computer

कॅलिफोर्नियात जवळजवळ २०,००,००० एकर जंगल जाळून खाक...पण कॅलिफोर्नियाच्या जंगलात वारंवार आग का लागते ?

कॅलिोर्निया म्हटलं की आपल्याला आठवते ती सिलिकॉन व्हॅली आणि तिथलं नितांत सुंदर जंगल. परंतु या जंगलाला एक शाप देखील लाभला आहे. इथलं जंगल बऱ्याच वेळेला आगीच्या भक्ष्यस्थानी पडतं. सध्या पुन्हा एकदा कॅलिफोर्नियाच्या जंगलात आग लागली असून उत्तर आणि मध्य कॅलिफोर्नियातील जवळपास २०,००,००० एकर जंगल जाळून खाक झालं आहे. जवळपास ११,००० ठिकाणी विजा पडल्याच्या घटना घडल्या असून उच्च तापमान आणि वादळी वाऱ्यांमुळे परिस्थिती आणखीच गंभीर बनली आहे.

अमेरिकेतील सांताक्रुझ काउंटीतल्या बचावकार्यात ४८ हजार लोकांना वाचवण्यात आलं असून यात कॅलिफोर्निया विद्यापीठाचा देखील सामवेश आहे. वाचलेल्या लोकांत कोरोना पसरण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. आग एवढी भयंकर पसरलेली आहे की आगीपासून खूप लांब राहत असलेल्या लोकांनादेखील आगीच्या धुराचा त्रास होत आहे. या आगीमुळे बिग बेसिन रेडवुड स्टेट पार्कसारख्या सुंदर स्थळांनादेखील इजा पोहोचली आहे.

सारखं सारखं कॅलिफोर्नियाच का?

जगातल्या इतर जंगलातदेखील आग लागते परंतु कॅलिफोर्नियाच्या जंगलात आग लगण्याच प्रमाण तुलनेने खूप जास्त आहे. याची चार प्रमुख कारणे आहेत.

१. कॅलिफोर्नियाचं (बदलतं) हवामान

आग लागण्यात सर्वात महत्त्वाचं कारण आहे कॅलिोर्नियाच हवामान. कारण कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक पार्क विल्यम्स सांगतात," आग ही एक खूप सोपी प्रक्रिया आहे. जिथे कोरडेपणा आहे तिथे ठिणगी पडल्यानंतर ती लागणारच!" आता कॅलिफोर्नियात होतं काय की इतर पश्चिमी प्रदेशांप्रमाणेच तिथे हिवाळ्यात हवामान दमट होत. हे हवामान वनस्पतीच्या वाढीला पोषक ठरतं. पण त्यानंतर उन्हाळ्यात मात्र तिथे दुष्काळ पडतो आणि जवळजवळ सर्व वनस्पती वाळून जातात. या वाळलेल्या झाडांमुळेच नंतर मोठमोठ्या आगी लागतात.

केवळ कॅलिफोर्नियाचं हवामान आणि तिथल्या वाळलेल्या वनस्पती आगी निर्माण करण्यासाठी कारणीभूत नाहीत, तर आणखी एक मोठा घटक तिथे आग पसरवायला कारण ठरत आहे- तो म्हणजे जागतिक हवामान बदल अर्थात ग्लोबल वॉर्मिग. प्राध्यापक विल्यम्स म्हणतात,"ग्लोबल वॉर्मिंग मुळे कॅलिफोर्नियाच्या तापमानात २ ते ३ डिग्री फॅरेनहाईटची वाढ झाली आहे. ही वाढ आग निर्माण होण्यासाठी पोषकच आहे!"एका नोंदीनुसार तर १९३२ पासून कॅलिफोर्नियात लागलेल्या मोठ्या आगींपैकी दहा आगी तर सन २००० नंतर लागलेल्या आहेत. यात २०१८ मधल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आगीचाही सामवेश होतो.

२.लोक

आग निर्माण होण्यासाठी कितीही पोषक वातावरण असूदेत, जोपर्यंत ती पेटवली किंवा पेटली जात नाही तोपर्यंत आग लागत नाही. काहीवेळा ती निसर्गाकडून पेटवली जाते तर काहीवेळा माणसांकडून.

