कयामत से कयामत तक आणि जो जीता वही सिकंदर सारखे सिनेमे देणारा हा माणूस आता एक फार्म हाऊस चालवतोय यावर तुमचा विश्वास बसतोय?
तुम्ही जो जीता वही सिकंदर पाहिलाय? प्रश्नच नाही, उत्तर 'हो' असंच असणार! त्या वर्षात या सिनेमाने छप्परफाड कमाई केली. 'पहला नशा... ' या गाण्याने रसिकांवर गारुड केलं. आजही हा सिनेमा म्हटलं की पटकन आमीर खानच आठवतो, पण या सिनेमाच्या यशाचं क्रेडिट आमीरइतकंच त्याच्या दिग्दर्शकालाही जातं. मन्सूर हुसैन खान हे त्याचं नाव. मुळात हा मनुष्य काय नाही? केळफूल सोलताना जसं प्रत्येक वेळी आत काहीतरी असतंच, तसंच त्याचं आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू उलगडताना प्रत्येक वेळी नवं काहीतरी दिसतंच. तो एक हुशार विद्यार्थी आहे, लेखक आहे, दिग्दर्शक आहे, शेतकरी आहे, व्यवस्थापक आहे, पर्यावरणप्रेमी आहे, आणि विचारी व्यावसायिकही आहे. चंदेरी दुनियेत वावरणारा पण मनाने तिथे कधीच न रमलेला हा अवलिया एक दिवस आपला लॅपटॉप उचलून घरदार, शहर सोडतो काय आणि कुन्नूर इथे जाऊन शेती करतो काय... सगळंच अद्भुत! आज जाणून घेऊ त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.
१. मन्सूर हुसैन खान हा आमीर खानचा चुलत भाऊ आणि सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक नासिर हुसेन यांचा मुलगा. त्याचं घराणं सिनेसृष्टीशी संबंधित असलं तरी तो मात्र या चंदेरी दुनियेत रमला नाही.
२. रूढार्थाने तो अत्यंत हुशार होता, त्याची शैक्षणिक कारकीर्द देदीप्यमान होती. तो आयआयटी, मुंबईचा माजी विद्यार्थी तर आहेच, पण अमेरिकेतल्या कॉर्नेल आणि एमआयटी अशा नामवंत संस्थांमध्येही त्याचं शिक्षण झालंय. फक्त एकच गोष्ट, या तिन्ही ठिकाणी अभ्यास अर्धवट सोडून हा मनुष्य पर्मनंट ड्रॉप आऊट म्हणून बाहेर पडला.
३. शिक्षण अर्धवट सोडल्यावर आणि मुंबईत परतल्यावर त्याने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा म्हणजे कयामत से कयामत तक! हा सिनेमा प्रचंड हिट झाला. त्यानंतर त्याने स्वतः लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला जो जीता वही सिकंदर आला, त्यानेही त्याला प्रचंड यश मिळवून दिलं. अजून दोन तीन सिनेमे केल्यावर मात्र त्याने सिनेसृष्टीला कायमचा रामराम ठोकायचं ठरवलं आणि तामिळनाडूमधील निलगिरी पर्वतराजीच्या कुशीत वसलेल्या कुन्नूर या छोट्याशा, टुमदार व निसर्गरम्य गावाचा रस्ता धरला. त्यावेळी त्याच्या सोबत होता फक्त त्याचा कुत्रा आणि लॅपटॉप.
४. त्याने उचललेलं हे पाऊल त्याच्या स्वभावाशी सुसंगत असंच होतं. लहानपणापासूनच तो काहीसा एकलकोंडा आणि अंतर्मुख स्वभावाचा होता. शहरी वातावरण, तिथली गळेकापू स्पर्धा, धावपळ, ताणतणाव आणि आवडत नसलेलं काम केवळ त्यात पैसे मिळत आहेत म्हणून तस्सं करत राहणं यापासून दूर जाऊन त्याला शांतपणे जगायचं होतं.
