computer

बोभाटाची बाग : भाग २१ - देशी वृक्ष आणि त्यांच्या शास्त्रीय नावामागचा रंजक इतिहास!!

नॉमेनक्लेचर किंवा मराठीत 'नामकरण' हा विज्ञानाच्या अभ्यासातला एक महत्वाचा टप्पा आहे. आपल्या गावातल्या रस्त्यांची, चौकांची ओळख आपण वेगवेगळी नावं ठेवून निश्चित करतो, तशीच पध्दत विज्ञानाच्या अभ्यासात पण असते. उदाहरणार्थ, भौतीक शास्त्रात बलाच्या (फोर्स) परिमाणाला 'न्यूटन' या शास्त्रज्ञाचे नाव दिले गेले आहे. शरीरशास्त्रात शरीराच्या अनेक भागांना शास्त्रज्ञांची नावं दिली गेली आहेत. उदाहरणार्थ , फॅलोपियन ट्यूबला 'गॅब्रीअल फॅलापिओ' या शास्त्रज्ञाचे नाव दिले गेले आहे. आज बोभाटाच्या बागेत आपण अशा काही वृक्षांची माहिती करून घेऊ या ज्यांच्या शास्त्रीय नावामागे असाच काही इतिहास असेल.

काटेसावर :

या वृक्षाचे संस्कृत भाषेतले नाव तुमच्या परिचयाचे असेल. कदाचित तुमच्या मैत्रीणीचे किंवा बहिणीचे हे नाव असेल, पण त्या नावाचा या वृक्षासोबत असलेला संबंध ठाऊक नसेल. तर सांगायचं असं की काटेसावरीचं खरं नाव 'शाल्मली' आहे. या झाडाला आधी दोन नावं होती. बाँबॅक्स मलबारीकम आणि सालमलिया मलबारीका. मलबार भागात उगवते म्हणून मलबारीका आणि संस्कृत नाव शाल्मली म्हणून सालमलिया! पण सध्याचे रुढ नाव आहे 'बॉम्बॅक्स सिबा'. बॉम्बॅक्स म्हणजे कापूस आणि सिबा हे स्पॅनिश भाषेतले 'वृक्ष' शब्दाचा समानार्थी शब्द. या झाडाच्या खोडावर- फांद्यांवर अणकुचीदार काटे असतात म्हणून बोलीभाषेत याला काटेसावर म्हणतात.

काटेसावरीचा कापूस शेवरीचा कापूस म्हणून ओळखला जातो. गाद्यांमध्ये भरण्यासाठी हा कापूस युरोपात निर्यात होतो. पण तुमच्या माझ्या आठवणीत हे झाड त्याच्या फुलांमुळे लक्षात राहते. वर्षाच्या सुरुवातीला निष्पर्ण असलेले हे झाड वसंत ऋतूचे आगमन झाले की लाल -लाल फुलांनी बहरून येते. लालभडक, मेणचट, मोठ्या पाकळ्यांची ही फुलं अनेक पक्षांना 'या या' असे आमंत्रणच देत असतात. मैना, बुलबुल, दयाळ, फुलटोचे या फुलांच्या तळाशी असलेला रस चाखण्यासाठी गर्दी करतात. या गर्दीत मधमाश्या, खारी पण सामील होतात. हे जमा झालेले पक्षी या वृक्षाचे परागीकरण करतात. काहीच दिवसात बोंडासारखी फळं धरतात. ती पिकल्यावर उन्हाळ्याच्या दिवसात तडकतात आणि कापसाच्या 'म्हातार्‍या' हवेत फिरायला लागतात.

