भाऊ हे गेम्स खेळत आपण मोठे झालो, यातले कोणते गेम्स आता पुन्हा खेळाल ??
काय मंडळी, कसा चाललाय लॉकडाऊन? आता काही ठिकाणी निर्बंध शिथिल होत आहेत, पण म्हणून लगेच आधीसारखं सगळं सुरुही होणार नाहीय. आता तर कंटाळ्याचासुद्धा कंटाळा आला असेल. म्हणूनच तो कंटाळा घालवायला आम्ही घेऊन आलोय काही सुपरडुपर रेट्रो गेम्स!
आता तुम्ही विचाराल, हे काय प्रकरण? जरी पहिला व्हिडिओ गेम १९५८ साली आला असला तरी कॉम्प्युटर गेम्सचा उत्कर्ष साधारणतः ८०च्या दशकात झाला. गेमचे ग्राफिक्स, संगीत, कल्पना ह्यामध्ये विलक्षण बदल घडून आला. म्हणजे हे गेम्स आजच्या गेम्सचे जणू बापच म्हणा ना! हे गेम्स अजूनही आपल्याला का खिळवून ठेवतात? कारण हे गेम्स आपल्याला ह्या जगातून एका वेगळ्या जगात सहजतेने घेऊन जातात. त्यामुळे रेट्रो गेमिंगची ही क्रेझ अजूनही टिकून आहे. म्हणूनच नेटवर फ्री उपलब्ध असलेल्या गेम्सच्या लिंक्स आम्ही देत आहोत. पण जे गेम्स उपलब्ध नाहीत ते डाउनलोड करण्यासाठी वेबसाइट्स आहेत. अशाच काही अफलातून रेट्रो गेम्सची माहिती आपण घेऊया!
१. टेट्रिस (Tetris):
कमीत कमी ग्राफिक्स असूनही भयंकर चॅलेन्जिंग असणारा हा गेम जगातील सर्वोत्तम गेम्सपैकी एक मानला जातो. वेगवेगळे तुकडे विविध ठिकाणी लावून ओळी पूर्ण करणे आणि पॉईंट्स मिळवणे हे दिसतं तितकं सोपं नाही भाऊ! जसजशी लेव्हल वाढते, तसतसा तुकडे पडण्याचा वेग अजून वाढत जातो. हा गेम अलेक्सी पाजितनोव्ह या रशियन माणसाने तयार केला. आजही हा खेळ वेगवेगळ्या रूपांमध्ये खेळायला मिळतो. हा खेळ एवढा लोकप्रिय झाला की २०१० पासून 'क्लासिक टेट्रिस वर्ल्ड चॅम्पिअनशिप' ला सुरुवात झाली. आणि गेली १० वर्ष ह्या स्पर्धेचा थरार रंगत आला आहे. आतापर्यंतचा ह्या गेममधला हायस्कोअर ९,९९,९९९ एवढा आहे!! तसंच कोणताही खेळाडू २९व्या लेव्हलच्या पुढे जाऊ शकलेला नाही, कारण ते मानवी क्षमतेच्या बाहेर आहे. तरीही तुम्ही ट्राय करून बघू शकता!!
२. सुपर मारिओ (Super Mario):
व्हिडिओ गेम्सच्या जगातलं आणखीन एक मोठं नाव. आज असा जवळपास एकही माणूस नसेल ज्याला मारिओ माहित नाही. हा पहिला व्हिडिओ गेम आहे ज्याची मालिका(series) निघाली आणि जगभर प्रचंड गाजली. अनेक अडथळे चुकवत स्कोअर वाढवत वेगवेगळ्या जगांमध्ये असलेल्या लेव्हल्स पार करणे हे ह्या गेमचं उद्दिष्ट. १९८५ साली ह्या खेळाचा पहिला भाग निघाला. या गेमचे फीचर्स आणि कंट्रोल्स एवढे चांगले होते की त्याचे तब्बल २१ भाग निघाले आणि अजूनही निघतच आहेत!!!
