इतिहासात पहिल्यांदाच जुळ्या मुलांचे अवशेष सापडलेत....या संशोधनातून काय माहिती मिळाली आहे ?
रोज नवनवीन शोध लावण्याच्या ज्या काही शाखा आहेत त्यात पुरातत्वशास्त्रही येतं. संशोधनात कधी काय सापडेल याबद्दल काहीच सांगता येत नाही. नुकतंच इतिहासात पहिल्यांदाच जुळ्या मुलांचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष तब्बल ३०,००० वर्ष जुने असल्याचं म्हटलं जातं.
चला तर सविस्तर बातमी वाचूया.
हे अवशेष ऑस्ट्रियाच्या क्रेम्स-वॉचबर्ग भागात सापडले आहेत. सध्याच्या माहितीनुसार या अवशेषांचा काळ अश्मयुगीन आहे. डीएनए चाचणीनंतर अशी माहिती मिळाली की ह्या जुळ्या मुलांची पूर्ण वाढ झाली होती, पण लवकरच त्यांना मृत्यू आला. दोघांचाही मृत्यू एकाचवेळी झालेला नाही. अनुक्रमे ४ आणि ७ महिन्यांच्या कालावधीत त्यांना मृत्यू आला होता. दोघांनाही एकाच जागी पुरण्यात आलं होतं. पुरताना प्रत्येकासोबत त्याकाळी हस्तिदंत आणि कोल्ह्याच्या दातांपासून तयार करण्यात आलेले दागिने पुरण्यात आले होते. हे करण्यामागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. एका मताप्रमाणे मृत्युनंतरच्या आयुष्यासाठी दागिने पुरण्यात आले होते तर दुसऱ्या एका मताप्रमाणे हे दागिने देवांसाठी होते. याखेरीज दुसरा एक शोध असा की हे मृतदेह पिवळसर तपकिरी मातीने माखलेले होते. असं म्हणतात या मातीमुळेच ३०,००० वर्षांनीही त्यांचे अवशेष शाबूत राहू शकले.
हा शोध फार महत्त्वाचा आहे कारण पुरातत्वशास्त्राच्या इतिहासात जुळ्या मुलांचे अवशेष सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. ज्या ठिकाणी हा शोध लागला त्या जागा २००५ पासून उत्खननाचं काम होतं आहे. आजवरच्या कामातून बरेच नवीन शोध लागलेत. भविष्यात ह्या भागातून आणखी काय काय सापडतं हे पाहण्यासारखं असेल.