कौसी :

हे झाले या झाडाचे देशी नाव. शास्त्रीय नाव आहे फिरमिआना कोलोरेटा. कोलोरेटा म्हणजे कलरफुल, रंगीन. सुंदर रंगीत फुलं येतात म्हणून नावात हा शब्द आला. कार्ल जोसेफ व्हॉन फिरमिआना हे नाव एका उमरावाचे आहे. हा उमराव लोंबार्डी या प्रांताचा अधिकारी होता. अनेक शास्त्रज्ञांना आणि कलाकारांचा आश्रयदाता म्हणून त्याची ख्याती होती. रुबेन या चित्रकाराच्या अनेक चित्रांच्या प्रतिकृती त्याने बनवून घेतल्या होत्या. त्याच्या गुणग्राहकतेचा सन्मान म्हणून या झाडाचे नाव झाले फिरमिआना कोलोरेटा. या झाडाची फुलं लाल रंगाची मोहक असतात. हे झाड फुलल्यानंतर, फुलण्याच्या आधी निष्पर्ण अवस्थेत आणि फळांनी लगडल्यावर पण देखणे दिसते. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर-राधानगरी -दाजीपूर या भागात हे झाड बघायला मिळते. या झाडाची देशी नावं मात्र त्याच्या सौंदर्याचं वर्णन करणारी अशी नाहीत. खोलथे, सामारी, जारी, उडाल अशी वेगवेगळी रुक्ष नावे आहेत.

बेल :

विठोबाला तुळशी । गणपतीला दूर्वा । सांबाच्या पिंडीवर। बेल हिरवा ही ओळ तुमच्या परिचयाची असेल. आपल्या धार्मिक व्यवहारात अनेक वनस्पती अनेक देवतांशी जोडल्या गेल्या आहेत. बेल म्हणजे भगवान शंकर असे समीकरण आहे. शिव लीलामृताच्या एका अध्यायात बेलाच्या झाडावर शिकार करायला लपलेला एक पारधी अजाणता बेलाचे एकेक पान खुडून रात्रभर टाकत राहतो आणि झाडाखालच्या शिवाच्या पिंडीवर अभिषेक होत राहतो. इतर कथेप्रमाणे या कथेतही त्याला अजाणता केलेल्या कर्माचे फळ मिळते अशी कथा आहे. शास्त्रीय भाषेतील नामकरणात मात्र या झाडाचे नाव एगल मार्मेलोस असे आहे. एगल हे ग्रीक पुराणातील एका देवतेचे नाव आहे. एगलचा अर्थ होतो 'प्रकाशाने झगमगणारे'! पण या नावाच्या सहा सात देवताबद्दल ग्रीक वाङ्मयात वाचायला मिळते. त्यांपैकी कोणती देवता या झाडाच्या नावाशी जोडली गेली आहे हे सांगणे कठीणच आहे. संस्कृतात त्याला बिल्व, शैल, महाकपित्थ, कण्टकी अशी बरीच नावे आहेत.

बेलफळाच्या औषधी गुणानिमित्त सांगावे ते कमीच आहे. आपल्या परिचयात असतो तो बेलाचा मोरावळा! पोटाच्या जुन्या तक्रारींवर हा रामबाण उपाय समजला जातो. बेलफळाशी संबंधित एक वेगळाच विवाह संस्कार नेपाळमधील 'नेवार' समाजाशी जोडला गेलेला आहे ज्याला बेल-विवाह असे म्हटले जाते. बेल-विवाहात कुमारिकेचे लग्न भगवान विष्णूच्या 'सुवर्ण कुमार' या अवतारासोबत लावले जाते. या लग्नाची साक्ष म्हणून एक बेलाचे फळ त्या मुलीला दिले जाते.

वाचकहो, ही झाली काही मोजकी उदाहरणे , यातून एक लक्षात घेण्याची बाब अशी की प्र्त्येक वनस्पती मानवी आयुष्याशी जोडली गेली आहे. हा जोडणारा सांधा पौराणिक-सांस्कृतिक-ऐतिहासिक असा वेगवेगळ्या रुपाचा असेल, पण धागा अतूट आहे हे नक्की! 'देशी वृक्ष अभियाना'च्या माध्यमातून आपण हा धागा अखंड ठेवण्याचा प्रयत्न करूया!

सबस्क्राईब करा

* indicates required