पॉप-अप ऍड डोक्यात जातात? पण त्या का आणि कुणी बनवल्या हे तर जाणून घ्या!!
आपण छान नेटसर्फिंग करत असतो आणि अचानक आपल्या समोर रंगीबेरंगी जाहिरात प्रकट होते. चुकून या जाहिरातीवर क्लिक केलं तर आपण भलत्याच टॅबवर जातो आणि मग मागे कसं यायचं ते समजत नाही. या प्रकारच्या जाहिरातींना पॉप-अप ॲड्स म्हणतात. तसं बघायला गेलं तर जाहिराती कोणालाच आवडत नाहीत, पण त्यातही ज्या एका प्रकाराचा सर्वात जास्त तिरस्कार केला जातो तो प्रकार म्हणजे पॉप-अप ॲड्स.
‘पॉप-अप ॲड्सची कल्पना ‘एथन झुकरमन’ यांच्या सुपीक डोक्यातून आलेली आहे. तुम्ही त्यांना नक्कीच शिव्या द्याल. अहो, तुम्हीच काय सगळं जग त्यांना शिव्या घालत आहे आणि त्यांनी स्वतःची चूक मान्य करून माफीदेखील मागिली आहे. पण सोबत ते हेही म्हणतात की, "मी माफी मागतो, परंतु आमचा उद्देश वाईट नव्हता".
९० च्या दशकात झुकरमन हे Tripod.com या वेबसाईटसाठी प्रोग्रॅमर म्हणून काम करत होते. ही साईट मुख्यत्वे पदवीधर विद्यार्थ्यांसाठी तयार काम करायची. कालांतराने Tripod.com ने webpage-hosting provider म्हणून नव्या व्यवसायात उडी घेतली. webpage-hosting provider म्हणजे सोप्या भाषेत अशी वेबसाईटची जिथे जाऊन इतरांना स्वतःची वेबसाईट तयार करता येते.
Tripod.com ने आपला व्यवसाय वेळोवेळी बदलला. कधी कपडे विकले, तर कधी मासिकं विकली. शेवटी जाहिरातीच्या व्यवसायात त्यांचा जम बसला. Tripod.com ने जाहिरातीच्या व्यवसायात काय केलं? तर ग्राहक ज्या कोणत्या वेबसाईट धुंडाळत असतात त्याच्या होमपेजच्या माहितीचा अभ्यास केला आणि ग्राहकांच्या आवडीनुसार त्यांना जाहिरात दाखवायल्या. ही पद्धत आता गुगल, फेसबुक आणि अनेक बड्या वेबसाईट्स वापरतात.
इथूनच पॉप-अप ॲड्सचा जन्म झाला.
तर, कल्पना अशी होती की होमपेजचा अभ्यास करून जाहिराती दाखवायच्या, परंतु ग्राहक जे पेज बघत आहे, त्यात दिसणाऱ्या माहितीशी जाहिरातींचा संबंध दिसणार नाही, याचीही काळजी घ्यायची होती. म्हणजे समजा पॉर्नसाईट्सवर इन्शुरन्सची जाहिरात केल्यास इन्शुरन्स कंपनीचं नाव खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे ही जाहिरात अशी दिसली पाहिजे की त्याचा आणि वेबपेजच्या कंटेंटचा संबंध दिसू नये.
या गोष्टी लक्षात ठेऊन एथन झुकरमन भाऊने एक कल्पना शोधली. ग्राहकांना जाहिरात दाखवण्यासाठी एक नवीनच विंडो उघडेल अशी व्यवस्था करायची आणि त्यावर पूर्ण जाहिरात दाखवायची. झुकरमन यांनी याचं कोडींग लिहिलं. अशा प्रकारे पॉप-अप ॲड्सचा जन्म झाला. हे सांगून झुकरमन म्हणतात की आमचा आमचा उद्देश वाईट नव्हता. आता उद्देश वाईट होता की संधिसाधू, हे वाचकांनी ठरवावं.
पॉप-अप ॲड्सचा हा जन्मदाता आता ऑनलाईन जाहिरातींच्या काहीशा विरोधातच बोलतो. झुकरमन म्हणतात की, "जाहिरात हे इंटरनेटचं पाप आहे". त्यांच्यामते इंटरनेटवर असलेल्या अनेक व्यवसायांना जाहिरातीद्वारे पैसा मिळतो, पण पैसा मिळवण्याचा जाहिरात हा एकमेव पर्याय नाही. पुढे त्यांनी म्हटलं की, "ऑनलाईन कंटेंटला पैसा पुरवण्यासाठी केवळ जाहिरातीवर अवलंबून राहिल्यामुळे इंटरनेटची स्थिती खालावली आहे."
झुकरमन म्हणतात की मिळकतीचे वेगवेगळे पर्याय धुंडाळायला हवेत. झुकरमन एक उपाय असा सुचवतात की, ऑनलाईन व्यवसायांनी आपल्या सेवेसाठी ग्राहकांकडूनच पैसे आकारावेत. या मार्गाने पैसा तर मिळेलच पण ग्राहकांची माहिती सुरक्षित राहील. आजच्या घडीला काही वर्तमानपत्रांच्या वेबसाईट्सनी हा माग चोखाळला आहे.
फेसबुकवर युझर्सच्या माहितीच्या अफरातफरीचा आरोप केला जातो. समजा, फेसबुकने पैसे आकारून सेवा द्यायला सुरुवात केली तर? यात मेख अशी आहे की प्रत्येकालाच पैसे देणं परवडणारं तर नाहीच, पण फुकाटातली सेवा सोडून पैसे देऊ करण्याच्या कल्पनेला कितपत प्रतिसाद मिळेल यावर प्रश्नचिन्हच आहे.
जोवर ग्राहकांना पैसा खर्च न करता सेवा उपभोगायची आहे तोवर डिजिटल जाहिरातींना मरण नाही. आणि जोवर डिजिटल जाहिराती आहे,त तोवर पॉप-अप ॲड्स दिसतच राहणार. पण झुकरमन म्हणतत तसा यामागचा त्यांचा उद्देश मात्र वाईट नव्हता!!