अणुबाँबमुळे बेचिराख झालेल्या हिरोशिमाने कशी भरारी घेतली याची गोष्ट?
"लिटल बॉय"पश्चात हिरोशिमा
तो अणुबॉम्ब आजच्या काळाच्या तुलनेत खूपच मर्यादित विध्वंसक होता. तरीही, पोलाद ज्या तापमानाला वितळते त्याच्यापेक्षा दुप्पट तापमानात आपल्या आगीच्या लोळांत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची राख करण्याची त्याच्यामध्ये क्षमता होती. जोडीला या लिटल बॉयच्या प्रभावामुळे आलेला झंझावात भारताच्या दोन्ही किनारपट्ट्यांना अलीकडेच तडाखे देणाऱ्या चक्रीवादळाच्या वाऱ्यांच्या दहापटींहूनही अधिक होता. त्यामुळे मर्यादित क्षेत्रात संपूर्ण विनाश करण्याची ताकद त्याच्या स्फोटामध्ये होती...
आणि झालेही तसेच. "लिटल बॉय" नावाच्या त्या बॉम्बने हिरोशिमा शहर अक्षरशः होत्याचे नव्हते करून टाकले. जपान टाइम्स दैनिकाने दिलेल्या आकडेवारीनुसार या अणुस्फोटाने त्या दिवशीच ६६,००० जणांचे बळी घेतले आणि ६९,००० जणांना जखमी केले. पुढील चार महिन्यांत ही जीवितहानी १,४०,०००च्या घरात गेली. म्हणजे त्यावेळच्या हिरोशिमाच्या निम्म्या लोकसंख्येची जीवनरेखाच या एका युद्धखोर कृतीतून पुसली गेली. शहराच्या ४० टक्के भूभागाची राख झाली. ९० टक्के इमारतींची अंशतः किंवा पूर्णतः हानी झाली. केवळ हिरोशिमाच नव्हे तर अवघा जपान पुरता नामोहरम झाला. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून आर्थिक ताकद आणि लष्करी क्षमता यांचा विकास करीत जागतिक महासत्ता होऊ पाहत असलेला हा देश. ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुहल्ले केले आणि लगोलग १५ ऑगस्ट रोजी जपानचे सम्राट हिरोहितो यांनी अमेरिका व तिच्या मित्रदेशांपुढे शरणागती पत्करली. पुढे जर्मनीचाही पाडाव होऊन २ सप्टेंबर रोजी हे महायुद्धच थांबले...
या सर्व घटनाक्रमाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.* नेमके हेच वर्ष पुन्हा एकदा अवघ्या जगापुढे दुसरे एक संकट घेऊन आले आहे. त्यातून होणारा विनाशही प्रगतीच्या वाटांवर काही पावले मागे नेणारा आहे. परंतु परतीच्या त्या टोकापर्यंत पोचल्यानंतरही पुढे जाण्याची उमेद कायम ठेवायची, तर त्यासाठी हिरोशिमासारख्या प्रेरककथेची शिदोरी नक्कीच कामी येईल.
कसे उभे राहिले हिरोशिमा अशा सुलतानी संकटातून?
ही गोष्ट सुरू होते, बँक ऑफ जपानच्या हिरोशिमा शाखेपासून. स्फोटात त्यांनीही १८ कामगार आणि १२ कर्मचारी गमावले. तरीही अतिभक्कम बांधकामामुळे ती इमारत तग धरू शकली. स्फोटानंतर दोनच दिवसांत या बँकेने कामकाज सुरू केले. तेही केवळ स्वतःपुरते नाही, तर स्वतःची जागा गमावलेल्या शहरातील अन्य ११ बँकशाखांनाही आपल्याच आवारातील मोकळी जागा देऊन! भर पावसातही छत्र्या घेऊन या बँकांचे कर्मचारी कार्यरत राहिले. तीन दिवसांनंतर, म्हणजे ९ ऑगस्ट रोजी नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला झाला त्या दिवशी हिरोशिमातील टॅक्सी सेवाही सुरू झाली. दळणवळणाची गरज लक्षात घेऊन स्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी मर्यादित रेल्वेसेवाही सुरू करण्यात आली.
(बँक ऑफ जपान)
परंतु आव्हान फारच मोठे होते. खुद्द महापौरांनाच स्फोटात प्राण गमवावे लागल्याने स्थानिक प्रशासन नेतृत्वहीन झाले होते. शहरातील १६पैकी १४ रुग्णालये आणि १९८पैकी १७० डॉक्टर स्फोटानंतर या शहराच्या सेवेत राहिले नव्हते. दुर्दैवाने, आता मानवनिर्मित आपत्तीच्या जोडीला नैसर्गिक आपत्तीही आली. १७ सप्टेंबरला इडा या वादळाने या शहरातल्या ३,००० जणांचे बळी घेतले. या वादळाने एवढेच काय ते बरे घडले, की अणुस्फोटामुळे शहरभर साठलेला राडारोडा वादळामुळे झालेल्या पावसात धुवून समुद्रात गेला...
