computer

भारतातल्या राजे-राण्यांच्या संग्रहातले ९ मौल्यवान दागिने!!

भारताला एके काळी 'सोने की चिड़िया' म्‍हटले जायचे. तेव्हा असलेल्‍या राजा- महाराजांच्‍या श्रीमंतीची चर्चा आजही जगभरात होते. त्यांनी त्यावेळी बनवलेले अनेक दागिने आजही बघितले तर थक्क व्हायला होते. त्या दागिन्यांत वापरलेले हिरे, मोती, माणिक यांची मनमोहक कलाकुसर पाहून फार आश्चर्य वाटतं. दागिने हा विषय स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा असला तरी फक्त राण्यांचे दागिनेच नाही तर राजा महाराजांच्‍या दागिन्यांनाही खूप महत्त्व होतं. आजच्या लेखात भारताच्या वेगवेगळ्या राजघराण्यांतील काही अत्यंत मौल्यवान दागिन्यांची यादी पाहुयात.

१. पटियालाच्या महाराणी श्री बख्तावर कौर साहिबा यांचा रुबी (माणिक) चोकर

१९३१ मध्ये महाराजा भूपिंदरसिंग यांनी आपली पत्नी महाराणी श्री बख्तावर कौर साहिबा यांना एक अतिशय मौल्यवान हार भेट म्हणून दिला. चोकर पद्धतीचा म्हणजे असा हार जो मानेपासून सुरू होतो. या अद्भुत चोकरचे वैशिष्ट्य म्हणजे हा हार अनेक माणिक, मोती आणि हिरे वापरून तयार केला होता. याच्या वरच्या भागात माणिकाचे सहा पदर होते आणि बाजूला हिरे आणि मोती आहेत. बघताक्षणी कोणतीही स्त्री या चोकरच्या प्रेमात पडेल असाच हा म्हणावा लागेल.

२. महाराजा भूपिंदरसिंग यांचा पटियाला हार

हा मौल्यवान हार तयार करण्यासाठी जगातल्या ७व्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या हिऱ्याचा वापर केला गेला होता. मध्यभागी असलेल्या हिऱ्याला 'डी बीअर्स' म्हणतात. तो २३४ कॅरेटचा आहे. या पूर्ण हारामध्ये २९३० हिरे आहेत. हा अतिशय सुंदर अमुल्य हिरेजडित हार १९८२मध्ये पटियालाच्या महाराजा भूपिंदर सिंगसाठी तयार केला होता. या हारात प्लॅटिनम, हिरे, झिरकनिआस (zirconias), पुष्कराज, कृत्रिम माणिक, स्फटिक व काही बर्मी (Burmese) माणिकही होते.

३.  काश्मिरी राजकन्येसाठी बनवलेला खास मुकुट

अगदी पूर्वीच्या काळात काश्मिरी राजकन्या खास एक मुकुट घालायच्या. हा मुकुट म्हणजे अगदी उंच टोपीसारखा नसायचा तर मिस वर्ल्ड जिंकल्यावर जश्या जिंकलेल्या मुली परिधान करतात तसा असतो. तीन थरांच्या या मुकुटात चार किन्नरी म्हणजे अर्धा स्त्री आणि अर्धा पक्षी असे डिजाईन केले गेले आहे. ९व्या शतकात केलेला हा दागिना अतिशय मनमोहक आहे.

४. महाराजा दुलीपसिंग यांचा हिऱ्याचा शिरपेच 

लाहोरच्या महाराजा दुलीपसिंग यांचे हे चित्र आहे. नीट पाहिले तर त्यांच्या पगडीसारखा मुगुट दिसतो. आणि त्या पगडीत ३ हिरेजडित पिसे दिसतात. तिनही पिसांमध्ये एक मध्यभागी सुंदर पाचू जडलेला दिसतो. हा सुरेख शिरपेच हिऱ्यांनी बनवलेला असल्यामुळे अतिशय मौल्यवान आहे.

५. बडोद्याच्या महाराणी सितादेवी यांचा हिऱ्याचा हार 

बडोद्याचे मल्हारराव गायकवाड यांनी आपल्या पत्नी महाराणी सितादेवी यांच्यासाठी हा विशेष हार बनवून घेतला आहे. १२८ शुद्ध कॅरेटच्या Star of the South diamond नावाच्या हिऱ्यापासून हा तीनपदरी हार बनवला गेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यात ७८.५ कॅरेटचा इंग्रजी ड्रेस्डेन हिराही आहे. त्याकाळी या हाराची किंमत तब्बल २ कोटी (£८०,०००) इतकी होती. हा अमूल्य स्टार ऑफ द साउथ हार सितादेवीच्या नंतर मुंबईच्या रुस्तमजी जामसेजी यांनी २००२ साली विकत घेऊन कार्टियरला विकला.

६. बडोद्याच्या महाराजांचा मोत्यांचा हार

बडोद्याचे महाराजा खंडेराव गायकवाड यांनी हा हार १८६० साली बनवून घेतला. हा मनमोहक सातपदरी हार नैसर्गिक मोत्यांपासून बनवला आहे आणि विशेष म्हणजे या मोत्यांची चमक १५० वर्षानंतरही कायम राहिली आहे.

७. नवानगरच्या महाराजाचा पाचूचा हार

नवानगरच्या म्हणजे सध्याचे गुजरातमधील जामनगर येथील महाराजांचा हा हार होता. या सुरेख हारामध्ये १७ आयताकृती आकाराचे २७७  कॅरेटचे पाचू आणि हिरा वापरले गेले आहेत. पेंडेंट तयार करताना पाचूचे वजन ७० कॅरेट होते. असे म्हणतात की ते एकेकाळी तुर्कीच्या सुलतानच्या संग्रहातील होते.

८. इ.स.पूर्व १ शतकातील सोन्याच्या कानातले 

सातवाहन घराण्याशी संबंधित असलेली ही सोन्याच्या कानातली जोडी आहे. याला खूप मोठं ऐतिहासिक महत्व आहे. कानांना सजवणारी ही ऐतिहासिक मनमोहक जोडी आंध्र प्रदेशात सापडली.

९. महाराजा भूपिंदर सिंग यांचा हिऱ्यांनी सजलेला शिरपेच.

पटियाला येथील महाराजा भूपिंदरसिंग यांनी आपल्या पगडीवर हा हिऱ्यांचा शिरपेच बनवून घेतला होता. यामध्ये अनेक मौल्यवान रत्ने वापरली गेली आहेत. याचा जेव्हा लिलाव झाला तेव्हा त्याची किंमत १,७०,००० डॉलर इतकी झाली. इंग्रजांनी मुकुट घालण्यास मनाई केल्यावर महाराजांनी त्यांच्या पगडीवर हा शिरपेच घातला होता. या दागिन्याला एक वेगळेच ऐतिहासिक महत्त्वही आहे.  

तुम्हाला कोणता दागिना सर्वात जास्त आवडला, नक्की कळवा.

 

लेखिका: शीतल दरंदळे

 

आणखी वाचा: 

वाचा बडोद्याच्या महाराजांनी बनवलेल्या रत्नजडित 'पर्ल कार्पेट'ची ऐतिहासिक कहाणी !!

प्रिन्सीची कथा...एका राजपुत्राची शोकांतिका !!

रक्तरंजित सूडाची कहाणी...भाग एक !!!

रक्तरंजित सूडाची कहाणी...भाग दोन !!!

सबस्क्राईब करा

* indicates required