computer

एका पोस्टमनच्या खुनातून उलगडला अंडरवर्ल्डमधला गुन्हा!! पण अशा पद्धतीचा पोस्टमनचा हा एकमेव खून नव्हता??

(प्रातिनिधिक फोटो)

मुंबईसारख्या महानगरात खून, खूनाचे प्रयत्न असे गुन्हे रोजच घडत असतात.  जुनी दुष्मनी, पैशाची लेनदेन, फिसकटलेले व्यवहार, प्रेमप्रकरणं, नशेत असताना झालेली बाचाबाची अशी याची एक नाही, अनंत कारणे असतात. बऱ्याच वेळी एखाद्याला मारून टाकणे हा उद्देशही नसतो, पण कोणाच्या तरी हातून हत्या घडते.

पण १९९४ च्या सप्टेंबर महिन्याच्या एका रविवारी संतोष पाटोळे नावाच्या २८ वर्षाच्या तरुणाची गोळ्या घालून झालेली हत्या म्हणजे ठरवून, योजना आखून, हत्येच्या उद्देशानेच केलेले कारस्थान होते. बरं, ज्याची हत्या झाली तो तरुण उद्योगपती, राजकारणी, सेलेब्रिटी, असा काहीच नव्हता. तो सहार विमानतळाच्या पोस्ट ऑफीसध्ये काम करणारा एक पोस्टमन होता. पोस्टमन म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो तो खाकी कपड्यातला, खांद्यावर पत्रांची झोळी घेऊन उन्हातान्हात, पावसात फिरणारा आणि वर्षानुवर्षं दिवाळीला आठवणीने पोस्ट घेणारा असा सर्व सामान्य माणूस! अशा माणसाची हत्या, आणि ती पण धंदेवाईक मारेकऱ्यांच्या हस्ते गोळ्या झाडून व्हावी याचे पोलिसांना नवलच वाटत होते.

पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा हे प्रकरण काही वेगळेच आहे असा अनुभव त्यांना आला. संतोष पोस्टमन होता खरा, पण त्याचे राहणीमान जर वेगळेच होते. तो भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होता. त्याच्यासोबत त्याची एक बारडान्सर गर्लफ्रेंड राहत होती. त्याच्याकडे स्वतःची कार होती. त्याच्या नावावर असलेल्या पोस्टल कॉलनीतल्या क्वार्टरमध्ये त्याची आई आणि भावंडं राहत होती. थोडक्यात तो नावालाच पोस्टमन होता. सुरुवातीला संशयाची सुई त्याच्या बारडान्सर मैत्रिणीकडे गेली. बारडान्सर वरून झालेल्या अशा अनेक घटना मुंबईत झाल्या आहेत. तपास केल्यावर असे काही प्रकरण नसावे याची पोलिसांना खात्री पटली. म्हणजे प्रश्न पुन्हा अनुत्तरीतच राहिला. 

पोस्टमनची गोळ्या झाडून हत्या व्हावी याचे रहस्य काही केल्या उलगडेना!

(अनिस इब्राहीम)

पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या राहणीमानाचा खोल विचार केला. त्याचा एकूण खर्च पोस्टमनच्या पगारात बसेल असा नव्हता. तो कर्ज काढून चैन करत नव्हता. मग इतके पैसे त्याच्या हातात आले कसे? याचा अर्थ असा होता की त्याचा काहीतरी 'साइड बिझिनेस' होता. साइड बिझिनेस म्हणावा, तर त्याची काहीच कागदपत्रे घरात मिळाली नाहीत. इतका विचार केल्यावर पोलिसांच्या लक्षात आले की 'साइड बिझिनेस' कागदावर न लिहिण्यासारखा म्हणजेच दोन नंबरचा असावा. त्यानंतर पुन्हा पोलिसांचा मोहरा त्याच्या ऑफिसकडे वळला.  पण त्याच दरम्यान एका खबरीने टीप दिली की "सर,वो संतोष पोस्टमन को अबू सालेमने टपकाया हैं." ...आणि एक धक्का देणारे वास्तव समोर आले. हा पोस्टमन चक्क दाऊद इब्राहिमचा भाऊ- अनिस इब्राहीमच्या टोळीसोबत काम करत होता.

अनिस इब्राहीम, आफताब बटकी आणि अबू सालेम यांचा ‘हवालाचा’ धंदा त्याकाळी जोरात होता. ही टोळी डॉलर, पाऊंड, दिऱ्हॅम हे परकीय चलन पोस्टाच्या माध्यमातून मुंबईला पाठवत असत. ही बाहेरून आलेली पाकिटे फॉरेन पोस्ट ऑफिस विमानतळावरून ताब्यात घेत असे आणि ती जीपीओकडे (जनरल पोस्ट ऑफिस) रवाना करत असे. जीपीओमध्ये कस्टम  विभागाचे एक छोटेसे ऑफिस आहे. बाहेरून आलेल्या टपालांचे परीक्षण करून त्या टपालात काही आक्षेपार्ह नाही ना याची खात्री करून ते पोस्टमनकडे पाठवले जायचे.     

