हायकिंग, ट्रेकिंग आणि माउंटनेरिंग : कोणतं सोपं आणि कोणतं अवघड? तिघांत काय फरक आहे ?
लोणावळयाला जाताना अनेक डोंगर दऱ्या नजरेस पडतात... ते मनमोहक दृश्य बघून एकदा तरी पावसाळ्यात एखादा ट्रेक करावा असे वाटले नसेल तर नवलच...
पण, हायकिंग, ट्रेकिंग आणि माउंटनेरिंग म्हणजे काय?
पाऊस आला की, हौशानवशा लोकांचं गडकिल्ल्यावर जायचे प्रमाण वाढतं. त्यातून ट्रेक ऑर्गनायझर्सची संख्या तर वाढतेच, पण तरुणाईचे साहसी क्रीडा प्रकाराकडे वाढलेले आकर्षण ह्यामुळे गिर्यारोहण करणाऱ्यांची संख्या वाढतेय. तुम्हांलाही यात रस वाटत असेल. असं असेल तर हायकिंग, ट्रेकिंग आणि माउंटनेरिंग म्हणजे नक्की काय हे जाणून घेणे महत्वाचे आहे. जेणेकरून आपण आपल्या शारीरिक क्षमतेनुसारस्वतःसाठी काय योग्य आहे ह्याची निवड करु शकता. कारण एखादा साहसी खेळ निवडताना आपली सुरक्षितता देखील महत्त्वपूर्ण आहे.
हे तीन प्रकार कसे वेगळे आहेत हे सांगण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रत्येक प्रकारासाठी लागणार अनुभव, शारीरिक आणि मानसिक क्षमता, तसेच येणाऱ्या अडचणी यांच्या नुसार त्यांचे वर्गीकरण करणे.
हायकिंग
तिघांपैकी सर्वात सोपे म्हणजे हायकिंग. आधीच असलेल्या पाऊलखुणा, पायवाट अश्या मध्यम अडचणीच्या खुणा असलेल्या चिन्हांवरुन चालणे म्हणजेच हायकिंग. हायकिंग हे सहसा एकदिवसीय असतात (डे-डे ते वन-डे टूर). हायकिंग करताना निवडलेला सुरवातीचा भूप्रदेश तुलनेने सपाट असतो आणि त्यांची उंची हळूहळू वाढत जात असते. हायकिंगचा अनुभव घेण्यासाठी सह्याद्रीतल्या सोप्प्या श्रेणीत गणल्या जाणाऱ्या गड-किल्ल्यांना भेट देता येऊ शकते.
उदा. रायगड, लोहगड, सिंहगड, शिवनेरी, प्रतापगड अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या गडांना भेट दिल्यास निसर्गाचा विलक्षण अनुभव आणि इतिहासाच्या पाऊलखुणा जवळून बघितल्याचे समाधान ही मिळते.
ट्रेकिंग किंवा पर्वतारोहणापेक्षा हायकिंग करणे सोपे आहे परंतु तरीही ते आव्हानात्मक असू शकते.
बहुतेक हायकिंग टूर्स सहसा आपण प्रारंभ केल्या त्याच ठिकाणी संपतात. त्याला लूप हायकिंग म्हणतात. यात निघालो तिथेच परत येणे किंवा मग त्याच मार्गाने परत येणं असंही असू शकते.
काही हायइकचे सुरुवात आणि शेवटचे स्थान वेगळे असतात. म्हणून आपण प्रारंभ करण्यापूर्वी सर्व माहिती असणे गरजेचे आहे. साधारणत: हायकिंगचा कालावधी हा २ ते ८ तासांच्या दरम्यान असतो. पण काही दिवसांच्या सरावानंतर थोडे जास्त अंतराचे १२-१५ तासाच्या प्रवासाचे हायकिंग करू शकता.
लांब पल्ल्यांचा भार सहज पेलणे हे शारीरिकदृष्ट्या कठीण आहे. त्यामुळे अचानक अशा एखाद्या ऍक्टिव्हिटीची सुरुवात करण्यापूर्वी आपली स्थिती चांगली असल्याची आपल्याला खात्री करणे आवश्यक आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
साधारणतः आपण दर तासाला अंदाजे ४०० मीटर (~ १३१२ फूट) उंची गाठू शकतो. बाकी गडाची चढण, चालण्याची वेळ (सकाळ, दुपार, रात्र), तुमच्याकडे असलेले वजन आणि एकंदर सभोवतालची परिस्थिती यावर तुमचा हायकिंगचा वेग अवलंबून असतो. हायकिंग टूरसाठी, ट्रेकिंग आणि पर्वतारोहणाच्या तुलनेत आपल्याला कमीतकमी उपकरणे आवश्यक आहेत. आपल्याला दिवसा आवश्यक असणारे सामान, मेडिकल किट, कोरडा फराळ आणि भरपूर पाणी या गोष्टी हायकिंग करताना आवश्यक आहेत.
