भाग १: विकिपीडियावर हे ६ विक्षिप्त आणि भीतीदायक पेजेस आहेत हे तुम्हाला माहित आहे का ?
पाश्चिमात्त्य देशांत नुकताच ३१ ऑक्टोंबर रोजी Halloween Day साजरा करण्यात आला. या दिवशी लोक बरेच चित्रविचित्र अवतार करतात. तुम्हीही काही लोकांचे भयानक, भूताखेतासारख्या रंगवलेल्या चेहऱ्यांचे फोटो सोशल मिडियावर पाह्यलेच असतील. इतर वेळी सुंदर दिसणारे चेहरे असे भयानक अवस्थेत पहिले की थोडं दचकायलाच होतंच. ह्या Halloween च्या निमित्ताने आज आपण अश्या काही विकिपीडिया पेजेसबद्दल जाणून घेणार आहोत जी वाचण्यासाठी सिंहाचं बळ अंगी असावं लागतं. चला तर मग पाहूया अश्या काही इंटरेस्टिंग, गूढ विकिपीडिया पेजेसबद्दल....
१. डेमॉनिक पझेशन (Demonic Possession) :
Demonic Possession ही एक संकल्पना आहे. त्यात असं मानलं जातं की आत्मा, राक्षस ह्यांचा पृथ्वीवर वास असतो आणि मनुष्याच्या आयुष्यावर त्यांचा प्रभावही असतो. ह्या पेजवर इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, यहुदी धर्मातील आत्मा ह्या विषयावरील संकल्पनेचे विस्तृत स्पष्टीकरण दिलेले आहे. तुम्ही धार्मिक असाल किंवा नसाल, पण हे पेज तुम्हाला प्रचंड धास्ती भरवणार हे नक्की.
२. स्लेंडर मॅन (Slender Man):
स्लेंडर मॅन हे एक काल्पनिक पात्र आहे. २००९ मध्ये क्रिपीपास्ता नावाच्या मनोरंजन वेबसाईटवर स्लेंडर मॅनचे मीम प्रसिद्ध झाले होते. स्लेंडर मॅनचे वर्णन करायचे तर, हा नेहमी काळ्या रंगाच्या सुटमध्ये असतो, त्याची उंची सामान्य माणसांपेक्षा बरीच उंच आहे आणि त्याला कान, नाक, डोळे, ओठ असे कोणतेही अवयव नसलेले एक तोंड आहे.
लहान मुलांमध्ये स्लेंडर मॅनविषयी एकाचवेळी बरीच भीती आणि उत्सुकता निर्माण झाली होती. ह्याचेच एक उदाहरण सांगायचे झाल्यास, २०१४ साली १२ वर्षाच्या एका मुलीला तिच्याच दोन मैत्रिणी जंगलामध्ये घेऊन गेल्या. त्यांनी तिला जमिनीवर झोपून स्वतःच्या अंगावर पालापाचोळा ओढून घ्यायला लावला. तिने तसे केल्यानंतर त्या दोघींनी तब्ब्बल तिच्यावर १९ चाकूचे वार केले. तिला मरणासन्न अवस्थेत सोडून त्या जंगलातून निघून गेल्या. कशीबशी ती मुलगी वाचली. ह्या घटनेच्या तपासणीमध्ये हल्लेखोर मुलींनी पोलिसांना जबाब दिला की स्लेंडर मॅनने त्यांना असे करण्यास सांगितले होते. जर असे केले नाही तर तो आम्हाला देखील मारणार होता असा भयानक खुलासा त्यांनी केला होता.
द रिंग ह्या प्रसिद्ध हॉलीवूड हॉरर मुव्हीमध्ये देखील स्लेंडर मॅन हे पात्र वापरण्यात आले होते.
३. औकीगहारा (Aokigahara):
औकीगहारा हे जपानमधल्या एका जंगलाचे नाव आहे. हे जंगल आत्महत्येचे जंगल म्हणून ओळखले जाते. यामागची कारणंही तशीच आहेत. उबासूट नावाची एक प्राचीन प्रथा जपानमध्ये प्रचलित आहे. ह्या प्रथेनुसार वय झालेल्या किंवा मरणासन्न अवस्थेमध्ये असलेल्या लोकांना जंगलामध्ये मरण्यासाठी सोडले जायचे. औकीगहाराचाही काहीसा असाच इतिहास आहे.
