computer

चीनमध्ये इमारतींच्या खाली आढळलेली बुद्धमूर्ती पाहिलीत का? या व्हायरल फोटोंमागे काय गोष्ट आहे वाचा!!

आपल्या शेजारील चीनला बराच मोठा सांस्कृतिक वारसा आहे. बौद्ध परंपरेचा प्रभाव चीनवरही आढळतो. जगातील सर्वात मोठी बुद्ध मूर्तीही चीनमध्येच आहे. अलीकडेच अगदी चार-आठ दिवसांपूर्वी चीनच्या शॉंग्किंग मध्ये एक जुनी बुद्धमूर्ती आढळून आली आहे. यात नवल तसं काही नाही, कारण अशा जुन्यापुराण्या मुर्त्या अधूनमधून सापडतच असतात. या मूर्तीचं कौतुक यासाठी की शॉंग्किंग मधील एका उंच ठिकाणी बांधलेल्या दोन अपार्टमेंट्सच्या पायाशी ही बुद्धमूर्ती आढळून आलेली आहे. परंतु ३० फुट उंचीच्या या बुद्धमूर्तीला शीरच नाही. या बुद्ध मूर्तीचा फक्त खांद्यापर्यंतचा भाग दिसतो. त्याच्या खांद्याच्या वरच्या बाजूलाच या दोन्ही अपार्टमेंटचे बांधकाम केलेले दिसेल. 

ही बुद्ध मूर्ती सुमारे १००० वर्षे जुनी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हे अपार्टमेंट बांधले जात असतानाच इथे बुद्ध मूर्ती असल्याचे कुणाच्या ध्यानात आले नसेल का? हा प्रश्न मात्र अनेकांना अस्वस्थ करत आहे. 

३० फुट उंचीची ही मूर्ती बैठ्या अवस्थेतील आहे. या मूर्तीचे अतोनात नुकसान झालेले आहे. मूर्तीच्या डाव्या पायाची आणि हाताच्या मनगटांची बरीच झीज झालेली आहे. या मूर्तीच्या अंगावर कोरलेल्या बारीक रेषा मात्र स्पष्ट दिसतात. मुळात ही बुद्ध मूर्ती इथल्या खडकातच खोदली गेली आहे. त्यामुळे तिला इतरत्र कुठेही हलवले जाऊ शकत नाही. कदाचित अपार्टमेंटचे बांधकाम करणाऱ्यांना हे आधीच माहित असावे. पण, तरीही लोकांना घरे बांधण्यासाठी या प्राचीन अवशेषाकडे दुर्लक्ष करून त्याच्यावरच बांधकाम चढवले आहे असे दिसते. 

ही बुद्ध मूर्ती शिंग वंशाच्या राजवटीच्या काळातील असावी असा काही जणांचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु स्थानिक नागरिकांसाठी मात्र ही एक धक्कादायक बातमी आहे. कारण आपण राहतो त्या अपार्टमेंटखाली अशी कोणती तरी प्राचीन मूर्ती असावी याची त्यांना कल्पनाही नव्हती. २०२० ने जाता जाता या परिसरातील रहिवाशांना आणखी एक धक्का दिला आहे, असेच म्हणावे लागेल.

गेल्या अनेक वर्षांत मुळात या परिसराकडे कुणाचेच लक्ष नसल्याने इथे छोट्याछोट्या झुडुपांची संख्या वाढली होती. दाट वाढलेल्या या झुडपात एखादी मूर्ती दडली असेल असा कुणालाही संशय आला नसेल. याच इमारतीच्या पाठीमागच्या भिंतीची दुरुस्ती करायची होती. म्हणून इथे वाढलेल्या ते झुडुपांचे जंगल पूर्णतः छाटून टाकल्यावर इथल्या रहिवाशांना ही बुद्ध मूर्ती सापडली आहे. 

काही रिपोर्ट्स नुसार या मूर्तीचे शीर उध्वस्त करण्यात आले आहे तर या मूर्तीचे कोरीवकाम पूर्ण झालेच नाही असेही काही लोकांचे म्हणणे आहे. याठिकाणी या मोठमोठ्या इमारती उभारण्यापूर्वी म्हणजेच १९८७ पर्यंत इथे एक मंदिर होते. हे मंदिर इथून हटवण्यात आले आणि त्याजागी या इमारती उभारण्यात आल्या असेही म्हंटले जात आहे. तरीही इथले मंदिर आणि ही बुद्ध मूर्ती यांचा काही परस्पर संबंध असावा असे वाटत नाही. 

दोन अपार्टमट्सच्या खालच्या बाजूला असलेल्या या बुद्ध मूर्तीचे फोटो सोशल मिडियावरून तुफान व्हायरल झाले आहेत. तेंव्हा कुठे  या जिल्ह्याच्या माहिती कार्यालयाने या बातमीची दखल घेतली. या कार्यालयाने या बुद्ध मूर्तीची पूर्ण माहिती काढण्यासाठी तपास सुरु केला आहे. तसेही चीनमध्ये प्राचीन काळातील असे कितीतरी अवशेष सापडत असतात. परंतु, शीर नसलेल्या या बुद्ध मूर्तीमुळे सरकारी कार्यालयेही खडबडून जागी झाली आहेत. अपार्टमेंट मधून निघणारे पाणी वगैरे या मूर्तीवरूनच वाहून खाली येत असल्याने या मूर्तीचे गंभीर नुकसान झाले आहे आणि इथून पुढेही होऊ शकते. शिवाय, कित्येक वर्षे याकडे कुणाचे लक्षच नसल्याने या मूर्तीचा पाया देखील डळमळीत झाला आहे. 

चीनच्या सरकारने या मूर्तीचा अभ्यास करून तिचे जतन कसे करता येईल याबाबत अभ्यास करण्यासाठी तज्ञांची एक समिती नेमली आहे. या मूर्तीचा कालावधी कोणता, तिची पडझड कशामुळे झाली आणि तिचे जतन करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा सगळा विस्तृत अहवाल लवकरच ही समिती सादर करेल अशी आशा आहे. नानन जिल्ह्याच्या पुराशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणाले की, “सध्या तरी या मूर्तीबद्दल कुठलेही ठोस विधान आम्हाला करता येणार नाही. यासाठी विभागाच्या वतीने तज्ञांची समिती नेमून या मूर्तीबद्दलचा सविस्तर अहवाल मागवला जाईल.”

याच परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने शॉंग्किंग रेडीओवर दिलेल्या माहितीनुसार, “१९४९ साली जेव्हा पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची सत्ता आली तेव्हा या मूर्तीच्या खोदकाम बंद करण्यात आले.” या परिसरात राहणाऱ्या अनेक वयोवृद्ध लोकांच्या मते या मूर्तीचे खोदकाम १९व्या शतकातच सुरु करण्यात आले होते जे नंतर बंद पाडण्यात आले. त्यामुळे ही मूर्ती कधीची, कोणत्या कालखंडात खोदली गेली आणि तिला शीर का नाही, होते तर ते कशामुळे नाहीसे झाले अशा अनेक प्रश्नांची मालिका सध्या तरी अनुत्तरीतच आहे. 

 

लेखिका : मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required