ऑपरेशन डार्क हार्वेस्टने उघडकीस आणले रासायनिक प्रयोग आणि त्याला बळी पडलेलं एक बेट! पण कसे आणि कुठे??
१९८१ सालची ही गोष्ट आहे. ब्रिटनमध्यल्या काही वृत्तपत्रांना 'ऑपरेशन डार्क हार्वेस्ट' नावाच्या एका गुप्त संघटनेकडून काही पत्रे आली. पत्राचा सर्वसाधारण मजकूर असा होता की ब्रिटिश सरकारने दुसर्या महायुध्दाच्या काळात एका छोट्या बेटावर काही जैविक रसायनांचे प्रयोग केल्याने आजही ते बेट सजीवांनी वस्ती करण्यासारखे राहिलेले नाही. सरकारने हे विष तेथल्या वातावरणात कालवून ठेवले आहे. म्हणून ते बेट माणसांना राहण्यायोग्य करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने ही मोहीम ताबडतोब हाती घ्यावी. आमच्या संघटनेचे कार्यकर्त्यांनी (ज्यामध्ये दोन शास्त्रज्ञांचा समावेश आहे) याआधीच त्या बेटाला भेट देऊन तिथली १५० किलो माती गोळा करून आणलेली आहे. सरकारने ही बेट शुद्धीकरणाची मोहीम गांभीर्याने घ्यावी, अन्यथा ही दूषित माती अनेक सार्वजनीक ठिकाणी पसरवण्यात येईल. थोडक्यात, होणार्या परिणामांची जबाबदारी सरकारची असेल अशी गर्भित धमकी या पत्रांमध्ये होती.
ही पत्रे आली, त्याच दिवशी एका लखोट्यातून काही माती पोर्टन डाऊन इथल्या ब्रिटिश लष्कराच्या प्रयोगशाळेत येऊन थडकली. या मातीची तपासणी केल्यावर असे आढळून आले की त्या मातीत अत्यंत जीवघेण्या अँथ्रॅक्स जंतूंचे बिजाणू होते. काहीच दिवसांत सत्ताधारी पक्षाचे संमेलन जिथे आयोजित करण्यात आले होते, तेथेही अशाच एक पाकीटातून माती पाठवण्यात आली. या मातीत जीवाणू नव्हते, पण माती त्याच बेटावरून आणली होती यात काहीही शंका नव्हती. या घटनेनंतर ऑपरेशन डार्क हार्वेस्टच्या पत्राची गंभीर दखल घेणे सरकारला भाग पडले. पुढे काय झाले हे वाचण्यापूर्वी ते बेट कोणते? कोणते प्रयोग त्या बेटावर करण्यात आले होते? ऑपरेशन डार्क हार्वेस्ट काय होते? पोर्ट डाऊन येथे ब्रिटिश सरकार काय करत होते? या प्रश्नांची उत्तरे तर जाणून घेऊया!!
त्या पत्रात ज्या बेटाचा उल्लेख होता ते बेट आहे ग्रीनयार्ड आयलंड- Gruinard Island. स्कॉटलंड आयलंडच्या जवळ असलेल्या या बेटाचे क्षेत्रफळ जेमतेम २ चौरस किमीचे आहे. हे बेट जरी ब्रिटिश अंमलाखाली असले तरी या बेटाची मालकी एका ऑस्ट्रेलियन कुटुंबाकडे होती. १९२० पासून हे बेट पूर्णतः निर्जन होते. १९८१ सालच्या जनगणनेप्रमाणे बेटावरची लोकसंख्या फक्त ८ होती.
