लहानपणी घडलेल्या एका घटनेने तिला व्यायामाचं व्यसन कसं जडलं? भेटूया दिवसातून ८ तास व्यायाम करणाऱ्या महिलेला !!
व्यायाम. हा एकच शब्द किती वजनदार वाटतो नाही? वजन कमी करण्यासाठी म्हणा किंवा आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणा व्यायाम हा केलाच पाहिजे असं डॉक्टर लोक नेहमी सांगत असतात. मग एक दिवस असा येतो जेव्हा आपण ठरवतो की रोज सकाळी सहा वाजता काहीही झालं तरी चालायला जायचेच. दुसऱ्या दिवशी चक्क सकाळी साडेपाच वाजता उठून चालायलाही जातो. त्याच्या दुसऱ्या दिवशीही आणि मग तिसऱ्या दिवशीही. अस करत करत तो दिवस आपोआप येतो जेव्हा स्वतःला आपण समजावतो,"आता तीन दिवस झाले ना राव, आज मस्त झोपूया." फक्त तीनच दिवसांत आपणच आपलं व्यायामाचं वेळापत्रक बहुमताने पाडतो. आज जाऊ उदया जाऊ असे करत मग ते राहून जातं ते कायमचंच. पण आपल्या ह्या स्वभावाच्या बरोबर विरुध्द असणाऱ्या एका महिलेची गोष्ट आज आपण पाहणार आहोत. या बाईला व्यायाम करण्याचं व्यसन होतं. हो.. बरोबर ऐकलंत तुम्ही. व्यायामाचं व्यसन असलेली बाई!!
ही गोष्ट आहे एरीन नावाच्या महिलेची. एरीन ही कॅलिफोर्नियात राहते.ती दिवसातले तब्बल आठ तास व्यायाम करायची. हो.आ ठ ता स!! मग ती बाई एकदम सुदृढ आणि निरोगी असेल ना? अहं.. आठ तासांचा व्यायामही कुणाला रोगी बनवू शकतो?
ती रात्री लवकर झोपायची आणि लवकर उठायची, कारण ऑफिसला जायच्या आधी तिला व्यायाम करायचा असायचा. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावरही ती पुन्हा व्यायाम करायची. कोणी पार्टीसाठी बोलावलं किंवा कोणाला भेटायचे ठरलेले असायचे तर ती ठरलेले सारे बेत रद्द करायची, पण व्यायाम रोज न चुकता आठ तास करायची. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम तिच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर पडला. अपुरी झोप, अनियमित खाण्याचे वेळापत्रक आणि गरजेपेक्षा जास्त व्यायाम ह्या सर्वांचा परिणाम तिच्या शरीरावर होऊ लागला होता. हाडांची झीज व्ह्यायला सुरुवात झाली होती. वजन प्रचंड कमी झाले होते. ब्लड प्रेशर वाढले होते. शरीरातल्या पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढलेले होते. लाल पेशींचे प्रमाण असामान्य होते. डीहायड्रेशन तर प्रचंड प्रमाणात झाले होते. हे व्यसन इतक्या जास्त टोकाला जाऊन पोहोचले होते की जर तिने व्यायाम नाही केला तर तिला अस्वस्थ वाटायचे. तिच्या आयुष्यावरचे तिचे नियंत्रण पार हरवत चालले होते.
तर नक्की कशामुळे एरीनला हे व्यसन जडले?
एरीन सहा वर्षाची असताना तिचा लैंगिक छळ झाला. ती दहा वर्षाची होईपर्यंत तिला त्या त्रासदायक वेदनांचा सामना करावा लागला. अगदी कोवळ्या वयात सलग चार वर्षं सहन करावे लागलेले आघात तिला आयुष्यभर त्रास देत राहिले. खेळकर, अल्लड वयात सहन कराव्या लागलेल्या ह्या मानसिक, शारीरिक वेदना कळत्या वयात खूप सारे प्रश्न घेऊन पुन्हा पुन्हा त्रास देत राहल्या. एरीनलाही त्या वाईट आठवणींमधून स्वतःला सोडवून घ्यायचं होतं. त्या आठवणींपासून कायमचा पळ काढायचा होता. म्हणून ती दिवसरात्र व्यायाम करून स्वतःला व्यस्त ठेऊ लागली.
अमेरिकेतील ‘द डॉक्टर्स’ ह्या टेलिव्हिजन शोमध्ये एरीनला आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना एरीन म्हणली की,"मी दररोज आठ तास व्यायाम करते पण मला कधीही हातापायाला सूज आली असे होत नाही. जेव्हा मी ३० वर्षांची होते तेव्हा एका मुलीची मी गोष्ट ऐकली. तिची गोष्ट ऐकल्यावर माझ्या भूतकाळात झालेली ती त्रासदायक घटना मला रोज सतावू लागली. त्यामधून स्वतःला मुक्त करून घेण्यासाठीच मी व्यायाम सुरु केला. आणि आता मी स्वतःला ह्या व्यसनातून मुक्त करू शकत नाहीये.”
त्याच कार्यक्रमादरम्यान एरीनला ‘हेवन हिल रिकव्हरी सेंटर’ मध्ये मोफत उपचार देण्याचे आश्वासन देण्यात आले. तीन महिन्यांच्या ह्या प्रोग्रामचा एरीनला चांगला फायदा झाला. ती आता आठ तास झोपू लागली होती. तीनच तास व्यायाम करायची. तिच्या खाण्याच्या सवयी बदलल्या. तिचे मानसिक समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे एरीनचे आयुष्य बदलायला आता सुरुवात झाली होती. आयुष्यात तिला प्रथमच इतकं आशावादी वाटू लागले होते.
एरीनची ही गोष्ट आपल्याला हाच संदेश देते की,आयुष्यात प्रत्येक गोष्टींमध्ये समतोल हा राखलाच पाहिजे. चांगल्या गोष्टीचाही अतिरेक झाला तर ते ही वाईटच!! त्यामुळे कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता आयुष्यात स्वतःचा आनंद स्वतः शोधत राहिला पाहिजे.
लेखिका : स्नेहल बंडगर