५. लहानपणी त्याची यंत्रांशी खास दोस्ती होती. घड्याळं, टेपरेकॉर्डर्स, मायक्रोफोन्स, रेडिओ अशी यंत्रं खोलून ती पुन्हा जोडणं हा त्याचा खास छंद होता.
६. अमेरिकेतून शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत आल्यावर त्याला शिडाच्या बोटीतून समुद्रात प्रवास करण्याची जबरदस्त इच्छा होती. तेव्हा त्याने आपल्या तीन मित्रांसह साऊथ चायनापासून भारतापर्यंतचा सागरी मार्ग शिडाच्या बोटीतून पार केला. त्या बोटीच्या प्रवासाच्या वेडापायी त्याने अलिबागजवळ मांडवा येथे जागाही घेतली होती.
७. याव्यतिरिक्त पनवेलजवळही त्यांचं एक फार्म होतं. कधी वेळ मिळाला की तो आपल्या बहिणीबरोबर तेथे जाऊन भेंडीची वगैरे रोपं लावायचा. हा त्याचा आवडता पासटाईम होता.
८. मात्र अलिबागजवळची त्याची जमीन त्याला भूसंपादनाच्या कामात सरकारकडे जमा करावी लागली आणि त्यातून पर्यावरण आणि विकास यांच्यातल्या संबंधाचा त्याने अभ्यास सुरू केला. याचदरम्यान त्याचा नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्याशी संबंध आला. त्यांच्याबरोबर तो त्या आंदोलनात सहभागी झाला. नर्मदेच्या खोऱ्यात प्रत्यक्ष फिरला. एकंदर या विषयाचा बराच अभ्यास केल्यावर या सर्वांच्या मुळाशी पृथ्वीवरच्या मर्यादित संसाधनांनी कधीच न भागवता येणारी विकासाची भूक आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्या दरम्यानच त्याने कुन्नुरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
९. सुरुवातीला मन्सूर कुन्नूरला १ वर्ष राहिला, त्यावेळी त्याची बायको टीना आणि मुलं मुंबईतच राहिली. तेव्हा त्याने पर्यावरणपूरक असं फार्म स्टे उभं करण्याचं ठरवलं. पुढे बायकोमुलं आल्यावर त्याने अजून जमीन विकत घेतली. जर्सी गायी, कोंबड्या, बदकं यांची जमवाजमव केली आणि आपल्या स्वप्नातल्या फार्म स्टे चं प्रत्यक्षातील रूप - 'एकर्स वाईल्ड' साकारलं.
१०. अर्थात या सगळ्या प्रोसेसमागे भरपूर मेहनत होती. अजिबात कस न उरलेली जमीन विकत घेऊन पुढे सुमारे २२-२३ वर्षं मेहनत घेऊन, सातत्याने नैसर्गिक खताचा वापर करून मशागत केली तेव्हा त्या जमिनीला हवं तसं रूप आलं. आज त्याच्या फार्म च्या परिसरात सर्व स्थानिक झाडं आहेत आणि इथला जवळपास ८०% कचरा रिसायकल होतो. गोबर गॅस प्लांट, सोलर एनर्जी यांच्या माध्यमातून पर्यावरणाला अजिबात धक्का न लावता या ठिकाणचं काम चालतं.
११. याखेरीज 'एकर्स वाईल्ड'चं एक आणखी उत्पादन म्हणजे इथे बनणारं चीज. गायी असल्याने आणि त्यांचं दूध भरपूर येत असल्याने मन्सूरला चीज बनवण्याची कल्पना सुचली. टिनाच्या मदतीने अनेक प्रयोगांमधून चुका करत शिकत त्यांनी आता यात प्रभुत्व मिळवलं आहे. आज त्यांच्या फार्मवर उत्तम प्रतीचं गॉर्मे, ग्रूएर चीज बनतं आणि त्याला थेट बंगलोरपर्यंत मागणी आहे.
रोजच्या आयुष्याचा कंटाळा आला आहे असं आपल्यापैकी कित्येकांना वाटतं, पण हे असं आयुष्य किती लोकांना प्रत्यक्षात जगायला आवडेल?
लेखिका : स्मिता जोगळेकर