एव्हाना, आपत्तीतून मदत व पुनर्वसनाच्या मानवी प्रयत्नांनाही गती मिळाली. मित्र देशांच्या वसाहतवादी फौजांनीच हिरोशिमाच्या मदत-पुनर्वसन कार्यात सहकार्य करण्यास सुरुवात केली. स्थानिक प्रशासनाने पाच वर्षांचा पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार केला. चुगोकू शिंबून या स्थानिक वृत्तपत्राने हिरोशिमाच्या फेरउभारणीसाठीच्या कल्पना वाचकांकडून मागवल्या. शांतता स्मारक, ग्रंथालय, संग्रहालय यांसारख्या कल्पना त्यातून साकारत गेल्या. परंतु घटत्या करसंकलनाच्या आव्हानामुळे स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांना मर्यादा येत होत्या.
हिरोशिमाचे नवनियुक्त महापौर शिंझो हमाई यांनी हे चित्र बदलण्यासाठी नेटाने प्रयत्न केले. आपले शहर शांततेचे प्रतीक म्हणून विकसित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यातून जपान सरकारने १९४९मध्ये हिरोशिमा शांतता स्मृतिस्थळ निर्माण कायदा करून शहरविकासाला आणखी चालना दिली. दुर्दैवाने, हिरोशिमातील उद्योगांच्या चाकांना खरी गती १९५०मधील कोरियन द्वीपकल्पातील युद्धामुळे वाढलेल्या मागणीतूनच मिळाली! एका अर्थाने युद्धाच्या ज्वाळांतूनच हिरोशिमातील चुलीही पेटू लागल्या आणि शांततेचा पुरस्कार करणारे शहर ही त्याची नवी ओळख निर्माण होण्यालाही विध्वंसाची धगधगती किनारच गरजेची ठरली.
एक तप उलटले. १९५८ पर्यंत हिरोशिमाची लोकसंख्या पुन्हा अणुस्फोटपूर्व स्तरापर्यंत पोचली. स्फोटाच्या विनाशकेंद्रापासून सर्वाधिक जवळची जी इमारत त्यातून बचावली होती, ते हिरोशिमा औद्योगिक प्रोत्साहन केंद्र हे हिरोशिमा शांतता स्मारक उद्यानाचा भाग म्हणून विकसित करण्यास सुरुवात झाली. जगभरातील पर्यटकांचे ते आकर्षणकेंद्र होऊ लागले. १९९६ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत हिरोशिमातील ए-बॉम्ब डोम समाविष्ट झाले. केवळ पाच दशकांत हे शहर अक्षरशः राखेतून केवळ पुन्हा उभेच नाही राहिले, तर प्रगतीच्या वाटा दाखवणारे जगभरातील शांततेचे प्रतिकही झाले...
जपानने नव्या दिशांनी नव्या वाटा शोधायला केलेली सुरुवातही हिरोशिमाच्या या वाटचालीला पूरक ठरली. १९४५ ते १९५६ हा पूर्ण जपानसाठीचाच फेरउभारणीचा काळ होता. त्यात यश मिळवत हा देश प्रगत देशांशी स्पर्धा करण्याच्या परिस्थितीत आला. १९४९मध्ये स्थापन केलेले आंतरराष्ट्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालय हे यासाठी सरकारी आणि खासगी उद्योग क्षेत्रांमध्ये मेळ साधू लागले.
युद्धसमाप्तीनंतरच्या ११ वर्षांतच हा देश दरडोई सकल देशांतर्गत उत्पादनाच्या बाबतीत युद्धपूर्व स्थितीपर्यंत पोचला. परंतु फेरउभारणीपुरतेच न थांबता आधुनिकीकरणाची कास धरत जपानने १९७३पर्यंत अशीच घोडदौड कायम ठेवली. त्यासाठी या देशाने शिक्षण आणि रोजगारसंधी यांचा मेळ घातला. नागरी कायद्यांमध्ये महत्त्वाचे बदल करत स्थलांतराला प्रोत्साहन दिले. गावांमधून स्थलांतर करणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळाला एकत्रितरीत्याही रोजगारसंधी साधता येतील अशी व्यवस्था केली. १९७३ च्या आखाती संघर्षानंतर तेलाच्या किमतींचा भडका उडाला. त्यातून जपानची आर्थिक घोडदौड स्थिरावली. तरीही १९९१ मध्ये या देशाने दरडोई सकल देशांतर्गत उत्पादनाच्या बाबतीत जवळपास अमेरिकेला गाठलेच. अर्थात तिथून पुढे रोजगारक्षम वयातल्या मनुष्यबळाला ओहोटी लागल्याने हा देश अमेरिकेच्या तुलनेत मागे पडत गेला हा विषय वेगळा.
हिरोशिमाची आजची लोकसंख्या सुमारे २१ लाख आहे. राजेशाहीच्या काळातील हे लष्करी केंद्र आता औद्योगिक केंद्र झाले आहे. २०१८-१९मध्ये चार लाखांहून अधिक परदेशी पर्यटकांनी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या पर्यटनाचे प्रवेशद्वार असलेल्या पुण्यापेक्षाही अधिक लोकांनी हिरोशिमातल्या विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या आहेत. अणुस्फोटाच्या रेट्याने काही काळ उलटी कालगती अनुभवावी लागलेल्या हिरोशिमाची ही गोष्ट "पुनश्च हरिओम" करणाऱ्या प्रत्येकासाठीच प्रेरणादायी ठरावी!
-इमेज मीडिया, पुणे
(इमेज मीडिया Imedge Media ही डॉक्युमेंटेशनच्या क्षेत्रात काम करणारी व्यावसायिक संस्था आहे. अधिक माहितीसाठी
[email protected])