एका क्लिकमुळे त्याने आयआयटीची सीट गमावली...काय घडलंय नेमकं?
आयआयटीमध्ये ऍडमिशन घेणे हे देशातील लाखो मुलांचे स्वप्न असते. त्यांपैकी काही मुले अशी असतात जी आयआयटीत ऍडमिशन मिळेल इतके मार्क्स आणि पर्यायाने रँक मिळवतात. ही रँक मिळवण्यासाठी त्यांनी दिवस रात्र मेहनत केलेली असते. पण जर आयआयटीत ऍडमिशन होईल एवढे मार्क्स मिळवून देखील एखाद्याला स्वतःच्याच छोट्याशा चुकीमुळे आयआयटीत ऍडमिशन नाही मिळाले तर??? आग्रामधील १८ वर्षांच्या सिद्धार्थ बात्रा याच्या सोबत नेमकं हेच घडलं आहे.
सिद्धार्थने जेईई ऍडव्हान्समध्ये देशात २७० वा रँक मिळवत अशा मुंबईत आयआयटीत ऍडमिशन पक्के केले होते. पण त्याच्याकडून एक छोटीशी चूक घडली. त्याने ऍडमिशन घेतल्यानंतर withdraw from seat allocation या लिंकवर क्लिक केले. याचा अर्थ प्रवेश रद्द करणे. आता त्याने स्वतःच क्लिक केल्यामुळे त्याचे नाव कमी करण्यात आले.
सिद्धार्थने मग उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात आयआयटीने उत्तर दिले की, सर्व काही नियमानुसार झाले आहे, सिद्धार्थ पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा देऊन प्रवेश घेऊ शकतो. एवढी मेहनत केल्यावर छोट्याश्या चुकीसाठी सिद्धार्थ वर्षभर वाट पाहू शकत नाही, त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते यावर सिद्धार्थचे भविष्य अवलंबून आहे.
सिद्धार्थला आई वडील नाहीत. तो आजी आजोबांसोबत राहतो. त्याला अनाथ मुलांना दिली जाणारी पेन्शन देखील मिळते. त्याची वर्षभराची मेहनत वाया जाते की या परिस्थितीतून काही मार्ग निघतो हे आता बघण्यासारखं असेल.