एकेकाळचा घंटागाडी चालक अब्जावधी डॉलर्सच्या कंपन्यांचा मालक कसा झाला ?
लहरों से डरकर नौका पार नहीं होती...
कोशिश करने वालों की हार नहीं होती...
जब तक ना सफल हो नींद-चैन को त्यागो तुम...
संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम...
कुछ किये बिना ही जयजयकार नहीं होती...
कोशिश करने वालों की हार नहीं होती...
सोहनलाल द्विवेदी यांची ही कविता आपण सगळ्यांनीच ऐकली -वाचली असेल. पण जीवनात या कवितेचा प्रत्यक्ष वापर करणारे फारच कमी असतात. कदाचित म्हणूनच यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचणार्यांची संख्या फार कमी असते. आज आम्ही तुम्हाला एका कचरेवाल्याची म्हणजे कचर्याची घंटागाडी चालवणार्या अशा माणसाची कथा सांगणार आहोत ज्याच्या तीन कंपन्यांची नोंद फॉर्च्यून-१००० यादीत आहे. आणि हे तर काहीच नाही, त्याच्या ६ कंपन्यांचे लिस्टींग न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर झालेले आहे.
या माणसाचे नाव वेन हजेंगा. याचा जन्म शिकागोमध्ये झाला होता. तो लहान असतानाच आईवडीलांची फारकत झाली आणि तो आईसोबत फ्लोरीडा राज्यात रहायला आला. घरची परिस्थिती अर्थातच गरीबीची होती. आजोबा म्हणजे त्याच्या आईचे वडील, नेदरलँडमधून आलेले निर्वासित होते. अमेरिकेत हे काहीच नवीन नाही, कारण अमेरिका अशाच निर्वासितांनी घडवली आहे. त्याचे आजोबा घोडागाडीतून कचरा गोळा करायचे. वेन हजींगाने त्यांच्यापासून स्फूर्ती घेतली. एका ओळखीच्या गृहस्थाकडून एक कचरा गाडी भाड्याने घेऊन कामाला सुरुवात केली.
(प्रातिनिधिक फोटो)
आता इथे थोडी तेव्हाची अमेरिकन व्यवस्था समजावून घेणे आवश्यक आहे. अमेरिकेत त्या काळात कचरा गोळा करण्याची व्यवस्था खाजगी काँट्रॅक्टर चालवायचे. कचरा गोळा करणार्याला गिर्हाइकं शोधून महिन्याचे काँट्रॅक्ट मिळवावे लागायचे. जो कचरा मिळेल तो भरावासाठी टाकायला प्लॉट दिलेले असायचे. भराव टाकण्यापूर्वी कचर्यातून जे काही 'रिसायकल' करण्यासारखे मिळेल ते त्यातून अतिरिक्त कमाई व्हायची. अमेरिकन भाषेत याला वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम न्हणतात. आपल्याकडे ज्या नजरेने कचरा कामगाराकडे पाहिले जाते तसेच अमेरिकेतही होते. सांगायची गोष्ट अशी 'वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम' असं भारी नाव असलं तरी सामाजिक स्तरावर हे काम हलके कामच समजले जायचे.
वेन हजींगाने त्याच्या मेहनतीने हे सारे बदलले. तो पहाटे २.३० वाजता कामाला सुरुवात करायचा. कचरा गोळा करून झाला की संध्याकाळी घरोघरी जाऊन नवीन काँट्रॅक्ट मिळवायचा. थोड्याच दिवसांत या कष्टाचे फळ त्याला मिळाले आणि त्याने स्वत:ची गाडी घेतली. काही काळात त्याच्या ४० गाड्या कचरा गोळा करायला लागल्या. पुढच्या काही वर्षांत त्याने Waste Management Inc कंपनीची स्थापना केली. आता त्याच्या कामाचा आवाका वाढला होता. आसपास कचरा गोळा करणार्या अनेक कंपन्या होत्या, त्या त्याने विकत घ्यायला सुरुवात केली. अर्थात यासाठी मोठ्या भांडवलाची गरज होती. त्याने Waste Management Inc कंपनीचा पब्लिक इश्यू काढला. जे पैसे मिळाले त्यातून १५० कचरा गोळा करणार्या कंपन्या त्याने विकत घेतल्या. एक घंटागाडीवाला 'कचरा सेठ' झाला.
त्याच्या यशस्वी धंद्याचा फॉर्म्युला तयार झाला होता. लोकांना अत्यावश्यक सेवा द्या, दर महिन्याला पैसे गोळा करा, जमा पैशातून नवे अॅसेट विकत घ्या आणि धंदा वाढवत राहा. असे वारंवार पैसे देणारे धंदे त्याने शोधायला सुरुवात केली आणि त्यातून त्याला सोन्याची नवी खाणच सापडली. या नव्या सोन्याच्या खाणीचे नाव होते'ब्लॉकबस्टर'!!
