गोरेपणा म्हणजे काय? त्वचा उजळण्यासाठी हे ५ उपाय पाहून घ्या !!
गोरी गोरी पान, फुलासारखी छान!! दादा मला एक वहिनी आण !! अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गाण्यांनी लहानपणापासूनच आपल्या मनावर गोरेपणाचे वेड बिंबवलेले असतं. मग तेच शिकत आपणही मोठे होत जातो. बरं हे आजचं वेड नाही तर शेकडो वर्षं जुनं वेड आहे. आपला संपूर्ण समाजच गोर्या रंगाचा मानसिक गुलाम आहे. कदाचित गोर्यांनी केलेल्या दिडशे वर्षांच्या राज्यामुळे समजूत आणखीनच घट्ट झाली असावी. त्यामुळेच 'गोर्या रंगाचा बाजार' आपल्याकडे कळत न कळत वाढतच गेला.
एखादी सावळी मुलगी दिसली की लगेच शेजारीपाजारी, म्हातारे-कोतारे, नातेवाईक सर्व लोक तिच्यावर सूचनांचा भडीमार करत असतात. तू केशर दूध पीत जा, तू अमुकतमुक बापूंचा लेप लावत जा, तू सकाळी सकाळी गुलाबजल लाव, अमुक कंपनीचा फेसवॉश वापर, जास्त चहा पिऊ नको, उन्हात जाऊ नको,गुलाबी कपडे वापरत जाऊ नको. इतकंच नव्हे तर आपल्या मुलीला कुणी थेट काळं म्हणू नये
ती सावळी आहे, गव्हाळ आहे, निमगोरी आहे, वगैरे असं वर्णन केलं जातं. हळदीचा लेप ते स्किन ग्राफ्टींग म्हणजे प्लास्टीक सर्जरी अशा सारख्या अनेक उपायांनी गोर्या रंगाचा पाठलाग केला जातो आहे. बोभाटाच्या एका लेखातून या सामाजिक समजूती बदलणार नाहीत पण हे 'गोरे' बनवण्याचे उपाय खरोखर रंग बदलतात की हे उपाय म्हणजे निव्वळ थेरं आहेत हे आज आपण बघू या !
सर्वप्रथम त्वचेचे गोरे दिसणे आणि त्वचा तजेलदार दिसणे या दोन्हीतला फरक समजून घेणे आवश्यक आहे. त्वचेचा तजेला आरोग्याचे निदर्शक आहे आणि गोरा रंग हे त्वचेच्या काही घटकांवर अवलंबून असते. पण या दोन्ही गोष्टींचा एकत्र गोलमाल करून गेली अनेक वर्षं ग्राहकांना लुटण्याचे काम अनेक कंपन्या करत आहेत.
गोरे होण्यासाठी अनेक क्रीम बाजारात आहेत. यांची किंमत ८० रुपये ते ८०० रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकते. १९७८ तेव्हाच्या हिंदुस्थान लिव्हरने फेयर अँड लवली बाजारात आणले . त्याचे भरभरून मार्केटिंग केले. हे क्रीम सात दिवसात रंग उजळवून देते,असे त्यांचे मार्केटिंग झाले. नंतर फॉरेवर, फेयर अँड हॅण्डसम वगैरे बरीच उत्पादने आली.या कंपन्यांनी अनेक कोटींचा व्यापार केला आणि प्रचंड नफा कमावला.काही दिवसांपूर्वी सात दिवसात रंग उजळवून देणाऱ्या क्रीमच्या कंपनीवर दावा ठोकला गेला. परिणामतः कंपनीला त्या क्रीमचे नाव बदलावे लागले. आता त्या क्रिमचे नाव बदलून ग्लो अँड लव्हली ठेवण्यात आले आहे.
गोरेपणा म्हणजे काय?
तर सूर्याच्या घातक किरणांपासून त्वचेला वाचवण्यासाठी शरीराने तयार केलेला एक घटक असतो, त्याला मेलॅनिन म्हणतात. त्यामुळे जितके जास्त प्रमाणात मेलॅनिन तयार होते तितका त्वचेचा रंग काळा असतो. व्हिटामिन सी, व्हिटामिन बी-6 असे शरीरातील काही घटक हे मेलॅनिन तयार करायचे प्रमाण कमी करतात.
अॅलोपॅथीमध्ये बरेच अशा औषधांचा समावेश केला आहे जी आपल्यासाठी सहज उपलब्ध होतील आणि वापरता येतील.
1. केजोईक अॅसिड: याच्या नावात अॅसिड असले तरीही हे त्रासदायक नाही. केजोईक अॅसिड हा त्वचा उजळ करणाऱ्या साबणांमधला मुख्य घटक असतो. हा पूर्णपणे नैसर्गिक घटक आहे.
2. ग्लुटाथायॉन: हा सुद्धा नैसर्गिक घटक असून केजॉईक अॅसिडबरोबर त्वचा उजळ करणाऱ्या साबणांमध्ये वापरला जातो. त्याद्वारे साबणाची उपयुक्तता वाढवली जाते.
3. व्हिटॅमिन सी: हा घटक वापरून तयार केलेले क्रीम बाजारात मिळते. हे व्हिटॅमिन त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. रंग उजळणे, सुरकुत्या तयार होण्याचा वेग मंदावणे, त्वचा नितळ होणे, त्वचा न ओघळणे असे अनेक परिणाम दिसतात.
4. अॅलोपॅथीमध्ये ज्येष्ठमधाचा वापर रंग उजळण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.बरेच फेस वॉशमध्ये आणि क्रीम्समध्ये मुख्य घटक म्हणून ज्येष्ठमधाचा अर्क वापरला जातो.
5. अमोनिया: अमोनिया हा ब्लिचिंग करणारा घटक आहे. तो त्वचेला तात्पुरता गोरेपणा देतो, नंतर त्वचा काळी पडते. त्यामुळे ब्लीचचा वापर शक्यतो मर्यादित असावा. ब्लिच वापरण्यापूर्वी नेहमी हाताच्या कोपऱ्याला थोडेसे लावून बघावे. ते जर शरीराला सहन होत असेल तरच त्याचा वापर करावा.
याव्यतिरिक्त काही घरगुती उपाय सुद्धा करता येतात.
मसुराची डाळ भिजू घालून नंतर तिचे वाटण फेस पॅक म्हणून वापरता येते. बटाटा किसून घेऊन त्याचा किस त्वचा उजळ व्हावी म्हणून वापरता येतो. त्वचा उजळून निघते आणि त्वचेला अपाय होत नाही.
गोरेपणा मिळवणे ही भारतात सामान्य बाब असली तरी ही फार चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे ज्या मुलींचा रंग गोरा नाही त्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यांना काळी हे विशेषण कायमचे चिटकून जाते.
पण आता महिला सशक्तिकरण होत चालले आहे. मुली स्वतःच्या रंगाला आहे तसेच स्वीकारत आहेत. लोकांचे टोमणेवजा सुचना आणि सल्ले यांच्याकडे सहज दुर्लक्ष करत आहेत. कॉस्मेटिकवर भारंभार खर्च करणे, कुणी काळे म्हणले म्हणून दुबळे पडणे, या गोष्टी कमी होत आहेत. त्यांच्या सुंदरतेच्या व्याख्या जाहिरात कंपन्या आता ठरवू शकत नाहीत. कारण त्यांना माहीत झाले आहे की त्या जशा आहेत तशाच सुंदर आहेत.
आता समाज म्हणून आपले कर्तव्य आहे की आपणही काळया गोऱ्याचा भेदभाव मिटवला पाहिजे. नाही का?