनी हाती
तुमच्यास्तव अमुची लक्ष्मी, तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी, झुरतात अंतरे कोटी
सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी
आज १५ जानेवारी भारतीय लष्कर दिन. सियाचीनच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत, कच्छच्या रणरणत्या उन्हात ते आसाम बंगालच्या सीमेपर्यंत दिवसरात्र भारताचे संरक्षण करणाऱ्या लष्कराचा आज विशेष दिवस आहे. १९४९ साली १५ जानेवारी रोजी जनरल के एम कारीअप्पा यांची लष्कराच्या प्रमुखपदी नियुक्त झाली होती. तेव्हा पासून हा दिवस भारतीय लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो.
आज यानिमित्ताने बोभाटा तुम्हाला भारतीय लष्कराची १२ वैशिष्ट्ये सांगणार आहे.
१. भारतात जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी आहे. ही युद्धभूमी म्हणजे सियाचीन. सियाचीन हे समुद्रसपाटीपासून तब्बल १८००० फुट उंच आहे.
२. शत्रूने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करण्याचा एक जागतिक विक्रम आहे. १९७१ च्या युद्धात तब्बल ९३००० पाकिस्तानी सैनिकांनी एकाचवेळी भारतीय सैन्यापुढे शस्त्रं ठेवली होती. परिणामतः पुढचा हिंसाचार टळला.
३. भारतीय सैन्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे भारतीय सैन्यात असलेल्या प्रत्येक सैनिकांने स्वतःहून सैन्याची नोकरी पत्करली आहे.
इतर देशांमध्ये असतो तसा वेळ प्रसंगी सक्तीची सैन्यभरतीचा कायदा भारतातही आहे, पण आजवर त्याची कधीच गरज पडली नाही. अमेरिकेने व्हियेतनाम युद्धाच्यावेळी अशी सक्तीची सैन्य भरती केली होती. त्यामुळे अमेरिकेची एक संपूर्ण पिढी वाया गेली.
४. भारतीय लष्कर हे उंचावरील आणि पर्वतीय भागातील युद्धासाठी जगातलं क्रमांक एकचं सैन्य समजलं जातं.
अत्यंत उंचीवरील युद्धासाठी सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सैन्यदल हे भारतीय सैन्यदल आहे. हे सिद्ध करणारं एक उदाहरण वाचूया. अमेरिकेला जेव्हा तालिबानी दहशतवाद्यांना मारण्यासाठी अफगाणिस्तानात मोहीम आखायची होती तेव्हा अमेरिकेने आपले सैनिक प्रशिक्षणासाठी भारतात पाठवले होते. याखेरीज इंग्लंड आणि रशियन सैनिक भारतात प्रशिक्षणासाठी येत असतात.
५. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने गोरखा रेजिमेंट ताब्यात घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.
हिटलरने म्हटलं होतं की त्याच्या हातात जर गोरखा रेजिमेंट असती तर त्याने संपूर्ण युरोप जिंकला असता. त्याला विश्वास होता की गोरखा रेजिमेंट हे जगातील एकमेव असं सैन्यदल आहे जे जर्मन फौजांचा सामना करू शकतं आणि त्यांना रोखू शकतं. हिटलरच्या दुर्दैवाने गोरखा रेजिमेंट त्याकाळी ब्रिटीशांच्या नेतृत्वात लढली होती.
६. भारतीय सैन्याकडून अमेरिका, इंग्लंड आणि रशियन सैन्याला देहरादूनच्या भारतीय सैन्य अकादमी मधून आणि मिझोरमच्या काउंटर इन्सर्जन्सी आणि जंगल वॉरफेअर स्कूल येथून प्रशिक्षण दिलं जातं.
७. भारतीय सैन्यातील नोकरीचं वैशिष्ट्य म्हणजे इतर सरकारी नोकऱ्यांप्रमाणे सैन्यातील नोकरीसाठी जातीवर आधारित आरक्षण पद्धत अस्तित्वात नाही.
८. भारतीय लष्कराने कधीही देशांतर्गत लष्करी युद्ध केलेलं नाही, तसेच इतर कोणत्याही देशावर पहिला हल्ला केलेला नाही. हाही एक विक्रमच म्हणावा लागेल.
९ राष्ट्रपतींचं सुरक्षादल हे भारतीय सैन्यातील सर्वात जुनं रेजिमेंट आहे. या रेजिमेंटची स्थापना १७७३ साली झाली. राष्ट्रपतींना सुरक्षा देण्यासाठी त्यांना खास पॅराट्रूपर्सकडून प्रशिक्षण मिळतं.
१०. भारतीय सैन्याकडे २०० पेक्षा जास्त वर्ष जुनं घोडदळ आहे.
या घोदडळाला ‘पूना हॉर्स रेजिमेंट’ म्हणतात. १९४८ सालातील हैद्रबादवरील कारवाई आणि १९६५ व १९७१ च्या भारत पाक युद्धात पुना हॉर्स रेजिमेंटने भाग घेतला होता. जगातल्या ३ शेवटच्या घोदडळात भारतीय घोदडळाचा समावेश होतो. कच्छच्या रणात (वाळवंटात) भारत पाक सीमेवरती खास ‘उंटदळ’ पण आहे.
११. २०१३ साली उत्तराखंडच्या पुराच्या वेळी भारतीय सैन्याने एक नवीन इतिहास रचला होता. पुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्याचे दिवसरात्र प्रयत्न चालू होते. हे बचाव कार्य जगातल्या सर्वात मोठ्या बचाव कार्यापैकी एक होतं.
१२. भारतीय सैन्याने लडाखमध्ये बांधलेला ‘बेली ब्रिज’ हा जगातील सर्वात उंचावरील पूल आहे. १९८२ साली द्रास आणि सुरू या नद्यांच्या मध्ये ‘बेली ब्रिज’ बांधण्यात आला आहे.
आजच्या भारतीय लष्कर दिनी बोभाटाचा भारतीय लष्कराला सलाम.