जर तुमचा जन्म नव्वदीच्या दशकात झाला असेल तर तुम्हाला गावाकडली व्हिडीओ कॅसेटची दुकानं आठवतच असतीलच. रोज रात्री या दुकानांसमोर नव्या सिनेमाची कॅसेट घेण्यासाठी गर्दी व्हायची. या धंद्याचा फॉर्म्युला काय होता? एकदाच कॅसेट विकत घ्या- लोकांकडून रोख डिपॉझीट घेऊन भाड्याने द्या. उशीर झाला तर लेट फी लावून आणखी पैसे घ्या. 'ब्लॉकबस्टर' ही व्हिडीओ कॅसेट भाड्याने देंणारी कंपनी होती. त्यावेळी आपल्यासारखेच अमेरिकन जनतेला व्हिडीओ कॅसेटचे वेडच लागले होते. थोड्याच दिवसात हे वेड 'व्हायरल' होईल अशी हजँगाची खात्री पटली आणि त्याने 'ब्लॉकबस्टर' विकत घेतली. १९८७ साली त्याने 'ब्लॉकबस्टर' घेतली तेव्हा त्यांची फक्त १९ दुकानं होती. हजेंगाने विकत घेतल्यावर पब्लिक इश्यू काढला. भांडवल गोळा केले. पुढच्या ७ वर्षात 'ब्लॉकबस्टर'ची ३७०० दुकानं तयार झाली आणि वार्षिक उलाढाल ४ बिलीयन डॉलर्सवर पोहचली.
इथे यशस्वी उद्योजकाची एक कसोटी असते ती अशी की आलेले फॅड किती दिवस टिकेल याचा नेमका अंदाज घेऊन वेळच्यावेळी धंदा विकून टाकणे. हजेंगाने अगदी तेच केले. १९९४ साली त्याने ब्लॉकबस्टर कंपनी ८.४ बिलीयन डॉलर्स मध्ये 'व्हायाकॉम'ला विकून टाकली.
धंदा ज्याला कळला तो एका जागी कधीच थांबत नाही. व्हायाकॉमला 'ब्लॉकबस्टर' विकून टाकल्यावर त्याने ऑटोमोबाईलच्या धंद्याकडे लक्ष दिले. त्याच्या नजरेत गाड्या बनवणं हे त्याचं काम नव्हतं. त्यासाठी जे भांडवल लागतं ते गुंतवण्यापेक्षा गाड्या विकणं हा कमी खर्चाचा पण जास्त महत्वाचा धंदा आहे हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने ऑटोनेशन नावाची गाड्या विकणारी कंपनी काढली. काहीच दिवसात ऑटोनेशनच्या ३७० शाखा तयार झाल्या. पब्लिक इश्यू काढणारी ऑटोनेशन ही अमेरिकेतली पहिली कंपनी होती. तुम्हाला आठवत असेल तर हाच फॉर्म्युला वापरून भारतात पण त्या दरम्यान 'ऑटोरायडर' नावाची कंपनी आली होती. ऑटोरायडर्सच्या नंतर साई सर्व्हिस आली. त्यानंतर अनेक आल्या. अमेरिकेत असो की भारतात, यशाचा फॉर्म्युला एकच असतो!
वेन हजेंगाला विश्रांती घेणं कधीच मान्य नव्हतं. ऑटोनेशनला मिळालेल्या यशानंतर त्याने स्टे अमेरिका नावाची हॉटेल कंपनी काढली. सुरुवात ६२ हॉटेलपासून झाली आणि २००४ साली कंपनी विकली तेव्हा त्याच्याकडे ५०० हॉटेल्स होती. पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला! अॅसेट एकदाच घ्या - भाडे वारंवार घ्या - भाडं वसूल झालं की पुन्हा नवा अॅसेट ...
वाचकांच्या सोयीसाठी वेन हजेंगाच्या व्यवसायाचा फॉर्म्युला पुन्हा एकदा वाचू या.
भांडवल नाही? हरकत नाही. सेवा द्या! सेवा हे पण भांडवलच आहे. सेवा अशीच द्या ज्यातून दर महिन्याला कमाई होत राहील. कमाईतून नवा सेवा-व्यवसाय विकत घ्या. आवश्यक भांडवल गोळा झाले की पब्लिक इश्यू काढा आणि भांडवल अनेक पटींनी वाढवा. वेळीच धंदा विकून टाका आणि नव्या धंद्याकडे वाटचाल करा!!!
लक्षात घ्या हा प्रवास अत्यंत कठीण होता, शून्यातून विश्व निर्माण करण्याचा होता. अनेकवेळा त्याच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले, पण २०१८ साली त्याचे कॅन्सरने निधन होईपर्यंत तो सतत काम करत होता. सध्या कोवीडच्या काळात आपण सगळेच आर्थिक दृष्ट्या खचलेले आहोत अशावेळी वेन हजेंगासारख्या उद्योजकाचे चरित्र प्रेरणादायक ठरते.