आता वाचूया 'ऑपरेशन डार्क हार्वेस्ट'बद्दल. खरंतर या गुप्त संस्थेबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. पण सुशिक्षित आणि पर्यावरणप्रेमी लोकांचा हा क्रांतीकारी समूह असल्याचे मानले जाते. ग्रीनयार्ड बेटावर जाऊन त्यांनी दूषित माती गोळा केली होती हे सत्य असावे. काहीजणांच्या मते ही माती प्रिन्स विल्यमच्या म्हणजेच केटकाकूंचा नवरा आणि प्रिन्स चार्ल्स-प्रिन्सेस डायना यांचा मुलगा याच्या अंगावर उधळण्याचाही त्यांचा डाव होता. पण यांच्या पत्रांमुळे आणि मातीच्या पुराव्यांमुळे ब्रिटिश सरकारला ताबडतोब कारवाई करावी लागली हे नक्की!!
आता ही माती पोर्टन डाऊनला पाठवण्याचे काय प्रयोजन होते हे जाणून घेऊ या!! पोर्टन डाऊन सॅलीसबरी जवळ आहे. १९१६ साली या ठिकाणी लष्कराच्या अनेक अस्त्रांची चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली होती. त्या काळात म्हणजे पहिल्या महायुध्दादरम्यान इथे क्लोरीन, मस्टार्ड, फॉसीजीन अशा विषारी वायूंची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर ही प्रयोगशाळा जवळजवळ गुंडाळण्यात आली. पण दुसर्या महायुध्दात इथली प्रयोगशाळा पुन्हा कार्यरत करण्यात आली. जर्मनीचा पराभव झाल्यावर जर्मनीच्या अनेक घातक शस्त्रांचा साठा ताब्यात आल्यावर हे लक्षात आले की जर्मनी प्रमुख्याने मज्जा-चेतासंस्थांना गारद करणार्या विषारी रसायनांवर काम करीत होती. तेच तंत्र वापरून ब्रिटिशांनी VX नावाचे घातक रसायन बनवले. तरीही या प्रयोगशाळेचे कार्यक्रम रसायनांपुरतेच मर्यादित होते. नंतरच्या काळात रासायनिक शस्त्रांची जागा जैविक शस्त्रांनी घेतली. याच जैविक अस्त्रांची चाचणी करण्यासाठी ग्रीनयार्ड बेटाचा वापर करण्यात आला होता. याखेरीज अनेक अमानुष प्रयोगही पोर्टन डाऊनतर्फे करण्यात आले होते, पण त्याविषयी नंतर कधीतरी सांगूच.
आता आपण वाचू या की नक्की काय घडले होते या बेटावर!!
ब्रिटनची गणना जरी विश्वातल्या अग्रगण्य देशांमध्ये होत असली तरी भौगोलीकदृष्ट्या आकारमानाने ब्रिटन हा छोटासाच देश आहे. त्यामुळे अमेरिका आणि रशियासारख्या चाचण्या करणे त्यांना थोडे कठीण जाते. त्यामुळे पोर्टन डाऊन येथे अँथ्रॅक्सची निर्मिती केल्यावर चाचणीसाठी ग्रीनयार्ड बेटाची निवड करण्यात आली. एकतर ते निर्मनुष्य बेट होते आणि खाजगी मालकीचे असल्यामुळे सरकारला ते ताब्यात घेणे फारसे कठीण गेले नाही.
१९४२ साली जागतिक युध्दाची धामधूम चालू असताना ब्रिटिश सराकारला अँथ्रॅक्स जंतूंचा मारा करून जर्मनीला हरवावे या कल्पनेचा पाठपुरावा करावासा वाटला. हे काम अर्थातच पोर्टन डाऊन येथल्या प्रयोगशाळेवर सोपवण्यात आले. सुरुवातीला हे बेट काही काळासाठी म्हणून सरकारने ताब्यात घेतले. पोर्टन डाऊनच्या टीममध्ये एकूण पन्नास जणांचा समावेश होता. कल्पना अशी होती की बाँबद्वारे अँथ्रॅक्स जंतू असलेल्या गोळ्यांचा स्फोट घडवून आणायचा आणि त्याचे परिणाम तपासायचे. या टीमचे नेतृत्व ऑलीव्हर सटन (वातावरण तज्ञ) यांच्याकडे होते. डेव्हीड हँडर्सन यांच्याकडे बाँबस्फोट घडवून आणण्याची जबाबदारी देण्यात आली. प्रत्यक्ष चाचणीसाठी ८० मेंढ्यांचा कळप या बेटावरील कुरणात सोडण्यात आला. या कुरणाजवळ अँथ्रॅक्सचे बिजाणू असलेले बाँब फोडण्यात आले. अपेक्षेप्रमाणे वातावरण जंतूंनी भरून गेले आणि काही दिवसांतच या मेंढ्या अँथ्रॅक्स जंतूंना बळी पडल्या.
