काय म्हणता, जगभरात असलेले पांडा चीनने भाडेतत्वावर दिले आहेत?
पांडा हा जाम गोंडस प्राणी आहे. पांडाचे वेगवेगळे व्हिडिओ, मीम्स सतत कुणी ना कुणी शेअर करत असतंच. आज जगभरात २१ देशांमध्ये पांडा आढळून येतात. पण तुम्हांला माहित आहे का पांडा हा प्राणी मूळचा चीनमधला आहे आणि आज जगभरात दिसणारे सगळे पांडा चक्क भाडेतत्वावर देण्यात आलेत? काय म्हणता, तुम्हाला हे माहित नव्हतं? चला तर पूर्ण माहिती वाचूया.
२०१९ च्या अहवालानुसार आज जगातल्या २१ देशांत केवळ २७ प्राणीसंग्रहालयांमध्येच पांडा हा प्राणी पाहण्यास मिळतो. चीन आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयांसोबत एक करार करतं. या करारानुसार काही वर्षांसाठी प्राणीसंग्रहालयाला आपल्या संग्रहात पांडाची जोडी ठेवता येते. एकदा का या जोडप्याने मुलांना जन्म दिला की त्यांना परत चीनला पाठवण्यात येतं.
पांडाला भाड्यावर देण्याचं एक कारण असं की या पद्धतीने पांडाची संख्या वाढवण्यात येते. ज्या प्राणीसंग्रहालयात पांडा ठेवलेले असतात तिथे त्यांची चांगली काळजीही घेतली जाते. दुसरं कारण असंही आहे की या सगळ्या प्रकरणात चीनच्या तिजोरीत पैसा जमा होतो. अमेरिकन प्राणीसंग्रहालय यासाठी प्रत्येक वर्षी १० लाख डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम मोजतात.
बहुतेक प्राणीसंग्रहालये पांडांसाठी १० वर्षांचा करार करतात. करारानुसार जोडप्याने मुलाला जन्म दिल्यानंतर प्राणीसंग्रहालयाला ‘बेबी टॅक्स’ भरावा लागतो. हा टॅक्स तब्बल ४ लाख डॉलर्स एवढा असतो.
अनेक वर्षांपासून चीन पांडाचा उपयोग राजकारणासाठी करत आलं आहे. याला ‘पांडा डिप्लोमसी’ म्हणतात. याचा इतिहास चीनच्या तांग राजवंशापर्यंत मागे जातो. सर्वात नवीन उदाहरण म्हणजे ५ जून २०१९ साली जेव्हा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग रशिया भेटीला गेले होते तेव्हा त्यांनी रशियाला पांडाची जोडी भेट दिली होती. या भेटीला त्यांनी आदर आणि विश्वासाचं प्रतिक म्हटलं होतं. भेट असली तरी हे पांडा १५ वर्षांसाठी भाडेतत्वावर रशियाकडे राहतील.
तर मंडळी, कशी वाटली ही माहिती? तुमचं मत नक्की सांगा.