३. वुल्फेनस्टाईन ३डी (Wolfenstein 3D)
हा गेम १९९३ साली बाजारात आला आणि पहिल्या महिन्यातच या गेमने १,००,००० लाख डॉलर्स कमावले!! या वरूनच हा गेम किती प्रसिद्ध होता हे सांगणं अवघड नाही! या गेमला चक्क '३d शूटिंग गेम्सचा आजोबा' ह्या नावाने ओळखलं जातं! ही कथा आहे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली आणि ह्या गेमचा हिरो आहे 'विल्यम बी.जे ब्लाझकोविझ', USA चा गुप्तहेर!! जर्मनीच्या एका बंकरमध्ये चालू असलेल्या गुप्त हालचालींबद्दलची माहिती काढताना पकडला गेलेला हा कमांडो कसा तुरुंगातून बाहेर पडतो आणि कसा नाझी भस्मासुर हिटलरला जाऊन भिडतो याची ही कथा. वाटेमध्ये अनेक सैनिक, कुत्रे आणि भयंकर असे बॉस भेटतात. तसंच भरपूर खजिना, गुप्त खोल्यासुद्धा असतात. बघूया तुम्ही महाबलाढ्य हिटलरपर्यंत पोहोचता का? तसाच ह्या गेमचे Spear Of Destiny, Castle Wolfenstein हे भाग ही खेळून बघा!!
४. जेझबॉल (Jezzball):
मंडळी, दिसतं तसं नसतं ही म्हण या गेमच्या बाबतीत अगदी चपखल लागू पडते. हा खेळ दिसायला खूप सोपा असला तरी तो भयंकर आव्हानात्मक होऊ शकतो. आपल्याला फक्त दिलेल्या जागेच्या ७५% जागा व्यापायची असते. त्यासाठी माऊस क्लिकने आपल्याला वॉल्स तयार करायच्या असतात. पण इथे अडथळा आहे तो म्हणजे वेगाने इकडेतिकडे आदळणाऱ्या चेंडूंचा. खेळाची सुरुवात फक्त दोन चेंडूंनी होते आणि ती संख्या नंतर ५० पर्यंत वाढते! आतापर्यंत ह्या खेळामधला उच्चांक आहे १९,५६,२५३!! बघा जमतंय का!
५. रोड रॅश (Road rash):
हा खेळ १९९४ चा बेस्ट रेसिंग गेम ठरला होता. त्याचा कारण म्हणजे उत्तम ग्राफिक्स, संगीत आणि गेममधला थरार. अमेरिकेतल्या ५ मार्गांवर आपल्याला रेसिंगचा आनंद लुटता येतो. यामध्ये आपल्याला काही कॅरेक्टर्सपण निवडता येतात. काही जणांकडे जास्त पैसे, कोणाकडे जास्त चांगल्या बाइक्स, तर काही जणांकडे शस्त्रं असतात. जर आपण ५ ही मार्गांवर रेस जिंकलो, तर आपली लेव्हल वाढते आणि रेससुद्धा कठीण होते. आपल्याला पकडायला पोलीस मागे असतातच. रेस जिंकल्यावर पैसे मिळतातच. आता त्या पैशांनी नवीन बाईक विकत घ्यायची की पोलिसांकडे दंड भरून ते वाया घालवायचे हे तुम्ही बघायचं! ऑनलाईन असल्यास आपल्या मित्रांबरोबरसुद्धा हा गेम खेळता येतो. ह्या गेमची बरीच व्हर्जन्स आहेत, पण त्यातील ३२ बिट्सचं व्हर्जन सगळ्यात बेस्ट आहे. सो लेट्स स्टार्ट!
हे गेम्स खेळताना तुम्हांला अर्थातच नॉस्टॅल्जिक व्हायला तर होईलच, पण मजाही येईल. बाकी हे गेम्स तर खेळाच, पण या व्यतिरिक्त आणखी कोणते तुमचे आवडते गेम्स होते ते ही कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा.
लेखक : प्रथमेश बिवलकर