computer

ब्रिटीशांच्या बंदीमुळे अशी उभी राहिली देशातली सर्वात मोठी पेंट कंपनी!!

घर म्हणजे काय असतं ? नुसत्या चार भिंती एक छप्पर असलेली इमारत म्हणजे घर नसतं. प्रत्येक घरात एक चैतन्य असतं. आपलं घर म्हणजे आपलं स्टेटस असतं. आपलं घर एका आपल्यासाठी खूप काही असतं...!

आपलं घर सुंदर दिसलं पाहिजे यासाठी आपण हरेक प्रयत्न करतोच करतो. या सगळ्यात एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे घराला दिलेला रंग. घराला महत्व येतं ते घराला दिल्या जाणाऱ्या रंगामुळे. आज “हर घर कुछ केहेता हैं,” असे म्हणत एशियन पेंटने आपल्या घरांना आपलेपणाचा रंग दिला. भारतीय बाजारपेठ, भारतीय ग्राहकांची मानसिकता यांचा विचार करत आजवर एशियन पेंट्सने बरेच प्रयोग केले. त्यांच्या या प्रत्येक प्रयोगाने त्यांना भारतीयांच्या अधिकाधिक जवळ आणलं आणि त्यांच्यासाठी अधिकाधिक प्रगतीचे दरवाजे खुले झाले.

ज्याकाळी भारतात चले जाव आंदोलन जोर धरत होतं, त्याकाळात भारतातील चार तरुण रंग निर्मितीचा कारखाना स्थापण्याच्या प्रयत्नात होते. कारण, इंग्रजांनी रंगांच्या आयातीवर बंदी घातली होती. त्यामुळे भारतीयांची रंगांची गरज भागवण्यासाठी भारतातच रंगांचे उत्पादन सुरू करणे महत्वाचे होते. चंपकलाल चोकसे, चीमनलाल चोकसी, सुर्यकांत दाणी आणि अरविंद वकील या चार मित्रांनी मिळून १९४२ साली मुंबईतील एका गॅरेजमध्ये या कंपनीची सरुवात केली. त्याकाळी भारतात रंग तयार करणाऱ्या सर्व कंपन्या या परदेशी होत्या. या कंपन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचे होते.

आपले उत्पादन भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचले पाहिजे यासाठी या चौघांनी सगळे प्रयत्न केले. अवघ्या तीन वर्षातच म्हणजे १९४५ पर्यंतच या कंपनीला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला कंपनीने मोठमोठ्या कॅन ऐवजी छोटे पॉकेट पॅकिंग काढले. ज्यामूळे वाहतूक करणे सोपे आणि सोयीचे झाले. छोट्या वितरकांपर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले. त्यामुळे कंपनीच्या वितरकांची संख्या वाढली. याच वर्षात कंपनीने ३.५ लाखांची कमाई केली होती. सुरुवातीला त्यांनी काळा, पांढरा, लाल, निळा आणि पिवळा हेच रंग उत्पादित केले आणि फक्त या पाच रंगांवर त्यांनी एवढी मोठी मजल गाठली. त्यांचा ग्राहक वर्ग मोठा होता. कोणताही विशिष्ट ग्राहकवर्ग डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपले उत्पादन केले नाही. १९५२ साली या कंपनीची कमाई होती २३ कोटी रुपये, त्याकाळात ही खरोखरच खूप मोठी रक्कम होती.

१९५४ पासून त्यांनी जाहिरातीचा आधार घेऊन मार्केटिंग करण्यास सुरुवात केली. त्यांच्या जाहिरातीसाठी गट्टू नावाचे एक काल्पनिक पात्र म्हणजेच कार्टून स्केच तयार करण्यात आले. हे कार्टून साकारले होते आर. के. लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून. त्याकाळच्या वृत्तपत्राच्या जाहिरातीत आणि एशियन पेंट पॅकेटच्या कव्हर वर हा गट्टू एका हातात रंगाची छोटी बदली आणि दुसऱ्या हातात ब्रश घेऊन धमाल करत होता. या गट्टूमुळे प्रत्येक घरमालकाला देखील आपण कोणत्या कंपनीचा रंग वापरला पाहिजे किंवा वापरतो आहोत हे कळाले. आजपर्यंत वितरक, विक्रेते आणि ग्राहक अशी जी साखळी होती, त्यामध्ये एक पडदा होता. तो पडदा या गट्टूमुळे गळून पडला. सामान्य भारतीयांना देखील एशियन पेंट्स या कंपनीची ओळख झाली. गट्टूमुळेच मध्यमवर्गीय घरामध्ये ट्रॅक्टर डिस्टेंपर पोहोचले. ट्रॅक्टरचा रंग उडण्याची वाट न पाहता, ट्रॅक्टरला रंग दिला जाऊ लागला. ट्रॅक्टर डिस्टेंपरमुळे कंपनीची विक्री आणखी वाढली. त्यांनी भांडूपमध्ये स्वतंत्र प्लांट उभा केला.

