computer

आपण या आजोबांचे मिम्स पाहून हसत राहिलो आणि या बाईंनी १४ लाख कमावले...वाचा संपूर्ण प्रकरण !!

'जे पिकतंय ते विकतंय' हे जुनं झालं, सध्या 'जे ट्रेंड होतंय ते विकतंय' असंच म्हणायचे दिवस आले आहेत. हो बघा ना! नुकताच अमेरिकेचे सिनेट सदस्य बर्नी सँडर्स यांचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. अमेरिकेचे नवीन अध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे बर्नी सँडर्स यांच्या फोटोची. त्यांची अत्यंत साध्या पोशाखात पाय क्रॉस करून बसलेली आकृती इतकी प्रसिद्ध झाली की त्याच्या मीम्स बनल्या. त्या हसून हसून पोट दुखवणाऱ्या मीम्स फक्त अमेरिकेत नाही तर जगभर व्हायरल झाल्या आहेत. भारतात ही अनेक प्रसिद्ध सिनेस्टार्सनी आपल्या इंस्टा पेजवर या मीम्स प्रसिद्ध केल्या आहेत.

याच मजेदार फोटोच्या मीम्सचा फायदा टेक्सासच्या ४६ वर्षीय महिलेने घेतला आणि आज ती प्रसिद्ध झाली आहे. टेक्सासच्या कॉर्पस क्रिस्टी येथे राहणारी टोबे किंग असे त्या महिलेचे नाव आहे. तिने बर्नी सँडर्स यांचा व्हायरल झालेल्या फोटोची हुबेहूब जुळणारी लोकरीची बाहुली तयार केली आणि ती बाहुली चक्क १४ लाखात (२०,३०० डॉलर्स) विकली आहे. विश्वास बसायला अवघड जातंय ना?

टोबे किंग सुरुवातीला ९ इंच बाहुल्याचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले. ती बाहुली लोकांना इतकी आवडली की त्याला लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळाले. ही लोकरीची बाहुली बनवायला त्यांना सात तास लागले. त्यानंतर त्यांनी ती बाहुली ईबेवर पोस्ट केली आणि ती लिलावात १४ लाख या किमतीला विकली गेली.परंतु टोबे किंग यांनी ती संपूर्ण रक्कम स्वतःकडे न ठेवता व्हेरमाँटमधील लंच ऑन व्हीलला दान केली आहे. त्यांनी सांगितले की लोकांना मदत करण्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतला.

टोबे किंग यांचे ऑनलाइन स्टोर आहे. त्यांनी यापूर्वीही अनेक नेत्यांच्या लोकरीच्या बाहुल्या बनवल्या आहेत. त्या लोकप्रियही ठरल्या आहेत, पण आता बनवलेली सँडर्स बाहुली ही सर्वाधिक विकली जात आहे. आतापर्यंत ३०,००० पेक्षा जास्त लोकांनी त्यांच्या एटीसी स्टोअरमधून तिची लोकरीची सँडर्स बाहुली खरेदी केली आहे.

खरंच कलाकारी कधी कुठे उपयोगी येईल आणि प्रसिद्ध करून जाईल हे सांगता येणार नाही. एखादं मिम व्यवहारात किती उलाढाल करू शकतो, हे ही नव्यानं सिद्ध झालं. तुमचं काय मत आहे?

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required