computer

बोभाटा विशेष: कोव्हीडच्या रणभूमीवर लढणारे डॉ. प्रकाश कोयाडे सांगत आहेत कोरोना, लसीकरण शंका आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविषयी !!

करोनाच्या दुसर्‍या लाटेने आता उग्र रुप धारण केले आहे. बातम्यांच्या वेगवेगळ्या चॅनेलवरून दर तासाला आकड्यांचा होणारा भडीमार आता सहन होत नाही अशी सर्वसामान्य माणसाची मानसिक अवस्था आहे. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या समाज माध्यमातून परस्पर विरोधी मतं मांडली जात आहे. पण यातील बरीचशी मते Non -qualified / Unqualified असतात. त्यामुळे 'बोभाटा' ने प्रत्यक्ष कोव्हीडच्या रणभूमीवर लढणार्‍या डॉ. प्रकाश कोयाडे यांचा लेख वाचला तेव्हा तो आमच्या वाचकांपर्यंत पोहचला पाहिजे असे वाटल्याने  त्यांनी व्यक्त केलेले विचार आणि सत्य परिस्थिती आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत. 

सध्या डॉक्टर प्रकाश कोयाडे यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल, पुणे येथे कार्यरत आहेत. रोज शेकडो फोन त्यांना येत असतात आणि मागणी एकच असते 'डॉक्टर बेड मिळवून द्या' या फोन करणार्‍या अनेक गरजू लोकांना त्यांचे एकच सांगणे आहे. ते कोव्हीडच्या रणभूमीवर लढणार्‍या अनेक डॉक्टरांपैकी एक आहेत. ते लेखक असल्यामुळे सध्याच्या दुसर्‍या लाटेबद्दल ते अधिक चांगल्या रितीने व्यक्त होऊ शकत आहेत. अशा संदिग्धावस्थेत असलेल्या लोकांना त्यांनी केलेले मार्गदर्शन असे आहे.

"खरंच कोराना आहे की नाही इथून जो प्रवास सुरू होतो तो घरातील तीन चार लोक पॉझिटिव्ह येईपर्यंत थांबतो! आणि मग शोध सुरू होतो... चांगला डॉक्टर, चांगला दवाखाना, चांगली औषधं!"

पहिला प्रश्न कोरोनाची लागण झाली आहे की नाही ?

"Antigen Test पॉझिटिव्ह आली तर कोरोना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आली तर RT-PCR करायची! RT-PCR पॉझिटिव्ह म्हणजे कन्फर्म कोरोना पॉझिटिव्ह!

जेवणाची चव गेली, कोणताच वास येत नाही, खोकला येतोय, अधूनमधून ताप येतोय, भयंकर अंग दुखतंय, श्र्वास घ्यायला त्रास होतोय... काय करायचं? टेस्ट करावी का? टेस्ट केली तर उचलून तर घेऊन जाणार नाहीत? क्वारंटाईन तर करणार नाहीत? डॉक्टर, फार सिरीयस तर नाही ना? घरच्याघरी औषध घेतो... फक्त तुम्ही औषधे लिहून द्या! 

यानंतर पुढचे प्रश्न हा कोरोनाचा जुना स्ट्रेन आणि की नवीन? बीपी-डायबेटीस आहे, काही धोका होईल का?अजून एक प्रश्न, RT-PCR Test केलीय Gene Ct Value २५-२८ आहे, Score खूप जास्त आहे का?  ?????

