आयुर्वेद पावसाळ्यातल्या आहाराबद्दल काय म्हणतो?

उन्हाळ्यात शरीरातला रस आणि स्नेह शोषला जातो. यामुळे जाठराग्नी मंद होऊन वातासारखे दोष वाढतात. या वाढलेल्या दोषांमुळे अग्नी अधिकच मंद होतो. अशावेळी प्रयत्नाने योग्य आहार-विहारांद्वारे अग्नीची शक्ती वाढवावी लागते.

 

त्यासाठी आयुर्वेदिक ग्रंथांनुसार काय कराल पावसाळ्यात – 

-आहारामध्ये योग्य प्रमाणात मधाचा वापर करा.

-या काळात शरीरातला वायू खूप वाढत असल्याने आहारात आंबट, खारट आणि स्निग्ध पदार्थ घ्या.

-जेवणात जुनी धान्ये वापरा आणि चांगला रस्सा बनवून त्यासह योग्य मसाल्यांनी सुसंस्कृत केलेले मांस खा.

-या दिवसांत मध मिसळून मोहाचे किंवा औषधी मद्य प्या.

-पावसाळ्यात पाणी उकळून आणि गाळूनच प्या.

-कोरड्या आणि खरखरीत कापडाने अंग रगडून घ्या.

-कोरडे, सुगंधित आणि स्निग्ध औषधी चूर्ण अंगाला उटण्याप्रमाणे चोळून अंघोळ करा.

-सुवासिक फुलांच्या माळा वापरा.

 -स्वच्छ, तलम कपडे घाला.

-ओलसरपणा किंवा दमटपणा नसलेल्या जागी निवास करा.

 

हे झाले काय करावे याबद्दल. याबरोबरच काय टाळावे याचेही मार्गदर्शन आपले ग्रंथ करतात

-पावसाळ्यात दिवसा झोपू नका.

- शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता पावसाळ्यात पाणी पिऊ नका.

-अति व्यायाम करणे टाळा.

-फार उन्हात बसू नका.

-अति स्त्रीसहवासाचा त्याग करा.

पावसाळ्यात, अशाप्रकारे वाढलेल्या दोषांचे शमन करणारा आणि अग्नी, म्हणजे पर्यायाने भूक वाढवणारा आहार-विहार करून आपली शक्ती टिकवून ठेवावी.

सबस्क्राईब करा

* indicates required