जगातील २० सर्वात आरामदायी आणि आलिशान रेल्वे....यातल्या किती भारतात आहेत पाहा !!
झुकझुक करत पाळणाऱ्या आगीनगाडी म्हणजेच रेल्वेतून प्रवास करायला कुणाला आवडत नाही. रेल्वेचा प्रवास म्हणजे लहान मुलांसाठी तर गंमतीचा खजिनाच! त्यातही जगभरात आणि भारतातही अशा काही अलिशान रेल्वे आहेत, ज्यांचा प्रवास कधीच संपू नये असे तुम्हाला वाटेल. आज या लेखातून आम्ही अशाच काही रेल्वेंची ओळख करून देणार आहोत.
१) महाराजा एक्स्प्रेस –
महाराजा एक्प्रेस भारतातील एक अत्यंत अलिशान ट्रेन आहे. जागतिक पर्यटन अॅवार्डने २०१२ पासून ते २०१८ पर्यंत सलग सात वेळा या ट्रेनला ‘वर्ल्ड्स लिडींग लक्झरी ट्रेन’ हा पुरस्कार देऊन गौरवले आहे. भारतातील सांस्कृतिक विविधतेने नटलेल्या अनेक ठिकाणांचा प्रवास करत ही रेल्वे अतुल्य भारताचे दर्शन तर घडवतेच, पण प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा पाहून तुमचे डोळे दिपून जातील. पर्यटन स्थळापेक्षाही ही रेल्वेच तुम्हाला जास्त आकर्षक वाटेल.
२) गोल्डन चॅरीएट –
अगदी नावाप्रमाणेच सुवर्णरथ म्हटले तर वावगे ठरणार नाही. दक्षिण भारतातील काही मोजक्या पर्यटन स्थळांना भेट देणारी हे ट्रेन अतिशय अलिशान आणि आरामदायी प्रवासाची हमी देते. या ट्रेनमध्ये एसी चेंबर तर आहेतच, शिवाय आतले डिझाईन एखाद्या अलिशान महालाप्रमाणे वाटते. यात बार, रेस्टॉरंट पासून ते आयुर्वेदिक स्पा पर्यंत अनेक फाईव्ह स्टार सुविधांची रेलचेल आहे.
३) डेक्कन ओडिसी –
ही ट्रेन म्हणजे एक चालते फिरते फाईव्ह स्टार हॉटेलच. भारतातील काही विलोभनीय स्थळांना भेट देणाऱ्या या ट्रेनची आतील डिझाईन ही राजे महाराजे लोकांच्या अलिशान जीवनशैलीपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे.
४) पॅलेस ऑन व्हील्स –
भारतातील ही आणखी एक अलिशान आणि आरामदायी ट्रेन. खरोखरच याला फिरता राजवाडा म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी २००९ मध्ये या ट्रेनचे पुन्हा नव्याने सुशोभिकरण करण्यात आले. या ट्रेन मध्येही आरामदायी सोयीसुविधांनी युक्त केबिन्स, बार आहेत. राजा महाराजांचा ज्या प्रकारे पाहुणचार केला जातो तसाच पाहुणचार इथे प्रवाशांचाही केला जातो.
५) रॉयल राजस्थान ऑन व्हील्स –
राजस्थानच्या समृद्ध वारसा पाहायचा आणि सोबत आरामदायी प्रवासाचा आनंदही लुटायचा तर या ट्रेनची सफर नक्की करा. प्रवासासोबत राजपुताना संस्कृतीचा पाहुणचारही अनुभवा आणि राजस्थानच्या सौंदर्याची लयलूटही.
६) व्हेनिस सिम्प्लोन-ओरीएंट-एक्स्प्रेस –
लंडन ते व्हेनिस आणि युरोपमधील इतर शहरांना भेटी देणारी ही एक खाजगी आरामदायी ट्रेन आहे. बेलमंड या कंपनी मार्फत ही ट्रेन चालवली जाते. ज्यांचा जगभरातील २४ देशांमध्ये व्यवसाय विस्तार आहे.
७) गोल्डन इगल –
गोल्डन इगल म्हणजे ट्रान्स-सायबेरियनचेच पुढचे व्हर्जन. या ट्रेन मधील बाथरूमदेखील लक्झरीयस आहेत. उन्हाळ्यात एसी आणि हिवाळ्यात हिटर असा दोन्हींचा आनंद लुटता येतो. लॉंड्री सर्व्हिस, टीव्ही आणि डॉक्टर सुद्धा इथे तुमच्या सेवेला हजर असतील.
८) बेलमंड रॉयल स्कॉट्समन –
ही एक स्कॉटिश ट्रेन आहे. सध्या ही ट्रेन बेलमंड लिमिटेड कंपनीकडूनच चालवली जाते. ही ट्रेन फक्त रात्रीच्या प्रवासासाठी आहे. स्कॉटलंड मधील प्रसिद्ध ठिकाणे, किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांची सफर घडवून आणते. या ट्रेनचा प्रवासही तितकाच सुखकर आणि आरामदायी आहे.
