धोनीच्या एक्झिटने एका पिढीचं बालपण संपलं.....का होता तो महत्त्वाचा ?
१९९० ते २००० दरम्यान जन्माला आलेल्या मुलांसाठी १५ ऑगस्टचा दिवस सर्वात वाईट होता. ज्यांना बघत बघत आमचे बालपण घडले त्यातले शेवटचे दोन मोहरे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाले. सुरेश रैना आणि द लिजेंड महेंद्रसिंग धोनी!! एकाअर्थी आमचे बालपण अधिकृतरित्या संपलेले आहे असेच म्हणावे लागेल.
आमच्या पिढीला क्रिकेट आवडायला लागले त्याचे मुख्य कारण धोनी होते. तोवर भारतीय क्रिकेट सौरवदादांच्या आशीर्वादाने हळूहळू आक्रमक होऊ लागले होते. पण धोनी मात्र एखाद्या वादळाप्रमाणे आला होता. आजही तत्कालीन वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरील धोनीचा कटआऊट आणि बाजूला "धोनीने धो डाला" सारखी हेडिंग सर्वांच्या लक्षात असेल.
ऑस्ट्रेलियन टीमचा क्रिकेटवर दबदबा असण्याचा काळ!! जेव्हा रिकी पॉंटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग असल्याच्या गोष्टी शाळेच्या वर्गापासून कॉलेजच्या कट्ट्यापर्यंत चघळून चघळून केल्या जायच्या अशावेळी सार्वत्रिक एकच भावना होती. त्यात या ऑस्ट्रेलियावाल्यांची एकदा जिरायला पाहिजे यार!!!
अशावेळी धोनी आला आणि गिलख्रिस्टची विकेटकिपिंग आणि पॉंटींगची बॅटिंग 'पानी कम' वाटेल अशा पद्धतीने कोसळायला लागला. त्याने केलेली १८३ रन्सची खेळी तर कुठल्याही धोनी फॅनसाठी पारायणाचा विषय!!
धोनी अजून एका अर्थाने महत्वाचा आहे. धोनीचे बॅकग्राऊंड हे त्याच्याशी सर्वसामान्य घरातल्या मुलाला रिलेट करायला लावते. हे सगळे त्याच्या 'धोनी-द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमात आले आहेच. पण धोनी क्रिकेटमध्ये येऊन फक्त निमशहरी मुलांचा हिरो आहे का? तर तसेसुद्धा नाही. हा भाऊ स्वतःच लिजेंड झालेल्या कित्येकांचा आयडॉल आहे.
धोनी कित्येक बाबतीत इतरांपेक्षा वेगळा आहे. धोनीच्या नावावर स्वतःचे असे मोजके विक्रम असतील. पण धोनीमुळे अनेकांना विक्रम करता आले. भारतीय टीमने न भूतो न भविष्यती मिळवलेले अनेक विजय हे धोनीच्या योगदानाशिवाय शक्य झाले असते का यावर आत्मविश्वासाने होकारार्थी उत्तर कोणी देऊ शकणार नाही.
धोनीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. पण हा गडी जेवढा मैदानात कूल असतो, तेवढाच तो मैदानाबाहेरसुद्धा कुल म्हणूनच वावरला. युवराज सिंगच्या वडिलांचे आरोप असोत, गंभीरने केलेले आरोप असोत की चेन्नई सुपर किंग्जचे प्रकरण असो. त्याने कधीच स्वतःचा तोल ढळू दिला नाही.
त्याचे कूल असणे सुद्धा एक केस स्टडी आहे. चेहऱ्यावर निर्विकार भाव असलेला हा भाऊ निर्णय घेण्याच्या बाबतीत मात्र कमालीचा क्रूर आहे. DRS घेण्याचा निर्णय तो शून्य सेकंदात घ्यायचा आणि त्याच्या अचूकतेने त्याला डीआरएसचा बादशहा बनवून ठेवले आहे.
मागे नवख्या हार्दिक पांड्यासोबत रनिंग करतानाचा त्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. यावरून धोनी अजून काही वर्षे खेळेल असेच वाटत होते. त्याची चपळता भल्याभल्यांना गांगरून टाकते, याचे कित्येक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत.
धोनी आता रिटायर होत आहे. सचिननंतर कोहली, रोहित शर्मा त्याचे उत्तराधिकारी म्हणून पुढे आले आहेत. पण धोनीनंतर कोण? हा प्रश्न मात्र आजही अनिर्णित आहे. धोनच्याजवळ जाणारा सुद्धा विकेटकिपर आज भारताजवळ नाही. धोनीसारखा कॅप्टन, त्याच्यासारखा फिनिशर हे एकदाच होतात असेच म्हणावे लागेल.
त्याने त्याच्या नेहमीच्या शांत तेवढ्याच वादळी शैलीप्रमाणे स्वतःची निवृत्ती घोषित केली. हे एकार्थी चांगलेच झाले. लोकांनी निवृत्त हो सांगण्याआधी स्वतःच बाजूला होणे कधीही चांगले. पण याच्यापुढे टीम अडचणीत असताना 'अरे अजून धोनी आहे' हा सर्वात मोठा दिलासा असणार नाही. हे मात्र त्याच्या खऱ्या फॅन्ससाठी दुःखद असेल.