computer

जगभर भारताची मान अभिमानाने उंचावणारे १० लहानगे !!

"वय लहान पण कार्य महान" या उक्तीला खरे ठरवणारे लहानगे आज भारताचं नाव मोठं करत आहेत. आज अश्या १० भारतीय लहान मुलांची कामगिरी पाहुयात. त्यांनी केलेलं काम पाहून त्यांचा अभिमान वाटेल.

१. रमेशबाबू प्रग्नानंधा

रमेशबाबू प्रग्नानंधा हा चेन्नईतील बुद्धिबळपटू आहे. २०१६ला तो अवघ्या १०व्या वर्षी सर्वात लहान international master पदवी मिळवणारा बुद्धिबळपटू बनला. २०१८ ला त्याने बुद्धिबळात ग्रँडमास्टर हे शीर्षकही जिंकले. हे जिंकणारा तो फक्त चौथा सर्वात लहान बुद्धिबळपटू ठरला. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्याने १८ वर्षाखालील विभागात वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचला. आता तो फक्त १५ वर्षांचा आहे आणि पुढचे अनेक खिताब जिंकण्याची तयारी करत आहे.

२. लिडियन नादस्वरम

लिडियन नादस्वरम हा  चेन्नईचा  पियानो वादक आहे. त्याने अवघ्या १३व्या वर्षी सी.बी.एस. टॅलेंट शो जिंकून १०लाख डॉलर एवढी रक्कम बक्षीस म्हणून जिंकली आहे. त्यांचा पियानोवरचा वेगही इतका जबरदस्त आहे की फक्त १ मिनिटात त्याने २८० बिट्स वाजवल्या. हा वेग त्याने नंतर ३२५ बिट्सपर्यंत वाढवून सगळ्यांना थक्क केले. मोठ्या संगीतकारांनी जे अनेक वर्षे रियाज करून साध्य केले ते याने अवघ्या १३व्या वर्षी मिळवले. ए. आर. रेहमान केएम म्युझिक कंझर्व्हेटरीमध्ये त्याने ४ वर्ष शिक्षण घेतले. त्याचे यूट्यूब चॅनेलही खूप गाजत आहे.

३. लिकीप्रिया कांगुजम

मणिपूरमधील हवामान कार्यकर्ती लिकीप्रिया कांगुजम ही भारताची ग्रेटा थनबर्ग म्हणून ओळखली जाते. २०१२ मध्ये स्पेन येथे आयोजित United Nations Framework Convention on Climate Change (COP2) मधील सर्वात तरुण सदस्यांमध्ये लिकीप्रियाही उपस्थित होती. त्यावेळी ती केवळ ८ वर्षांची होती. वयाच्या  ६ व्या वर्षापासून ती अनेक सभांना उपस्थित राहून पर्यावरणाचे प्रश्न मांडत होती. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी तिने भारतीय संसद भवनाच्या बाहेर एक आठवडाभर ही मोहीम राबवली. ऑगस्ट २०१९ मध्ये तिला ऑस्ट्रेलियामध्ये "वर्ल्ड चिल्ड्रेन्स पीस प्राइझ" हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जानेवारी २०२० मध्ये  वॉशिंग्टन डीसी येथील अर्थ डे नेटवर्कच्या मुख्यालयाने तिला "राईझिंग स्टार" ही पदवीही दिली.

४. अर्शदीप सिंग

अर्शदीप सिंग हा जालंधरचा सर्वात लहान वन्यजीव छायाचित्रकार आहे. २०११ मध्ये त्याने प्रतिष्ठित 'यंग वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर– एशिया' हा पुरस्कार जिंकून इतिहास रचला. अवघ्या दहा वर्षांचा असताना त्याने ही कामगिरी केली. कचर्‍याच्या पाईपमधून डोकावणाऱ्या दोन घुबडांचा फोटो त्याने इतक्या लिलया टिपला की त्याला हा पुरस्कार मिळाला. त्याच्या  वडिलांनी ५व्या वाढदिवसाला एक कॅमेरा आणि लेन्स गिफ्ट केले तेव्हापासून त्याला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. त्याने घरातील पाळीव प्राणी आणि पक्ष्यांचे फोटो टिपण्यास सुरवात केली. २०२० मध्ये त्याला Wildlife Photographer of the Year 2020 (११-१४ वर्ष वयोगट) म्हणून गौरवण्यात आले आहे.

५. कौटिल्य पंडित

कौटिल्य पंडित हा हरियाणाचा 5 वर्षाचा अलौकिक बुद्धिमत्ता असलेला मुलगा. त्याचा बुद्ध्यांक १३० इतका आहे. त्याचे सर्व क्षेत्रात असलेलं ज्ञान ऐकून त्याला  "Google बॉय" म्हणून ओळखले जाते. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींमध्ये त्याला इतकं ज्ञान आहे की त्याला मानवी संगणक म्हणूनही ओळखले जाते.  कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय २१३ देशांची माहिती त्याला चुटकी सरशी आठवते. वयाच्या फक्त सहाव्या वर्षी कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर तो सर्वात लहान स्पर्धक होता. जानेवारी २०२० मध्ये कौटिल्यला ग्लोबल चाइल्ड प्रॉडजी या पुरस्काराने गौरविण्यात आले.