डेझर्ट रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये सहाय्यक प्राध्यापक असलेल्या निना ओकले सांगतात,"दक्षिण कॅलिफोर्नियात लागलेल्या आगीपैकी बऱ्याचश्या आगी या माणसांनीच लावलेल्या असतात."

कमी उंचीवरील विजेच्या तारांमुळेदेखील बऱ्याचदा आग लागते. २०१८ मध्ये लागलेली आग खरंतर एका ट्रकचा टायर फुटून त्याची रिम जमिनीला घासल्यामुळे उडालेल्या ठिणगीमुळे लागली होती.

"कॅलिफोर्नियात लोकवस्ती खूप जास्त आहे आणि इथला उन्हाळा देखील खूप दीर्घ असतो. त्यामुळे होतं काय की, लोकांच्या कुठल्यातरी कृतीमुळे ठिणगी निर्माण होते आणि उन्हाळ्यामुळे वाळलेली झाडे ती ठिणगी पकडण्याची वाटच बघत बसलेली असतात!"प्राध्यापक विल्यम्स सांगतात.

जंगलाच्या आजूबाजूला वाढत चाललेली लोकवस्ती हीदेखील आग लागण्याच्या कारणांपैकी एक कारण आहे.

३.आगीचं दमन

तिसरं कारण जरा विचित्र आहे. शाळेतल्या एखाद्या खोडकर मुलास जर शिक्षक सारखी शिक्षा करत असतील तर परिणामी त्याचा खोडकरपणा जसा वाढत जातो तसंच काहीसं या आगीच्या बाबतीत झालं आहे. अमेरिकेचा आगी विझवण्याचा इतिहास पाहता त्यांनी केलेल्या आगीच्या दडपशाहीमुळेच आज कॅलिफोर्नियाच्या जंगलात आग लागण्याचं प्रमाण वाढलं आहे.

याचं विश्लेषण करताना प्राध्यापक विल्यम्स म्हणतात,"गेल्या शतकात आपण अमेरिकेच्या पश्चिम तटावरील बऱ्याच आगी विझवल्या. त्यामुळे काय झालं की ज्या गोष्टी जळून नष्ट व्हायला पाहिजे होत्या त्या तशाच साचून राहिल्या. आता या साचून राहिलेल्या अतिरिक्त इंधनामुळे आग लागण्याचं प्रमाण वाढलं आहे." त्यामुळे येत्या काही वर्षात अमेरिकन सरकार नियंत्रित आगीचा प्रयत्न करणार आहे ज्याद्वारे साचून राहिलेल्या गोष्टी जळून जातील.

४. सँटा ऍना वारे

दरवर्षी सँटा ऍना वारे पश्चिमेकडील उष्ण व कोरडी हवा कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेकडे घेऊन येतात. या वाऱ्यांमुळे आग पसरण्यास खूप मदत होते. त्यामुळे स्थानिक लोक या वाऱ्यांना "डेव्हील वारे" असे संबोधतात. डिसेंबर २०१७ मध्ये लागलेल्या दक्षिण कॅलिफोर्नियातील आगींपैकी २५ आगी या केवळ सँटा ऍना वाऱ्यांमुळे पसरल्या होत्या.

डॉ.सन या आगींचं विश्लेषण करताना त्यांचे दोन सीझनमध्ये विभागणी करतात. एक सीझन आहे जून ते सप्टेंबर आणि दुसरा सीझन आहे ऑक्टोबर ते एप्रिल. हा दुसरा सीझन सँटा ऍना वाऱ्यांमुळे पसरला जातो आणि त्याचा वेग पहिल्या सीझनपेक्षा तिप्पट असतो.

कारणं काही असोत, जंगलांमध्ये लागणाऱ्या आगी हा चिंताजनक विषय आहे. त्यावर जितक्या लवकर उपाय केला जाईल हे सर्वांसाठीच चांगलं असेल.

 

लेखक : सौरभ पारगुंडे

सबस्क्राईब करा

* indicates required