२००३ मध्ये तिथे आत्महत्या केलेल्या लोकांची १०५ प्रेतं मिळाली होती. २००५ मध्ये एकूण २०० लोकांनी इथे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांपैकी ५४ लोक खरोखरी आत्महत्या करण्यात यशस्वी झाले होते. असंही म्हटलं जातं की मार्चमध्ये इथे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढते.
४. रोअनोक कॉलोनी (Roanoke Colony):
१५८३ मध्ये उत्तर कॅरोलीनमध्ये रोअनोक ही वसाहत निर्माण झाली. ११० लोकांची ही वसाहत होती. त्यानंतर बरोबर तीन वर्षानंतर ही वसाहत तिथून गायब झाली. तिथले लोक कुठे गेले? त्यांची घरं कुठे गेली? अशा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळणे कठीण होते, कारण त्या वसाहतीचे कोणतेही अवशेष किंवा पुरावे आजवर मिळालेले नाहीयेत. ह्या घटने संदर्भात बऱ्याच लोकांनी बरेच सिद्धांत मांडले आहेत. पण कोणत्याही सिद्धांताचे आजवर कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीयेत. त्यामुळे १५८६ मध्ये तिथे नक्की काय झाले हे अमेरिकेच्या इतिहासातले आजवरचे सर्वात मोठे गूढ बनून राहिले आहे.
५. द झोडियाक किलर (The Zodiac Killer):
१९६० ते १९७० च्या दरम्यान उत्तर कॅलिफोर्नियामध्ये ह्या मारेकऱ्याने पोलिसांची अक्षरशः झोप उडवून टाकली होती. पाच निष्पाप लोकांचा त्याने क्रूरपणे बळी घेतला होता. पण खुद्द ह्या मारेकऱ्याने पोलिसांना पत्र लिहून कळवले होते की त्याने ३८ लोकांचा बळी घेतला आहे. त्याला पकडण्यासाठी म्हणून त्यांने चार cipher code पोलिसांना पत्राद्वारे पाठवून दिले होते. त्यापैकी एकच कोड पोलिसांना आजवर सोडवता आला आहे. शेवटपर्यंत काही पोलिसांना त्या क्रूर खुनी माणसाला पकडण्यात यश मिळाले नाही.
६. इडिलिया डब (Idilia Dubb):
१५५१ साली स्कॉटलंडमधली १७ वर्षाची इडिलिया आपल्या आई वडिलांसोबत जर्मनी फिरायला गेली होती. तिथे लाहनेक नावाचा एक खूप जुना पडीक राजवाडा आहे. इडिलिया बुरुज पाहण्यासाठी म्हणून एकटीच निघून गेली. ती बुरुजावर तर चढली, पण जेव्हा ती वरती पोहोचली नेमका त्याचवेळी त्या बुरुजाचा जुना लाकडी जिना मोडून पडला. दुर्दैवाने इडिलिया तिथेच अडकून राहिली. बराच वेळ झाला तरी ती आली नाही म्हणून घरच्यांनी पोलिसांना कळवले. खूप तपास करूनही ती कुठेच सापडली नाही. काही महिन्यांनी खिन्न मनाने सगळे स्कॉटलंडला परत आले.
पुढे १५६० साली राजवाड्याचे दुरुस्तीकाम काढले होते. तेव्हा एका कामगाराला बुरुजावर एक हाडाचा सापाळा आढळून आला. सोबत डायरीची काही पाने तिथे होती. आपले शेवटचे दिवस किती भयानक होते, भूक आणि तहानेने आपले किती हाल झाले असं सगळं तिने त्या पानांवर लिहून ठेवलं होत. या घटनेवर आधारित “द डायरी ऑंफ मिस इडिलिया” नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
तर वाचकहो, जगात चित्रविचित्र घटना घडत असतात. कधी त्या घटनांचे तर्कसंगत स्पष्टीकरण देता येते, तर कधी जगातल्या तज्ञांनादेखील त्याची उत्तरं सापडत नाह्यीत. आम्ही तर इथे अशा काहीच घटनांची इथे तोंडओळख करुन दिली आहे. या पेजेसवर जाऊन तुम्हांला या घटनांसंबंधी आणखी महिती मिळेल आणि आणखी अशा काही सुरस-चमत्कारिक घटना वाचायला मिळतील. तुम्हांला यातली कोणती घटना अधिक भयानक-चमत्कारिक वाटते हे आम्हांला नक्की सांगा.
लेखिका : स्नेहल बंडगर