१९५७ ते १९६६ हा काळ तर एशियन पेंट्ससाठी खूपच उत्कर्षाचा ठरला. याकाळात कंपनीने मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार केले. ज्यात बाल्मेर लॉरी सारखी मोठी ब्रिटीश कंपनी देखील होती. १९६७ साली भारतातील एक मोठी पेंट उत्पादन कंपनी म्हणून तिला जगभरात मान्यता मिळाली आणि कंपनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील उतरली. हा काळ जागतिकीकरणाचा नव्हता हे लक्षात घेण्यासारखे आहे. जागतिकीकरणानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा मार्ग अधिक खुला झाला, पण त्याच्याही आधी एशियन पेंट्सने आपले नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले होते. विशेष म्हणजे भारत नुकताच स्वतंत्र झालेला एक अननुभवी देश होता. त्यानंतर अवघ्या दशकातच त्यांनी फिजीमध्ये आपला व्यवसाय देखील सुरु केला. तेव्हापासून कंपनीची घोडदौड अव्याहत सुरूच आहे.

१९८४ साली टीव्हीवरील कमर्शियल जाहिरातीची सुरुवात असूदे, १९९० मध्ये कंपनीच्या कॉल सेंटरची स्थापना असू दे किंवा १९९८-९९ मध्येच कंपनीची वेबसाईट निर्माण करणे असूदे, प्रत्येक ठिकाणी ही कंपनी जगाच्या पुढे चालणारी एक दूरदर्शी कंपनी असल्याचे सिद्ध झाले आहे. भविष्यातील हवेचा झोत कुठल्या दिशेने असणार आहे याचा अचूक अंदाज बांधण्यात कंपनी नेहमीच यशस्वी ठरली आहे. आजच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात तर फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्युब सगळ्याच प्लॅटफॉर्मवर कंपनीचे कोट्यावधी फॉलोअर्स आहेत.

कंपनीचे कॅम्पेनिंग हे नेहमीच नाविन्यपूर्ण आणि सामाजिक प्रश्नांचे भान जपणारे रहिले आहे, त्यामुळे या कंपनीबद्दल भारतीय जनमानसात कमालीची विश्वासार्हता पाहायला मिळते. शिवाय, त्याच क्षेत्रातील विविध विभागात पदार्पण करताना त्यांनी अजिबात मागचा पुढचा विचार केला नाही. म्हणूनच इंटेरिअर डेकोरेटिंगपासून वुडन फिनिशिंग, इंडस्ट्रीयल पेंटिंग, एनॅमल पेंटिंग अशा सर्व प्रकारात त्यांचे अस्तित्व पाहायला मिळते. बाथरूम आणि किचन डेकोरेशन यांचीदेखील नोंद घेतली पाहिजे.

त्यांच्या या परिश्रमाचे, प्रामाणिक योगदानाचे फळ म्हणूनच कंपनीला ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलचे ‘स्वर्ड ऑफ ऑनर’ हा पुरस्कार मिळालेला आहे. शिवाय, २००४ साली फोर्ब्जच्या उत्तम कंपन्याच्या यादीतही या कंपनीचा समावेश होता.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात अनेक कंपन्यांची सुरुवात झाली होती, पण काळाच्या ओघात त्यातील अनेक कंपन्या विस्मृतीत गेल्या. गेल्या ७३ वर्षात मात्र एशियन पेंट्सच्या नावाची पताका अधिकच उंचावत आहे, ही बाब विशेष ध्यानात घेण्यासारखी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजतागायत या कंपनीने भारतीयांना अनेक प्रकारे आपली सेवा पुरवली आहे. फक्त भारतीयांनाच नाही तर आज जगभरात कंपनीने आपल्या व्यवसायाचे जाळे निर्माण केले आहे.

 

लेखिका : मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required