computer

गुन्हेगार वृद्ध आहे म्हणून त्याला सोडण्यात आलं, पण ८ वर्षांनी त्याने पुन्हा खून केला....नक्की काय घडलं होतं ?

साल २०१०. त्या आजोबांचं नाव होतं अल्बर्ट फ्लिक. वय ६८-६९च्या जवळपास. १९७९ साली त्यांनी बायकोची हत्या करून अर्धं आयुष्य तुरुंगात घालवलं होतं. यावेळी त्यांनी एका महिलेवर हल्ला केला होता. पीडितेच्या वकिलांनी त्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून मागणी केली, पण कोर्टाने निर्णय देताना म्हटलं की, "अल्बर्ट फ्लिक हे फार वृद्ध झाले आहेत. त्यांना केवळ ४ वर्षांचा तुरुंगवास पुरेसा आहे. ४ वर्षांनी ते बाहेर पडतील तेव्हा त्यांची सत्तरी उलटलेली असेल, त्यामुळे ते धोकादायक ठरणार नाहीत."

जज साहेबांचं लॉजिक पटण्यासारखं होतं. एवढा म्हातारा माणूस कोणाला काय त्रास देणार? आजोबा तुरुंगात गेले आणि ४ वर्षं राहून आले. ८ वर्षांनी म्हणजे २०१८-१९ साली आजोबांना पुन्हा पोलिसांनी पकडलं. यावेळी त्यांनी एका महिलेला तिच्या मुलांसमोर चाकू भोसकून ठार केलं होतं.

पुढे वाचण्यापूर्वी अल्बर्ट फ्लिकचा इतिहास जाणून घेऊया.

अल्बर्ट फ्लिक याने १९७९ साली याचपद्धतीने आपल्या पत्नीचा खून केला होता. त्याने स्वतःच्याच मुलीसमोर बायकोला तब्बल १४ वेळा चाकूने भोसकून मारलं होतं. कारण काय होतं? तर बायकोने त्याला घटस्फोट मागितला होता. घटस्फोटाची कागदपत्रं समोर ठेवून तिने पोलिसांच्या मदतीने अल्बर्टला घराबाहेर काढलं होतं. काही दिवसांनी त्याचं राहिलेलं सामान घेण्यासाठी बोलावल्यानंतर अल्बर्टने तिच्यावर हल्ला केला. आश्चर्य म्हणजे १४ वेळा चाकूचे वार करूनही तिने जीव सोडला नाही. पोलिसांना दिलेल्या जबानीत तिने आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं.

अल्बर्टला खरं तर ३० वर्षांचा तुरुंगवास झाला होता पण त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याला २१ व्या वर्षीच सोडण्यात आलं.

आता पुन्हा नवीन प्रकरणाकडे वळूया.

२०१८ सालच्या प्रकरणात अल्बर्टला एक ४८ वर्षांची बाई आवडली होती. तिला दोन जुळी मुलं होती. तो तिचा सतत पाठलाग करायचा. पण त्या महिलेने पोलिसांना काही हे कळवलं नाही. तुम्हाला हिंदी सिनेमातला तो फेमस डायलॉग आठवतोय का? "तू जर माझी नाहीस, तर कोणाचीच नाहीस." या आजोबांवर हा डायलॉग फिट्ट बसतो. त्या महिलेकडून काहीच प्रतिक्रिया येत नसलेली बघून अल्बर्टने तिचा खून केला.

२०१९ साली अल्बर्ट फ्लिकला काय शिक्षा झाली?

अल्बर्ट फ्लिकने केलेला खून कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वयोमानानुसार तो सुधारेल ही अंधश्रद्धा होती हे त्याने सिद्ध केलं आहेच. कोर्टाने निर्णय देताना त्याला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

२०१० लाच अल्बर्टला रोखता आलं असतं पण जज साहेबांनी त्याच्यावर दया दाखवली आणि तो २०१८ साली नवीन खून करू शकला. अमेरिकेतील वृद्धांनी केलेल्या खुनाचे आकडे तरुणांपेक्षा कमी आहेत, पण याला अल्बर्ट फ्लिक पूर्ण अपवाद ठरलाय.

सबस्क्राईब करा

* indicates required