computer

भडका उडून स्त्रियांना पेटवणाऱ्या स्टोव्हने भारतात आणखी काय करामती घडवल्या माहित आहेत?

गॅसची टाकी संपली आहे? नवी टाकी यायला अजून दोन दिवस लागतील? अशावेळी आपल्या मदतीला धावून येतो माळ्यावर उचलून ठेवलेला फरफर्‍या स्टोव्ह! आता फक्त केरोसीनची व्यवस्था झाली की काम चालू! अगदी घरचा माणूस अडचणीच्या वेळी जसा मदतीला येतो, असा मदतीला येणारा हा फरफर्‍या स्टोव्ह चक्क परदेशी पाहुणा आहे हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे हा ब्रिटिशांनी भारतात आणलेला स्टोव्ह आहे का? तर त्यांनी आणला खरा, पण तो ब्रिटिशांचाही पाहुणा आहे. हा स्टोव्ह फारफार दूरवरून म्हणजे स्वीडनमधून आलेला आहे आणि गेली सव्वाशे वर्षं आपल्या किचनमध्ये राज्य करतोय. आज पाहू या स्टोव्हची कहाणी आणि आपल्या आयुष्याशी कसा जोडला गेला आहे.

(लिंडक्वीस्ट)

१८९२ साली स्वीडनची राजधानी स्टॉकहोम इथे लिंडक्वीस्ट आणि स्वेन्सन या जोडगोळीने हा स्टोव्ह बनवला. या अगोदरचे सगळे स्टोव्ह वातीचे होते. त्यात केरोसीन अर्धवट जळायचे त्यामुळे भांड्यांना काजळी(सूट) धरायची. म्हणून हा 'सूटलेस' स्टोव्ह थोड्याच कालावधीत अत्यंत लोकप्रिय झाला. 'ब्लो टॉर्च' ची ही सुधारीत आवृत्ती होती. या स्टोव्हच्या बर्नरचे डिझाइन हा त्या नव्या संशोधनाचा आत्मा होता. हा पहिलाच स्टोव्ह म्हणून संशोधकांनी त्याला 'प्रायमस' हे नाव दिले. सव्वाशे वर्षं होऊन गेली, पण आजही या डिझाइनमध्ये बदल झालेला नाही.  एकच बदल यात केला गेला, तो ही बर्नरच्या बाहेर. या स्टोव्हमध्ये सायलेन्सर टाकला गेला. पण त्याचाही वापर फारच मर्यादित व्हायचा. 

तसं या स्टोव्हचं मूळ नाव पेरॅफीन स्टोव्ह. कारण आपल्या रॉकेल किंवा केरोसीनला स्वीडन आणि युरोपात पॅरॅफीन म्हणतात. या स्टोव्हची घडण अत्यंत उत्कृष्ट असते. केवळ या कारणाने कँप स्टोव्ह म्हणून सफरीवर जाताना अनेक लोक हा स्टोव्ह सोबत घ्यायचे. अ‍ॅमुन्सेनच्या दक्षिण ध्रुवाच्या सफरीत आणि हिलरी-तेनसिंग यांच्या सोबत एव्हरेस्टच्या मोहीमेत हाच स्टोव्ह वापरला गेला होता. आजही ही कंपनी हे स्टोव्ह बनवते. फरक इतकाच आहे की आधी फक्त केरोसीनवर चालणारे हे स्टोव्ह आता गॅसवरही चालतात.

हा स्टोव्ह काम करतो कसा हे समजून घेण्यासाठी आधी त्याची रचना म्हणजेच स्ट्रक्चर समजून घेऊ या. 

या स्टोव्हमध्ये अर्थातच एक टाकी असते आणि तिला हवा मारण्यासाठी एक पंप जोडलेला असतो. टाकीतून बर्नरपर्यंत केरोसीन म्हणजेच रॉकेल पोहचते. प्रेशर शून्य किंवा कमी करण्यासाठी एक व्हॉल्व. आणि या सगळ्याच्या डोक्यावर बर्नर आणि निप्पल! पण यात एक गोम अशी होती की जेव्हा निपलमधून केरोसीन बाहेर येते तेव्हा त्याची ताबडतोब वाफ व्हायला हवी म्हणून आधी त्याचे तापमान वाढवण्यासाठी बर्नर गरम करावा लागायचा. जेव्हा ते तापमान तयार व्हायचे तेव्हा निळी ज्योत तयार व्हायची. निळी ज्योत म्हणजे वर आलेले रॉकेल १०० टक्के जळत असल्याची पावती. 

आता तुम्ही नक्की म्हणाल की हे सगळे आम्हाला वर्षानुवर्षं माहितीच आहे, ते का पुन्हा आम्हाला सांगताय? सांगतो, त्याचेही कारण सांगतो. आपल्या समाज जीवनात हा स्टोव्ह फक्त एक वस्तू म्हणून नव्हे, तर वर्षानुवर्षं गरीबीचा आणि अगतिकतेचे प्रमाण म्हणून जोडला गेला आहे. या स्टोव्हसोबत राजकारण, घरगुती हिंसा, काळाबाजार सगळं काही जोडलेलं आहे.

डुप्लिकेट प्रायमस!!