आपण हायकिंगसाठी नवीन असल्यास लहान आणि सोप्प्या गडांपासून सुरुवात करा आणि तुम्ही वातावरणाशी किती पटकन जुळवून घेता यावर बाकी सगळे निश्चित होईल.
हायकिंग करून तुम्ही ताजेतवाने तर होताच, पण त्याचे नकळत होणारे फायदेही पुष्कळ आहेत. म्हणजे पाहा, हायकिंगदरम्यान अतिरिक्त कार्डिओ वर्कआउट होतो. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण श्वास घेण्याच्या लयीत येईपर्यंत सुरवातीच्या १५/२० मिनिटांत आपल्याला त्रास होऊ शकतो. तसेच आपल्या फुफ्फुसांवर पडणारा अतिरिक्त भार पडतो. परंतु कमीतकमी ३० मिनिटे चालल्यावर तुम्ही लयीत येता. मग तुम्ही वातावरणाशी/सभोवतालच्या निसर्गाशी समरूप होऊन जाता आणि एकदा का आपल्याला आपला श्वास घेण्याची लय सापडल्यानंतर ती सहज होते आणि प्रवास अधिक आल्हाददायक होतो.
ट्रेकिंग
ट्रेकिंग हे गिर्यारोहण आणि पर्वतारोहणच्या अध्येमध्ये येते. तसे हे थोडे हायकिंगसारखेच असते पण ट्रेकिंग ट्रेक्स जरा जास्त अंतराचे असतात. ट्रेकिंगसाठी सहसा दोन किंवा अधिक दिवस लागतात.
म्हणजेच यात आपल्याला एकतर राहण्यासाठी टेंट आणि जेवण बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी येतातच, सोबत जादाचे कपडे, पांघरायला ई. साहित्य घेऊन प्रवास करावा लागतो. काही ठिकाणी जवळच असलेल्या वस्तीत/ गावात राहण्याचा पर्याय असू शकतो. उदाहरणार्थ, राजमाची, साल्हेर - सालोटा, तोरणा - तिकोना असे जोडीचे ट्रेक करता तेव्हा गावात राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध आहे.
ट्रेकिंग हे हायकिंगपेक्षा अधिक आव्हानात्मक आहे. कारण यात आपण सलग अनेक दिवस चालत असतो. त्यामुळे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. ट्रेक्स सहसा एकाच ठिकाणी सुरू होतात आणि वेगळ्या ठिकाणी समाप्त होतात. हे अंतर अंदाजे ४० किमी ते कित्येक शंभर किलोमीटर दूर कुठेही बदलू शकते. काही सर्वात लोकप्रिय ट्रेक्स पूर्ण होण्यास दोन आठवडे लागू शकतात.
जसे, नेपाळ मधील एव्हरेस्ट आणि अन्नपूर्णा बेस कॅम्प, भारतातील रूपकुंड ट्रेक, स्टोक कांगरी बेस कॅम्प ई. हे ट्रेक सहसा ७ ते १० दिवसांत केले जातात.
माउंटनेरींग - पर्वतारोहण
या तीनही प्रकारांत पर्वतारोहण सर्वात जास्त आव्हानात्मक आहे. ह्या मध्ये आपल्याला टेक्निकल ज्ञान असणे आवश्यक आहे. ह्याचे प्रशिक्षण नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनेरींग, हिमालय इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनेरींग ई. ठिकाणी २८ दिवसांच्या कोर्समध्ये घेता येऊ शकते. माउंटनेरींग आपल्याला उच्च शिखरावर नेते. बरेचदा ही शिखरे समुद्रसपाटीपासून ५००० मीटरपेक्षा जास्त उंच असतात.
माउंटनेरींगमध्ये आपल्याला हायकिंग किंवा ट्रेकिंगपेक्षा अधिक उपकरणांची आवश्यकता आहे आणि आपल्याला ती उपकरणे योग्यरित्या कशी वापरावीत हे देखील आपल्याला कोर्समध्ये शिकवले जाते. उदाहरणार्थ, क्रॅम्पन्ससह बर्फावर कसे चढवायचे, बर्फाची कुऱ्हाड (ice Axe) कशी वापरायची आणि बर्फावरुन मोठ्या प्रमाणात क्रॅक सुरक्षितपणे कसे पार करावे, जर आपण घसरलात तर बर्फाच्या कुऱ्हाडीचा वापर करून स्वत: ला कसे वाचवायचे इत्यादी इत्यादी. याव्यतिरिक्त काही ठिकाणी कमीतकमी ऑक्सिजनसह चढाईसाठी बरेच तास सहन करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
मी गेली अनेक वर्ष सह्याद्रीच्या कुशीत भटकत आहे. तसेच, गेल्या दोन वर्षांमध्ये मी ४ हिमालयीन ट्रेकदेखील केले आहेत. माझ्या अनुभवावरून सांगतो की ही तीनही प्रकार एकदम मस्त आहेत. ह्या मध्ये येणारा अनुभव हा तुम्हाला शारीरिक आणि मानसिदृष्ट्या सक्षम होण्यास मदत करतो.
लेखक : वैभव ऐवळे