नरेंद्र मोदी, सुंदर पिचाई, यांच्यासोबत टाईम्सच्या यादीत स्थान मिळवलेले रवींद्र गुप्ता आहेत तरी कोण?
टाईम मासिक वर्षभर प्रभाव पाडणाऱ्या लोकांची एक यादी दरवर्षी प्रसिद्ध करते. या मासिकात नाव येणं ही मोठी गोष्ट. यावर्षीच्या टाईमच्या यादीत बरीच भारतीय नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सिनेअभिनेता आयुष्यमान खुराणा, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई.. या सर्वांचं टाईममध्ये नाव आल्याबद्दल कौतुक तर आहेच, पण या यादीत असलेलं एक नाव मात्र कुणाच्या ध्यानीमनी नव्हते. त्यांचे नाव थेट टाईम मासिकात आल्यावर सगळीकडे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. ते नाव आहे रवींद्र गुप्ता!!!
कोण आहेत हे रवींद्र गुप्ता? रविंद्र गुप्ता क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी हा विषय शिकवणारे प्राध्यापक आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या डर्बन शहरात आफ्रिका हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट नावाच्या संस्थेत ते शिकवतात, सोबत केम्ब्रिज विद्यापीठात क्लिनिकल सायन्स या विषयासाठी असलेल्या वेलकम ट्रस्टवर देखील त्यांची वर्णी लागलेली आहे.
रविंद्र गुप्तांचं या यादीत नाव येण्याचं कारण आहे एक एचायव्ही पॉझिटिव्ह रुग्ण. हा रुग्ण रविंद्र गुप्तांच्या नेतृत्वाखाली उपचार घेत होता. हा रुग्ण ठणठणीत बरा झाला. एचआयव्ही होऊन बरा झालेला हा जगातला दुसराच रुग्ण!! त्यांचे नाव एडम कोस्टीलजो असे आहे. त्यांना लंडन पेशन्ट म्हणून देखील ओळखले जाते. टाईम मासिकात गुप्ता यांच्याबद्दल त्यांनी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, "माझी त्यांच्याशी ओळख झाली यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो. त्यांचे समर्पण होते म्हणूनच मी या जीवघेण्या आजारावर विजय मिळवू शकलो."
या आधी बरा होणारा एचआयव्ही रुग्ण हा बर्लिन पेशन्ट म्हणून ओळखला जातो. त्याचे नाव टीमोथी रे ब्राऊन. २००८मध्ये हा टिमोथी बरा झाला होता. पण ओळख लपवण्यासाठी त्याला बर्लिन पेशंट असं सांकेतिक नाव देण्यात आले होते. २०१०मध्ये त्याने आपली खरी ओळख जाहिर केली होती. टिमोथीनंतर तब्बल १२ वर्षांनी हा बरा होणारा दुसरा रुग्ण सापडला आहे. यावरून डॉ. रविंद्र गुप्तांचं काम किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येते.
डॉ. गुप्ता यांनी जगातल्या सर्वात प्रतिष्ठित असलेल्या केम्ब्रिज, ऑक्सफोर्ड आणि हावर्ड अशा विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले आहे. भविष्यात डॉ. गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली एचआयव्ही या रोगावर नियंत्रण मिळविण्यात मानवजातीला यश आले तर भारतासाठीही ती अभिमानाची बाब ठरेल.