आपल्या देशात हे स्टोव्ह लोकप्रिय झाले तेव्हा त्याच्या डिझाइनच्या कॉप्या तयार झाल्या. सुरुवातीला 'प्रभात' सारखे तोडीसतोड स्टोव्ह भारतीय बाजारात आले. लोकप्रियही झाले. पण महायुध्दाच्या काळानंतर तांबे-पितळ भयंकर महाग झाले आणि उत्पादकांनी पितळेसारखा दिसणारा, पण हलका धातू वापरायला सुरुवात केली. टाकी, बर्नर, निपल बनवण्यात हलका धातू वापरला गेल्याने बरेचदा टा़की फुटायची. काही वेळा बर्नर फाटायचे. स्टोव्हचा भडका उडायचा. आपल्या देशात स्त्रियांचा पोशाख घोळदार म्हणजे साडीचा पदर, ओढणी असा असल्याने अनेक महिलांचा बळी या 'प्रायमस' सारख्या दिसणार्‍या डुप्लीकेट स्टोव्हमुळे गेला आहे. त्याखेरीज अनेक महिलांच्या हत्येसाठी आणि आत्महत्येसाठीपण असे आगीचे भडके जबाबदार आहेत असा डेटा उपलब्ध आहे. 

जळित आणि घरगुती हिंसा!

उदाहरणादाखल आपण फक्त दिल्लीतल्या लोकनायक जयप्रकाश हॉस्पीटलचा डेटा पाहू.

जानेवारी १९९३ ते डिसेंबर २००० म्हणजे आठ वर्षांत एकूण ११,१९६ जळिताची प्रकरणे झाली. त्यापैकी ३५.३१ जळिताचे अपघात सदोष स्टोव्हच्या भडक्याने झाले होते. या सर्व घटनांमध्ये शरीर जळण्याचे प्रमाण ६६ ते ७६ टक्के होते. याला बर्न पर्सेंटेज म्हणतात. इतक्या मोठ्या प्रमाणाच्या बर्न पर्सेंटेजमध्ये जीव वाचणे कठीण असते. या घटनांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त होते. बाकी अपघात हॉटेलच्या भटारखान्यातले होते. महिला अशिक्षीत असल्याने प्रेशरचा अंदाज न येणे, टाकीचे वेल्डींग शिवणीवर फाटणे, सिंथेटिक कपडे, त्यामुळे ढगळ कपडे घालणार्‍या महिलांच्या अंगावर जळते रॉकेल फेकले जाऊन भाजण्याचे प्रमाणही जास्त होते. हे फक्त भारतात होत होते असे नाही, तर बर्‍याच विकसनशील देशातल्या महिलांचे हे भोग आहेत.

विमा घोटाळे आणि स्वयंपाकघरातला स्टोव्ह!

मध्यंतरीच्या काळात भारतातील अनेक राज्यांत महिलांच्या हत्येसाठी या कारणांचा उपयोग सर्रास व्हायला लागल्यावर सरकारने या प्रकरणांची गंभीर दखल घेतली. केवळ विम्याचे पैसे मिळावे म्हणूनही या स्टोव्हचा हत्यारासारखा वापर व्हायला लागल्यावर भारतीय आयुर्विमा महामंडळाने अशिक्षित, तरुण, न कमावणार्‍या महिलांच्या विम्यावर काही निर्बंध घातले होते. त्यामुळे जळितांचे प्रमाण घटले. हे झाले या सदोष स्टोव्हमुळे. पण नाव खराब झाले प्रायमसचे!!

काळाबाजार, निळं रॉकेल आणि स्पिरिट

भारतातील गरीब जनता केरोसीनच वापरते. त्यामुळे केरोसीनचे भाव अत्यंत कमी ठेवावे लागतात हा सरकारचा नाईलाज आहे. पण त्यामुळे कॉपी मारणार्‍या सदोष स्टोव्ह उत्पादकांचे चांगलेच फावते. इंडियन स्टँडर्ड इंस्टिट्यूटने याचे मापदंड बनवले आहेत. पण उत्पादक आणि वापरकर्ते हे दोन्ही त्याकडे दुर्लक्ष करतात. रॉकेल स्वस्त असल्याने रेशन दुकानात रॉकेल बाजारभावाच्या अर्ध्या किमतीत मिळते. त्यामुळे त्याचा काळाबाजारही जोरात चालतो. रेशनच्या रॉकेलचा रंग निळा करण्याची गरज त्यातूनच सरकारला भासली. पण काळाबाजार अव्याहत चालूच असतो.

सुरुवातीला बर्नर गरम करण्यासाठी स्पिरिटचा वापर करण्याची पध्दत होती. इथे पण एक सामाजिक अडचण उभी राहिली. दारुचे व्यसन असलेले लोक ते स्पिरिट प्यायला वापरू लागले. सरकारने त्यासाठी स्पिरिट लायसन्स घेणे अनिवार्य केले, पण पिणार्‍यांना या अडचणी फार महत्वाच्या नव्हत्या. त्यांनी पॉलीश करण्यासाठी वापरायचे डी-नेचर्ड स्पिरिट प्यायला सुरुवात केली.

थोडक्यात सांगायचे झाले तर विकसनशील देशांतल्या बर्‍याच समस्या एका स्टोव्हसोबत जोडल्या गेल्या. एका स्टोव्हसोबत आपले सामाजिक जीवन कसे जोडले गेले आहे हे सांगण्याचा हा आमचा खटाटोप होता. तुम्हाला या लेखात काय आवडले ते नक्की कमेंटमध्ये सांगा!!!

सबस्क्राईब करा

* indicates required