(अबू सालेम)

संतोष पाटोळेकडे ही विमानतळावरून जीपीओपर्यंत टपाल नेण्याची जबाबदारी होती. दाऊद गँग दुबईमधून लाखो रुपयांचे परकीय चलन पोस्टाने मुंबईत पाठवत असे. संतोष पाटोळे ही पाकिटे उघडून त्यातील परकीय चलन काढून दाऊद कंपनीच्या भारतातल्या गँग मेंबरच्या ताब्यात देत असे. या कामात त्याचे आई,भाऊ हे सर्वच गुंतलेले होते. अशारीतीने पाकीट रिकामे केल्यावर त्यात निरुपयोगी कागद भरून संतोष ही पाकिटे कस्टमच्या हवाली करत असे. पोस्टाचे पाकीट छोटे असले तरी परकीय चलनाची चळत लाखो रुपये किमतीची असायची. दर महिन्यात करोडो रुपयाची उलाढाल अशा पद्धतीने व्हायची आणि संतोष पाटोळेला हे काम केल्याबद्दल भरघोस मोबदला मिळायचा. दरम्यानच्या काळात संतोष पाटोळेची हाव वाढली. त्याने थेट परकीय चलनावर हात मारायला सुरुवात केली. दुबईमध्ये बसलेल्या भाई लोकांना जेव्हा हिशोबात तफावत होत असल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी संतोष पाटोळेकडे चौकशी करायला सुरुवात केली. संतोष पाटोळेने मात्र कानावर हात ठेवला. पण त्याला हे माहित नव्हते की भाई लोकांच्या वर्तुळात ‘चुकीला माफी नसते’.

त्यानंतर पोलिसांना संतोष पाटोळेकडून चलनाची पाकिटे उचलणाऱ्या चार गँग मेम्बर्सची नावं कळाली. नबी शेख, अबित, अझिझ आणि मोहम्मद इसाक शेख अशी नावे असलेले हे चौघे संतोष पाटोळेच्या खुनानंतर दिसेनासे झाले होते. अशारितीने नाहीशा झालेल्या गुन्हेगारांचा तपास ताबडतोब लागत नाही. कित्येक महिने त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर पाळत ठेवणे, खबरींचा पाठपुरावा करत राहणे हा एकच उपाय पोलिसांकडे शिल्लक राहातो. तसेच या केसमध्ये घडले.

नबी शेखचे मुंबईतल्या एका विवाहित महिलेशी गुप्त प्रेमसंबंध होते अशी पोलीसांना खबर मिळाली. त्या महिलेच्या घरावर पाळत ठेवून सापळा रचण्यात आला आणि नबी शेख त्यात अडकला. पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर नबी घडाघडा बोलायला लागला. परकीय चलनाच्या हिशोबातूनच संतोष पाटोळेची हत्या झाल्याचे त्याने कबूल केले. त्याला मारण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल दुबईच्या भाई लोकांनी पुरवले होते. सगळे आरोपी हळूहळू पोलिसांच्या ताब्यात आले. आरोपींच्या जबान्या आणि पुरावे हातात आल्यावर पोलिसांनी कामगिरी संपली असे म्हणून ‘हुश्श’ केले. तेवढ्यात एक नवीन प्रकरण त्यातून बाहेर आले आणि पोलीसांना एक नवा धक्का बसला. दुबई गँगने हत्या केलेला संतोष पाटोळे हा एकमेव पोस्टमन नव्हता, तर त्याच्या अगोदर आणखी एका पोस्टमनला- म्हणजे रवी नारायण पाधी याला अशाच पद्धतीने संपवण्यात आले होते.

रवी नारायण पाधीचं प्रकरण काय होतं?

त्याची हत्या संतोष पाटोळेपूर्वी म्हणजे जानेवारी १९८४ साली झाली होती. पण ती हत्या उघडकीस आली नाही. कारण पाधीला मारल्यानंतर त्याचा चेहरा ॲसिड ओतून विद्रूप केला गेला होता. त्याच्या अंगावर कोणतीही चीजवस्तू शिल्लक ठेवली नव्हती. त्यामुळे एक बेवारस प्रेत म्हणून त्याची नोंद केली गेली.

यानंतर सर्व आरोपींवरती खटला भरण्यात आला.  पण त्याकाळी दाऊद गँगचा असा दरारा होता की ऐनवेळी कोर्टात सर्व साक्षीदार उलटले आणि जज जे. डब्ल्यू. सिंग यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हे तेच जज जे. डब्ल्यू. सिंग आहेत ज्यांच्यावर दाऊद गँगला फितूर असल्यामुळे मोक्का कायद्याखाली आरोपपत्र दाखल झाले होते. काही काळाने तेही निर्दोष म्हणून बाहेर पडले. या पाठोपाठ रवी नारायण पाधीच्या खटल्यामध्ये देखील सगळे आरोपी निर्दोष सुटले. 

खुनाचा तपास करणे आणि तो कोर्टात सिद्ध करणे यामध्ये खूप तफावत असते, हा अनुभव पोलिसांना वारंवार येतो. तपास हा फक्त २०% भाग असतो. कागदपत्राद्वारे भक्कम केस उभी करणे, चांगला सरकारी वकील मिळवणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे साक्षीदार उलटू नये याची खात्री करणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.  तरच आरोपी गजाआड जातो. नाहीतर फिरोज कोकणीसारखा २१ खून करणारा मारेकरीसुद्धा समाजात मिरवत राहतो.

सबस्क्राईब करा

* indicates required