हे रोजच्या वापरातले १२ इंग्रजी शब्द खुद्द इंग्रजीने कुठून उसने घेतले आहेत??
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/kAkhfskjs.jpg?itok=L9OMWpDl)
साहेबानी आपल्यावर राज्य केल्यामुळे इंग्रजी भाषा आता आपलीच भाषा झालीय. इंग्रजी ही जास्तीत जास्त बोलली जाणारी आंतरराष्ट्रीय भाषा असली तरी इंग्रजीतले अनेक शब्द इंग्रजीतले नाहीच आहेत आणि आपण मात्र त्यांना इंग्रजी शब्द समजतो. आज बघू या काही रोजच्या व्यवहारात वापरले जाणारे इंग्रजी शब्द जे इंग्रजी नाहीतच!!
१. बॉस
आधीची पिढी ज्याला 'साहेब' म्हणायची, त्याला आताची पिढी 'बॉस' म्हणते. साहेब शब्दात आदरार्थी 'सर' अंतर्भूत आहे, पण 'बॉस' शब्दात दरारा आहे. पण हा शब्द इंग्रजीत डच भाषेतल्या ' baas' या शब्दातून आला. डचांच्या भाषेत 'baas' हा शब्द मालक या अर्थाने वापरला जातो. इंग्रजीत वॉशिंग्टन आयर्वींगने एकोणीसाव्या शतकात 'boss' हा शब्द वापरला.
२ अल्कोहोल
हा शब्द अरबी शब्द 'अल-कुहल' या शब्दातून आला आहे. पण अरबीत 'अल-कुहल' अँटीमनीच्या पावडरीला म्हटले जायचे. ही पावडर डोळ्यांच्या सौंदर्य प्रसाधनात वापरली जायची.
३ झीरो
शून्याची संकल्पना अरबांच्या, म्हणजे इब्न मुसा अल खोवारझ्मीच्या माध्यमातून युरोपात पोहचली. इब्न मुसाने त्याला 'सिफ्र'असे नाव दिले होते. झिरो हा शब्द मध्ययुगीन लॅटीन शब्द 'झेफ्रीयम' पासून आला आहे.
४. बॉयकॉट
१८७० साली आयर्लंडमध्ये दुष्काळ पडला. जमीनदार मात्र त्यांच्या हिश्श्याची मागणी करत होते. हिस्सा नाही दिला तर शेतकर्यांकडून जमीन काढून घेतली जायची. या जमीनदारांतर्फे चार्ल्स बॉयकॉट हा ब्रिटीश कॅप्टन हे काम बघायचा. तेव्हा शेतकर्यांनी एकत्र येऊन चार्ल्स बॉयकॉटवर बहिष्कार टाकला. तेव्हापासून 'बॉयकॉट' हा शब्द बहिष्कार या अर्थाने इंग्रजीत वापरायला सुरुवात झाली.
सविस्तर माहितीसाठी आमचा हा लेख नक्की वाचा :
५. टॅटू
टॅटूला मराठीत 'गोंदण' हा गोड शब्द आहे हे आपण विसरूनच गेलोय. आजकाल सगळेजण आता 'टॅटू' हाच शब्द वापरत आहेत. हा टॅटू शब्द पोलीनेशिया नावाचा दक्षिण प्रशांत महासागराजवळ एक प्रदेश आहे, तिथून इंग्रजीत आला. मूळ शब्द 'tatau' असा आहे. याचा अर्थ 'त्वचेवर केलेली खूण' असा अगदी सार्थ आणि समर्पक आहे. हे टॅटू सुरुवातीला फक्त दंडावर काढले जायचे.
६. लेमन
लायमुन आणि लीम या अरबी भाषेतल्या दोन शब्दांतून लाइम आणि लेमन या शब्दांची इंग्रजीत निर्मिती झाली.
७. केचप
नॅशनल जिओग्राफिकच्या मते केचप अमेरिकेन या शब्दाचा उगम चीनी भाषेतल्या kê-tsiap नावाच्या फिश-सॉसमधून झाला आहे.
८. डिझेल
ज्याला आपण डिझेल ऑइल म्हणतो किंवा ज्या इंजिनाला डिझेल इंजिन म्हटले जाते, ते रुडॉल्फ डिझेल या जर्मन शास्त्रज्ञाचे संशोधन आहे. त्याच्या डिझेल नावाचाच पुढे वापर करण्यात आला.
९. सोफा
ब्रिटिश माणसं ज्याला कोच म्हणतात आणि अमेरिकन लोक ज्याला काऊच म्हणतात, त्याच वस्तूला 'सोफा' हेही एक नाव आहे. सोफा हा शब्द मूळ तुर्की भाषेतल्या 'सुफाह' शब्दापासून आला आहे. सुफाह म्हणजे ओट्यासारखा भाग. या भागावर चादरी-जाजम -उशा ठेवलेल्या असायच्या. तुर्की भाषेत सुफाह शब्द अरबीतून आला. अरबीत लाकडाच्या किंवा दगडाच्या बाकाला 'सुफाह' म्हणतात.
१० किंडरगार्टन (केजी)
मुलांच्या शिशुवर्गाला इंग्रजीत किंडरगार्टन किंवा केजी म्हणतात. हा शब्द जर्मन भाषेतला आहे. जर्मन भाषेत किंडरगार्टन म्हणजे मुलांची बाग. १८३७ साली फ्रेड्रीक फ्रोबेल या शिक्षणतज्ञाने पहिल्यांदा लहान मुलांच्या पूर्व शालेय वर्गाची संकल्पना मांडताना त्याला किंडरगार्टन हे नाव दिलं होतं.
११. कराओके
हौशी कलाकारांत काराओकेची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत भरपूर वाढली आहे. आता युट्युबवर कराओकेचे ट्रॅक्स सहज उपलब्ध असतात. मूळ कल्पनेसाठी आपण जपानी भाषेचे आभार मानायला हवेत. जपानी लोक कराओके १९७० सालापासून वापरतात. त्यांच्या भाषेत kara—म्हणजे रिकामा आणि okesutura म्हणजे ऑर्केस्ट्रा. जपानमध्ये लोकप्रिय झाल्यावर कराओके अमेरिकेत गेला आणि नंतर भारतात आला.
१२. चॉकोलेट
स्पॅनिश लोकांनी मध्य मेक्सिकोवर आक्रमण केले तेव्हा त्यांची ओळख कोको पावडर दूधात किंवा पाण्यात उकळून बनवलेल्या पेयाशी झाली. या पेयाला स्थानिक भागात बोलल्या जाणार्या नाहौती नावाच्या बोलीभाषेत chocolātl म्हटले जात असते. त्यावरून इंग्रजीत चॉकोलेट शब्द आला. तसाच कॉफीशी निगडित असलेला लाटे हा शब्द दूधाशी निगडीत आहे.
ब्रिटिशांच्या राज्यावर सूर्य मावळत नसे असं म्हणतात. कारण एकेठिकाणी सूर्य मावळला तरी दुसरीकडे सूर्य उगवलेला असे आणि तिथंही ब्रिटिशांचंच राज्य असे. हे इंग्रज जगभर फिरले आणि जगभरातल्या भाषांतले शब्द इंग्रजीत सामावले गेले. कुणी सांगावं, दुसऱ्या कुठल्या परक्या भाषेत असाच लेख लिहिला जात असेल आणि तेही इंग्रजीने आपल्याशा केलेल्या चटणी, चपाती, पथ, धोती, सरदार, गुरु, अवतार अशा भारतीय शब्दांची यादी देत असतील.