आता गुगलच्या 'पीपल कार्ड'द्वारे स्वतःचं व्हर्चुअल व्हिजिटिंग कार्ड तयार करा !!
ते म्हणतात ना, ‘एवढे मोठे व्हा की लोकांनी आपल्याला फेसबुकवर नाही तर गुगलवर सर्च केलं पाहिजे’. तर गुगलने तुमची ही इच्छा पूर्ण करायचयं ठरवलं आहे. गुगलने काल People cards नावाचं नवीन फिचर लॉन्च केलं आहे. या फिचरमुळे आता तुम्हाला 'व्हर्चुअल व्हिजिटिंग कार्ड' बनवता येईल. या व्हिजिटिंग कार्डमुळे तुम्ही गुगलवर याल आणि लोकांना तुम्हाला शोधणं सोपं जाईल. तुम्हालाही इतरांना सहज शोधता येईल. एका क्लिकवर तुमच्याबद्दल, तुमच्या कामाबद्दल, शिक्षण, सोशल मिडिया हॅन्डल, ईमेल, वेबसाईट अशी सगळी इत्यंभूत माहिती मिळेल.
गुगलचं व्हिजिटिंग कार्ड व्यावसायिक, कर्मचारी, फ्रिलान्सरपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग आज गुगलचं 'व्हर्चुअल व्हिजिटिंग कार्ड' कसं तयार करायचं ते शिकून घेऊ या.
१. सर्वात आधी तुमच्या गुगल अकाउंटमध्ये लॉगइन करा.
२. लॉगइन केल्यानंतर सर्चमध्ये स्वतःचं नाव शोधा. तुमच्यासमोर 'Add Yourself To Search' लिहून येईल. शेजारीच “get started” हा पर्याय दिलेला असेल. त्यावर क्लिक करा.
३. “get started”वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येईल. या फॉर्ममध्ये तुमचं शिक्षण, नोकरी, व्यवसाय, तुमच्याबद्दलची माहिती, मोबाईल नंबर, फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मिडीयाबद्दलची माहिती, ई -मेल, तुमचा फोटो इत्यादी माहिती भरायची आहे. नाव, लोकेशन, तुमच्याबद्दल (About), व्यवसाय सोडल्यास इतर माहिती भरणे बंधनकारक नाही. तुम्ही आवश्यक तेवढीच माहिती तुम्ही देऊ शकता.
४. माहिती भरून झाल्यावर तुमचं कार्ड बघण्यासाठी preview क्लिक करा आणि सगळी माहिती योग्य वाटत असेल तर सेव्हवर क्लिक करा.
एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमचं ‘वर्चुअल व्हिजिटिंग कार्ड’ तयार करता येईल. या प्रकारे एका व्यक्तीला एकच कार्ड तयार करता येऊ शकतं.
पिपल कार्ड किती सुरक्षित आहे ?
गुगलवर आपण आपली माहिती देत आहोत तर ती किती सुरक्षित आहे हा प्रश्न आपल्याला पडूच शकतो. गुगलने यासाठी काही खबरदाऱ्या घेतल्या आहेत. तुमची माहिती संपूर्णपणे तुमच्या हातात असेल. तुम्ही केव्हाही तुमची माहिती गुगल सर्चमधून मागे घेऊ शकता. लोकांना योग्य तीच आणि विश्वासार्ह माहिती मिळावी यासाठी सुरक्षिततेची तजवीज करण्यात आली आहे. खोट्या आणि आक्षेपार्ह माहिती विरोधात आपल्याला feedback button चा वापर करून तक्रार करता येऊ शकते. अशा माहितीवर गुगलची नजर असेल.
जेव्हा लोक तुमचं नाव सर्च करतील तेव्हा तुमचं कार्ड त्यांच्यासमोर दिसेल. नावावर किंवा तुमच्या व्यवसायावर क्लिक केल्यास तुमची संपूर्ण माहिती दिसणार आहे. ज्यांची नावे एक सारखी आहेत त्यांना शोधण्यासाठी गुगल तुमच्यासमोर एकापेक्षा जास्त पर्याय ठेवेल. प्रत्येकाच्या माहितीतील वेगळेपणा पाहून त्यांची निवड केली जाणार आहे. या आधारे तुम्हाला योग्य त्या व्यक्तीला शोधणं सोपं जाईल.
तर वाचकहो, तुम्ही तुमचं व्हर्चुअल व्हिजिटिंग कार्ड तयार करणार का?