computer

ही कंपनी फेकलेल्या कपड्यातून सुती धागा वेगळा करत आहे, पण का? सुती धाग्याचं काय महत्त्व आहे?

जुन्या कपड्यांचं आपण काय करतो ? या प्रश्नाचं सोपं उत्तर आहे की नाईलाज होईस्तो ते वापरतच राहतो. म्हणजे आधी रात्री झोपताना नाइट ड्रेस म्हणून वापरतो .नंतर त्याचे तुकडे कापून साफसफाईला वापरतो आणि शेवटी निरुपाय म्हणून फेकून देतो. बर्‍याच वेळा बोहारणीला जुने कपडे देऊन नवी भांडी वगैरे घेतो. नाहीच तर अनाथाश्रमाला किंवा गरजूंना दान करून पुण्य मिळवतो. हा झाला आपला भारतीय फंडा! विदेशात कपडे जुने झाले की कचर्‍याच्या कुंडीत जातात आणि तेथून थेट जमीन भरावात म्हणजे लँड फिलींगमध्ये जातात. एकूण फेकलेल्या कपड्यापैकी ८५% कपड्यांची विल्हेवाट या पध्दतीने केली जाते.

या सर्व कपड्यात सिंथेटिक फायबर म्हणजे पॉलिस्टर, रेयॉन सारख्या कृत्रिम धाग्याचा वापर केलेला असतोच, पण सोबत सुती धाग्यांचाही वापर केला असतो. या फेकून देण्याच्या लायकीच्या कपड्यांतून सुती धागा वेगळ करण्याचा 'सर्क्युलोज' या कंपनीने हाती घेतला आहे. आता प्रश्न असा आहे की हे असं का करायचं तर त्यासाठी कापूस ते सुती धागा या प्रवासासाठी किती खर्च येतो ते पाहूया.

एक किलो धाग्याची निर्मिती करण्यासाठी सुमारे २०,००० लिटर पाणी, ४५० ग्रॅम खत, १६ ग्रॅम कीटक नाशक वापरले जाते. याउलट पॉलिस्टर धाग्याच्या निर्मितीसाठी १.५ किलो तेल आणि १७ लिटर पाणी वापरले जाते. तसं पाहता कृत्रिम धागा बनवायला कमी प्रमाणात घटकपदार्थ लागत असले तरी पुन्हा त्यांचा काहीच उपयोग नसतो. याउलट सुती धागे बनवायचा खर्च अधिक असला तरी ते धागे पुन्हापुन्हा वापरून तो खर्च पुरेपूर वसूल करता येतो. थोडक्यात आणि महत्वाचे सांगायचे ते असे की सुती कपडा फेकून देण्यात आपण पर्यावरणाचे अधिकाधिक नुकसान करत असतो.

सर्क्युलोजच्या संकल्पनेनुसार अशा फेकून दिलेल्या कपड्याच्या आधी चिंध्या केल्या जातात. त्यातून झिप, बटन, टिकल्या किंवा तत्सम इतर प्लॅस्टिकची सजावट काढून टाकली जाते. त्यानंतर या चिंध्यांचा रंग काढण्यात येतो. त्यातून पॉलीस्टरसारखे कृत्रिम धागे वेगळे करण्यात येतात. या प्रक्रियेतून कापसाची म्हणजे सेल्यूलोजची एक "कढी" तयार होते. ती साच्यात ओतून पुन्हा एकदा 'कापूस' जन्माला येतो. या पुन्हा निर्माण केलेल्या कापसापासून सुती धाग्याची निर्मिती केली जाते आणि नवा कपडा तयार होतो.

साहजिकच या प्रक्रियेत लागणारी उर्जा कुठून येते हे महत्वाचे आहे. नाहीतर पर्यावरणाची जपणूक करण्याचे उद्दीष्टच नाहिसे होईल. तर ही उर्जा पण "रिन्युएबल एनर्जी' म्हणजे सौर ऊर्जेसारख्या माध्यमातील वापरली जाते. अशा नव्या संकल्पना जोपर्यंत फॅशन जगतातील मोठे ब्रँड वापरत नाहीत तोपर्यंत त्याचे महत्व सर्वांपर्यंत पोचत नाही. सर्क्युलोजच्या या संकल्पनेला लिव्हाईस, एच अँड एमसारख्या मोठ्या कंपन्यांनी उचलून धरले आहे. टाइम मॅगेझीननेही २०२० च्या अभिनव कल्पना या सदरात 'सर्क्युलोज'चा अंतर्भाव केला आहे.

अशा काही कल्पना तुमच्याही मनात आहेत का? असतील तर जरूर कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सगळ्यांना सांगा! काय माहित, कदाचित २०२१ च्या अभिनव कल्पनांमध्ये तुमची कल्पनाही समाविष्ट असेल!

सबस्क्राईब करा

* indicates required