६. यथार्थ मूर्ती

यथार्थ मूर्ती हा कर्नाटकातील १४ वर्षांचा anthemologist(मानववंशशास्त्रज्ञ) आहे.  त्याने २६० पेक्षा जास्त देशांचे राष्ट्रगीत गाऊन विक्रम केला आहे. त्याचे नाव  एकदाच नव्हे तर दोनदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. मूर्ती कीबोर्डवर सगळी राष्ट्रगीतं वाजवू शकतो. २०१७ मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदल्यानंतर आता तो गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवण्यास उत्सुक आहे. गेल्या काही वर्षांत त्याने बरीच पदके आणि पुरस्कार जिंकले आहेत. जानेवारी २०२० मध्ये त्याला ग्लोबल चाइल्ड प्रॉडजी अवॉर्डही मिळाला आहे.

७. निहाल राज

निहाल राज हा जगातील सर्वात तरुण शेफपैकी एक आहे. तो फक्त दहा वर्षांचा आहे. तो केरळचा आहे. २०१५ मध्ये त्याची मिकी माउस मॅंगो आईस्क्रीम ही रेसिपी खूप गाजली. त्याची वेबसाईट आहे आणि युट्युब चॅनेलवरही जगभरातून अनेक फोल्लोवर्स आहेत. फेसबुकने त्याच्याशी तब्बल २००० डॉलर्सचा करार केला. त्याने एलेन डीजेनेरेस शो मध्ये केरळचा लोकप्रिय नाश्ता 'पुट्टू' हा पदार्थ एलेनला शिकवला. इतक्या लहान वयात त्याचे स्वयंपाकातले कौशल्य पाहून खरच खूप कौतुक वाटतं.

८. अद्वैत कोलारकर

अद्वैत कोलारकर हा  कॅनडामधील  चिमुरडा फक्त ५ वर्षाचा कलाकार आहे. तो चित्रकार आहे. त्याने आतापर्यंत भारत, अमेरिका आणि कॅनडा येथे चित्र प्रदर्शन भरवले आहे. त्याचे पेंटिंग हजारो डॉलर्सला विकले जात आहेत.  फक्त २ वर्षाचा असताना त्याला रंग आणि रेषांची भाषा कळली. त्याच्या चित्रांची समज पाहून पुण्यात त्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले गेले. त्याचे खूप कौतुक झाले. अलीकडेच, न्यूयॉर्कमधील वार्षिक आर्ट एक्स्पो येथे त्याची चित्र प्रदर्शित केली गेली. ४० वर्षांच्या इतिहासात तो आतापर्यंत सर्वात लहान चित्रकार ठरला. तिथे आतापर्यंत त्याने ३८ चित्रे विकली आहेत. सध्या तो कॅनडात स्थायिक आहे.

९. तृप्तराज पांड्या

२०१३ साली तबला मास्टर तृप्तराज पांड्या याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून प्रमाणपत्र देण्यात आले.  तेव्हा तो ६ वर्षांचा होता. सर्वात लहान वयाचा तबला मास्टर म्हणून त्याचे नाव गिनीज बुक मध्ये नोंदवले गेले. वयाच्या अवघ्या दीड वर्षांपासून तो तबला वाजवू लागला. त्याने ३ वर्षांचा असताना ऑल इंडिया रेडिओवर त्याने तबला वाजवला. तो ४ वर्षाचा असताना दूरदर्शनवरही त्याचा तबलावादनाचा कार्यक्रम झाला.

१०. तिलक मेहता

तिलक मेहता हा १५ वर्षाचा मुलगा भारतातील सर्वात तरुण उद्योजकांपैकी एक आहे . १३व्या वर्षी त्याने मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या मदतीने एक डिजिटल कुरिअर कंपनी बनविली. २०१८ मध्ये 'पेपर एन पार्सल' नावाची कंपनी स्थापन केली. त्याची कंपनी अगदी पेन पासून सर्व आवश्यक कागदपत्र डोअर पिक-अप आणि वितरण करते. जानेवारी २०२० मध्ये त्याला ग्लोबल चाइल्ड प्रॉडजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

मोठ्यांना ही लाजवेल अशी कामं ही लहान मुलं करत आहेत. यांच्या कार्याला, बुद्धिमत्तेला, कौशल्याला बोभाटाचा सलाम. लेख आवडल्यास नक्की शेयर करा.

 

लेखिका:  शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required