computer

'कोरोनाव्हायरस'च्या भीतीमुळे लोकांच्या आयुष्यात काय बदल झालाय पाहा !!

सर्दी, पडसं सारखे आजारही एकमेकांच्या संपर्कात येऊनच पसरतात, पण हा कोरोनाव्हायरस आहे भाऊ. कोरोनाव्हायरस पासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर खूपच काळजी घ्यावी लागेल. संसर्गजन्य आजार होऊ नये म्हणून ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्या आता काटेकोर पद्धतीने कराव्या लागतील. म्हणूनच जगभरात लोकांच्या रोजच्या जीवनातील लहानलहान गोष्टींमध्ये बदल झालाय. जसे की, काही देशांमध्ये हात मिळवण्यावर बंदी आली आहे, तर काही देशांमध्ये गालावर चुंबन घेऊन स्वागत करण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. असे एक ना अनेक देश आहेत.

चला तर पाहूया कोणत्या देशात काय बदल झालेत.

चीन

कोरोनाव्हायरसचं उगमस्थान असलेल्या चीनमध्ये ठिकठिकाणी होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. होर्डिंगवर लिहिलंय की एकमेकांशी हात मिळवू नका. त्याऐवजी पारंपारिक ‘गोंग शु’ पद्धतीने एकमेकांना अभिवादन करा. गोंग शु पद्धतीत एका हाताची मुठ दुसऱ्या हाताच्या तळव्यावर ठेवून अभिवादन केलं जातं.

फ्रान्स

फ्रान्समध्ये अभिवादन करताना गालावर हलकेच चुंबन घेतलं जातं. तुम्ही जर पहिल्यांदाच भेटत असाल तरी याचप्रकारे अभिवादन केलं जातं. कोरोनाव्हायरसमुळे फ्रेंच लोकांना आपल्या सवयीवर लगाम लावावा लागत आहे. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये रोजच संसर्ग होऊ नये म्हणून काय करावं याची यादी दिली जाते.

ब्राझील

ब्राझीलच्या आरोग्य विभागाने लोकांना सल्ला दिला आहे की त्यांनी इतरांनी वापरलेले स्टीलचे स्ट्रॉ वापरू नये. त्याचं असं आहे की ब्राझीलमध्ये चीमारो नावाचं पेय प्रसिद्ध आहे. हे पेय स्टीलच्या स्ट्रॉ ने प्यायलं जातं. बरेचदा एका व्यक्तीने वापरलेला स्ट्रॉ दुसरा व्यक्ती वापरतो.

आश्चर्य म्हणजे ब्राझीलमध्ये हात मिळवणे, मिठी मारणे याला पर्याय म्हणून  गालावर चुंबन देण्याला प्रोत्साहन दिलं जात आहे.

स्पेन

स्पेनमध्ये इस्टरच्या वेळी व्हर्जिन मेरीच्या पुतळ्याच्या हाताचं किंवा पायाचं चुंबन घेण्याची परंपरा आहे. कोरोनाव्हायरसमुळे या जुन्या परंपरेवर बंदी येऊ शकते. 

रोमेनिया

रोमेनियात लवकरच वसंत ऋतू  सुरु होणार आहे. वसंत ऋतूत स्त्री पुरुष एकमेकांना गंडेदोरे आणि फुले  देतात. रोमेनियाच्या सरकारने म्हटलंय की एकमेकांना फुले आणि दोरे द्या पण सोबत चुंबन देऊ नका.

पोलंड

पोलंडमध्ये विशेषतः कॅथलिक ख्रिश्चन लोक राहतात. जुन्या परंपरेनुसार लोक एकत्र येऊन एकत्रच तयार केलेला ब्रेड खातात. कोरोनाव्हायरसच्या भीतीमुळे ब्रेड न खाता तो फक्त हातात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याखेरीज चर्चमध्ये गेल्यावर पाण्यात हात बुडवू नये असाही सल्ला देण्यात आला आहे.

इराण

चीन खालोखाल इराणला कोरोनाव्हायरसचा सर्वात जास्त फटका बसला आहे. हा लेख लिहित असताना इराणमध्ये ६६ लोकांचा जीव गेला होता. इराणी लोकांनी संसर्ग होऊ नये म्हणून अभिवादानाची एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. इराणी लोक चक्क एकमेकांच्या पायांना पाय लावत आहेत. हीच पद्धत लेबनॉनमध्ये पोहोचली आहे.

न्यूझीलंड

न्यूझीलंडमध्ये अभिवादानासाठी दोन माणसं एकत्रितपणे एकमेकांचं नाक दाबतात. याला माओरी म्हटलं जातं. सध्या या पद्धतीवर बंदी घालण्यात आली आहे. 

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियामध्ये एकमेकांना भेटताना सहजच हात पुढे केला जातो. ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य मंत्र्यांनी असा सल्ला दिला आहे, की हात मिळवण्यापेक्षा लोकांनी एकमेकांची पाठ थोपटावी. आणि हो चुंबन घेताना सावधगिरी बाळगा.

युएई

युनायटेड अरब एमिरेट्समध्ये एकमेकांच्या नाकाला स्पर्श करून अभिवादन करण्याची पद्धत आहे. युएई च्या सरकारने म्हटलंय की लोकांनी एकमेकांना हात हलवून अभिवादन करावं.

हे झालं  जगभरातलं. आता जाणून घेऊया कोरोनाव्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून काय करावं.

१. लोकांशी जवळचा संबंध टाळा. विशेषतः आजारी व्यक्तींना स्पर्श करणे टाळा.

२. वेळोवेळी हात स्वच्छ धुवा.

३. पुरेसं पाणी प्या.

४. क जीवनसत्व घ्या. संत्री आणि लिंबातून क जीवनसत्व मोठ्याप्रमाणात मिळतं, तसेच गाजर, सफरचंद, अननस आणि भाजांमध्ये कोबी, पालक, कांदे यामधूनही क जीवनसत्व मुबलक प्रमाणात मिळतं.

५. पुरेसा व्यायाम करून रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवा.

६. जर तुम्हाला ताप, खोकला आहे आणि श्वसनास त्रास होतोय तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे कोरोनाव्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. हवेतून तो श्वसनावाटे आपल्या शरीरात जातो. ज्याला संसर्ग झाला आहे अशा व्यक्तीच्या खोकल्यातून, शिंकेतून तो पसरू शकतो. म्हणून योग्य ती काळजी घ्या.

सबस्क्राईब करा

* indicates required