९) इस्टर्न अँड ओरीएंटल एक्स्प्रेस –
थायलंड, सिंगापूर, मलेशिया आणि लाओस देशांचा आरामदायी प्रवास करण्यासाठी ही ट्रेन अत्यंत उत्तम पर्याय आहे. या ट्रेनमधील केबिनही तितकेच प्रशस्त आणि आरामदायी. मोठमोठ्या खिडक्या, चविष्ट पदार्थ आणि दर्जेदार सेवा या वैशिष्ट्यांसह होणारा हा प्रवास आणखीही बरेच थरारक अनुभव देतो.
१०) रॉकी माउंटेनर –
कॅनडीयन पर्वत रंगातून धावणारी ही ट्रेन आता तीन वेगवेगळ्या मार्गांनी धावते. त्यामुळे या डोंगररांगातील इतरही दृश्ये पाहता येतात. ट्रेन मध्ये मिळणाऱ्या दर्जेदार सेवा आणि या डोंगर दऱ्यातील विहंगम दृश्याने तुमच्या डोळ्यांचे पारणे फिटतील.
११) द ब्ल्यू ट्रेन –
साउथ आफ्रिकेच्या प्रेटोरीया आणि केप टाऊन या शहरातून प्रवास करणारी ही ट्रेन जगातील एक अलिशान सफर घडवणारी ट्रेन आहे.
१२) द कॅनडीयन –
प्रवासी वाहतूक करणारी ही पारदर्शी ट्रेन टोरोंटो, ओंटारिया आणि वँकूव्हर, ब्रिटीश कोलंबियातील पॅसिफिक सेन्ट्रल स्टेशन दरम्यान प्रवास करते. याचे छप्पर आणि दोन्ही बाजूही पारदर्शी आहेत. त्यामुळे आपण उघड्या ट्रेन मधून प्रवास करत असल्याचा अनुभव येतो.
१३) सेव्हन स्टार्स इन क्युषु –
सेव्हन स्टार्स इन क्युषु ही जपानची एक सर्वाधिक आरामदायी ट्रेनपैकी एक आहे. जपानच्या क्युषु रेल्वे कंपनीद्वारे ही ट्रेन चालवली जाते.
१४) द घॅन –
ही ट्रेन ऑस्ट्रेलियातील एक अतिशय उत्तम अशी पॅसेंजर ट्रेन आहे. रेल्वे प्रवासाचा एक अनोखा अनुभव ती देते.
१५) द ट्रान्सकँटाब्रिको ग्रान ल्युजो, स्पेन –
द ट्रान्सकँटाब्रिको ग्रान ल्युजो जगातील सर्वाधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देणाऱ्या ट्रेनपैकी एक आहे. या ट्रेनमध्ये फिरण्यासाठी मोठमोठे पॅसेज आहेत, आरामदायी सीट्स आणि बाहेरचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी मोठमोठ्या खिडक्याही आहेत. उत्तरेकडील स्पेनचा निसर्गरम्य प्रवासाचा सुखद अनुभव घ्यायचा असेल तर ही ट्रेन एक उत्तम पर्याय आहे.
१६) द चेपे –
प्रसिद्ध एल चेपेचे आता नुतनीकरण करण्यात आले असून ती आता द चेपे या नावाने ओळखली जाते. मेक्सिकोतील अत्यंत आरामदायी अशी ही ट्रेन. या ट्रेनचे छत तांब्यापासून बनवलेले आहे.
१७) बेलमंड हिराम बिंगहॅम –
पेरू देशातील माचू पिचू स्टेशन पासून पोरोय स्टेशन पर्यंत ये जा करणारी ही आरामदायी ट्रेनदेखील बेलमंड कंपनीच्या मालकीची आहे. ट्रेन मधील आतील सजावट खूपच सुंदर आहे.
१८) रॉयल कॅनडीयन पॅसिफिक –
प्रवासातील रस्तेच आरामदायी असतील तर? कित्ती मज्जा येईल. रॉयल कॅनडीयन पॅसिफिक ट्रेन तुम्हाला अशाच आरामदायी रस्त्यांची सैर घडवते, हेच त्यांचे एक खास आणि आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. कॅनडीयन डोंगररांगातील विहंगम दृश्य आणि आरामदायी प्रवास दोन्हींचा अनुभव घ्यायचा तर रॉयल कॅनडीयन पॅसिफिकचीच निवड केली पाहिजे. प्रवासाचा प्रवास आणि सुट्टी दोन्ही मजेत आणि आनंदात घालवता येतील.
१९) बेलमंड अँडीयान एक्स्प्लोरर–
दक्षिण अमेरिकेतील पहिली आरामदायी ट्रेन. दिवसाच्या आणि रात्रीच्या दोन्ही वेळच्या प्रवासासाठी यात खास सोयी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
२०) बर्निना एक्स्प्रेस –
ही आहे अॅल्प्सच्या डोंगररांगातून धावणारी ट्रेन. इटलीतील समृद्ध ऐतिहासिक वारसास्थळांना भेटी देण्यासोबतच इटलीतील हिमनद्यांचेही दर्शन घडवते.
ट्रेनच्या प्रवासाची मजा लुटायची असेल तर या ट्रेन तुम्हाला एक समृद्ध अनुभव देतील हे मात्र नक्की.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी