computer

पाणघोड्याच्या घामातून रक्त बाहेर पडतं? खरं काय आणि खोटं काय?

आपल्या शरीरातून बाहेर पडणारा घाम हा आपल्या शरीराचं तापमान संतुलित ठेवण्याचं काम करत असतो. घाम बाहेर आल्यानंतर त्याचं बाष्पीभवन होतं आणि शरीर थंड राहतं. हे फक्त मानवाच्या बाबतीत घडतं असं नाही. बहुतेक प्राण्यांमध्ये घामाच्या ग्रंथी असतात.

हिप्पोपोटॅमस म्हणजे पाणघोड्याच्या बाबती असा समज होता की पाणघोडा घामावाटे रक्त बाहेर काढतो. वैज्ञानिकांनीही या गोष्टीवर विश्वास ठेवला होता, पण या मागचं तथ्य वेगळंच होतं. चला तर जाणून घेऊया.

घामासाठी पाणघोड्याच्या शरीरात खास ग्रंथी असतात. या ग्रंथींचा आकार सामन्यापेक्षा मोठा असतो. त्या त्वचेवर सगळीकडे असतात. त्यातून निघणारा घाम हा लाल किंवा गुलाबी रंगाचा असतो. हा स्त्राव दिसायला रक्तासारखा असला तरी त्यात रक्ताचा टिपूसही नसतो. पाणघोड्याच्या घामात आणि आपल्या घामात तसे खूप फरक आहेत, पण एक मुख्य फरक असा की या घामाचं बाष्पीभवन होतं नाही.

पाणघोड्याच्या शरीरातून निघणारा घाम दोन काम करतो. पहिलं काम तर शरीराचं तापमान राखणे आणि दुसरं काम म्हणजे शरीरासाठी औषध म्हणून काम करणे. संसर्गजन्य विषाणूंपासून रक्षण करण्याचं काम हा स्त्राव करत असतो. जास्त खोलात जायचं झालं तर या घामाला दोन रंग असतात. नारंगी आणि लाल. हे रंग म्हणजे खरं तर आम्लीय संयुगे असतात. दोन्ही रंगाच्या घामामुळे संसर्ग रोखला जातो, पण खास करून लाल रंगामुळे अतिनील किरणांपासून पाणघोड्याचं संरक्षण होतं. एकूणच या घामाला सनस्क्रीन म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

तर मंडळी, निसर्गात अशी अनेक आश्चर्ये आहेत. ती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच राहू. तूर्तास हा लेख आवडला का ते नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required