"RT-PCR Test केलीय Gene Ct Value २५-२८ आहे, Score खूप जास्त आहे का? मित्रांनो तो Score वेगळा आणि HRCT Score वेगळा. आपल्या फुफ्फुसाचे पाच भाग असतात उजवा वरचा, उजवा मधला, उजवा खालचा, डावा वरचा आणि डावा खालचा. यातील कोणत्या भागात व्हायरसचा किती प्रमाणात संसर्ग (इन्फेक्शन) झाला आहे यावर एकत्रित CT Scan चा स्कोअर ठरतो. ० ते ८ Mild (कमी), ८ ते १५ Moderate(जास्त) आणि १५ पेक्षा जास्त Severe(अति जास्त), Mild इन्फेक्शन हे Sypmptomatic (लक्षणे बघून) उपचारांनी बरे होते, Moderate इन्फेक्शन साठी अॉक्सिजन (O2, Reserver Bag) आवश्यक आहे(आवश्यकता भासू शकते) आणि Severe Infection साठी NIV(Non Invasive Ventilation) किंवा Intubation आवश्यक असते. यापैकी तिसऱ्या प्रकारात अॉक्सिजन साठी तोंडातून थेट छातीमध्ये नळी टाकली जाते! कदाचित ऐकायला हे सहज वाटेल पण प्रत्यक्षात याचं रुप तेवढं सोपं आणि सहज नसतं... रुग्णाची ही कदाचित शेवटची वेळ असू शकते!"

हा सर्व अंक, आकडेवारी आणि अवघड इंग्रजी शब्दांचा भडीमार कशासाठी... ????

"माझे शब्द आणि भाषा थोडी कडवट वाटेल पण खरी आहे, दरदिवशी त्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली पाच-दहा शरीरे पाहण्याची इच्छा होत नाही... त्यात मला माझं नातं कुठेनकुठे नकळंत दिसतं! जोपर्यंत रुग्ण जिवंत आहे तोपर्यंत Explain करणे आणि मेल्यानंतर Declare करणे दोन्हीही फार अवघड असते!"

"गेल्या लाटेत घरातील एखाद दुसरा व्यक्ती पॉझिटिव्ह यायचा. आता पूर्ण कुटुंब संसर्गित झाले आहेत. अपघात घडून गेल्यानंतर जखमी लोकांवर उपचार करणे एवढेच शिल्लक राहाते..."

"मित्रांनो, मी माझ्या पातळीवर प्रयत्न करतोय, असे असंख्य डॉक्टर आहेत...‌पण परिस्थिती पाहता लोकांच्या मदतीशिवाय हे हात अपुरे आहेत! दिवसेंदिवस परिस्थिती कठीण होत आहे."

केवळ गाफील राहिल्याने ही दुसरी लाट का उद्भवली या प्रश्नाचे उत्तर देताना डॉक्टर म्हणतात 

" 'आता कोरोना गेला' या सुखावलेल्या कल्पनेत कसलीही तयारी केली नाही. आमच्यासारखे डॉक्टर पुन्हा पुन्हा सांगत होते की दुसरी लाट नक्की येणार आहे, सांभाळून, पण त्या सांगण्याला कचराकुंडी दाखवली. शासन, प्रशासन आणि जनता यांपैकी प्रत्येकाने केवळ एकदा स्वत:लाच विचारून पहावं की, 'मी मधल्या पाच महिन्यांत कोरोनाची पुढची लाट येऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या आहेत?' तुमचं उत्तर तुम्हालाच मिळून जाईल!"

सद्यस्थितीत आपण काय करू शकतो... ??? या प्रश्नाचे उत्तर फार महत्वाचे आहे ते 'बोभाटा'च्या वाचकांनी लक्षपूर्वक वाचावे अशी आमची विनंती आहे.

"वर लिहीलेली कोणतेही लक्षणं दिसली तर तपासणी करणे आणि लगेच उपचार सुरू करणे! बहुसंख्य रुग्णांना घरी राहून उपचार घेता येतो, फार कठीण नाही हे... एक गोष्ट मात्र महत्त्वाची की, लक्षणे लपवून ठेवू नका, तपासणी करा आणि औषधं सुरू करा!"

डॉ. प्रकाश कोयाडे गेले पूर्ण वर्षं कोव्हीडच्या वॉर्डमध्ये कार्यरत होते. त्यांच्या टाइमलाईन वर जाऊन गेल्या वर्षभरातल्या पोस्ट वाचल्या तर अधिअक चांगले मार्गदर्शन मिळेल. 

'बोभाटा' डॉ. प्रकाश कोयाडे यांचे आभारी आहे .

सबस्क्राईब करा

* indicates required