'जेनिफर लोपेझ'च्या त्या ड्रेसमुळे गुगल इमेज सर्चचा जन्म कसा झाला ?
एखादा फोटो पाहून हा नक्की कुठला फोटो असेल असा विचार मनात आला की क्रोम ब्राऊझर वापरणारे पटकन इमेजवर राईट क्लिक करून 'सर्च बाय इमेज' पर्याय निवडतात आणि त्या इमेजची पूर्ण कुंडली तुमच्यासमोर सादर होते. आता तर याचं ॲपही आलं आहे. त्यामुळं मोबाईल वापरणाऱ्यांनी कोणतीही इमेज गूगल लेन्समध्ये उघडली की त्या इमेजची सगळी माहिती मिळते. पण हे फीचर आलं कुठून? ते करावं असं गुगलला का वाटलं असेल? आज आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी हेच उत्तर घेऊन आलो आहोत.
प्रसिद्ध हॉलिवूड गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझच्या एका ड्रेसमुळे गूगलला सर्च इंजिनमध्ये एका नवीन फीचरची भर टाकावी लागली आणि जन्म झाला "गूगल इमेज सर्च"चा!!
एकोणीस वर्षांपूर्वी म्हणजे २००० साली जेव्हा जेनिफरकाकू तो हिरव्या रंगाचा गाऊन घालून ग्रॅमी अवॉर्डची तयारी करत होत्या तेव्हा त्यांना या गाऊनमुळे गूगलचा नवीन इतिहास लिहिला जाणार आहे स्वप्नातही वाटलं नसेल!! व्हर्साची या प्रसिद्ध इटालियन ब्रांडने डिझाईन केलेल्या ड्रेसचं नाव होतं- जंगल ड्रेस!!
या घटनेच विश्लेषण करताना गूगलचे माजी सीईओ एरिक श्मीट म्हणतात की, "गूगल त्यावेळी फक्त दोन वर्षांचं होतं आणि लोकांना गूगलवर फक्त मजकुराशिवाय आणखी बरंच काही शोधण्याची इच्छा होती. २०००च्या ग्रॅमी सोहळ्यात जेनिफर लोपेझने घातलेल्या हिरव्या रंगाच्या ड्रेसने सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. अनेकांना तो ड्रेस घातलेल्या जेनिफरला पुन्हा पाहायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी गूगलवर सर्च केलं J Lo wearing that dress आणि यातूनच जन्म झाला गूगल इमेज सर्चचा!!"
EI न्यूजने एकदा याबद्दल जेनिफरला विचारलं असता ती म्हणाली होती की ,"काय माहित!! पण मीसुद्धा याबद्दल ऐकलं आहे."
परंतु खरंच जेनिफर आणि तिच्या व्हर्साची जंगल ड्रेसमुळे हे सगळं घडलं का? याबद्दल बोलताना गूगलच्या कॅथी एडवर्ड म्हणतात, "हे काही एका रात्रीत झालं नाही. पण यात जेनिफर आणि तिच्या ड्रेसचा सहभाग मात्र आहे!! ज्यावेळी कंपनी फक्त दोन वर्षांची होती आणि कंपनीत खूप कमी कर्मचारी होते तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की कंपनीने एक इमेज सर्च इंजिन बनवायला हवंय. परंतु याला किती महत्त्व द्यायचं हे कोणालाच माहिती नव्हतं. जेव्हा जेनिफरची ती ड्रेसची घटना घडली तेव्हा मात्र सगळं क्लिअर झालं!!"
आज गूगलवर जेनिफर विथ ग्रॅमी ड्रेस असं सर्च केलंत तर तुमच्यासमोर हजारो इमेजेस येतात!!
लेखक : सौरभ पारगुंडे