या प्रयोगाचे चित्रीकरणही करण्यात आले होते. हा प्रयोग सफल झाला. पण त्याचा युध्दात उपयोग होण्याआधीच युध्द संपले. पोर्टन डाऊनचे लोक बेटाला विसरून गेले, पण बेट मनुष्य वस्तीसाठी कायमचे नालायक झाले होते. पुढची पन्नास वर्षे या बेटावर अँथ्रॅक्स जंतूंचे राज्य होते. या बेटावर हे बेट धोकादायक असल्याचे बोर्ड लावण्यात आले होते. पण हे दूषित बेट पुन्हा एकदा मनुष्यप्राण्यासाठी योग्य बनवण्यात सरकारने पुढाकारच घेतला नाही. हे बेट क्वारंटाईनमध्येच राहिले. या दरम्यान ज्याच्या मालकीचे बेट होते ते पुन्हा ताबा मागायला सरकारकडे गेले, पण असे विषारी वारसा असलेले बेट ताब्यात कसे देणार हे लक्षात आल्यावर सरकारने मालकाला पैसे देऊन एक करार केला. त्या करारानुसार बेट जेव्हा वस्तीयोग्य होईल, तेव्हा फक्त ५०० पौंडात मालकाला ते बेट पुन्हा विकत घेता येईल.
१९४५ नंतर १९८१ साली 'ऑपरेशन डार्क हार्वेस्ट' ने धमकावल्यावर बेटाचे निर्जंतूकीकरण करण्याची कारवाई सुरु झाली. १९८८ साली २८० टन फॉर्माल्डेहाईड या बेटावर शिंपडण्यात आले. अखेरीस १९९० साली म्हणजे प्रयोगानंतर जवळजवळ ५० वर्षांनी क्वारंटाईन उठवण्यात आले. त्यानंतर कराराप्रमाणे ५०० पौंड देऊन मूळ मालकाने त्या बेटाचा ताबा घेतला.
लक्षात घ्या, १९४२ साली केलेला हा प्रयोग जर फसला असता तर? वाहत्या वार्याने अँथ्रॅक्स लंडनपर्यंतही पोहचू शकले असते! असे झाले नाही हा केवळ नशिबाचा भाग! पण सत्तेसाठी स्पर्धेत असलेले देश काय करू शकतात याचा हा नमुना होता. एरवी नैतिकतेचे झेंडे मिरवणारे देश बुरख्याआड काय करतात हे सांगणे हा आमच्या या लेखाचा उद्देश होता.
जाता जाता : अँथ्रॅक्सच्या निर्जंतुकीकरणाचे काम ज्या शास्त्रज्ञाला दिले होते त्याचे नाव डेव्हीड केली या शास्त्रज्ञला अशाच एका जैविक अस्त्रांच्या प्रकरणात काही लपवाछपवी केल्याच्या आरोपाला सामोरे जावे लागले होते. त्या प्रकरणाचा अंत मात्र डेव्हीड केलीच्या आत्महत्येत झाला. ही स्टोरी नंतर कधीतरी आम्ही सांगूच, पण तुम्ही आज ग्रीनयार्ड बेटावर काय घडले याची चित्रफीत बघायला विसरु नका!!