computer

आपल्या रोजच्या आयुष्यातील या १५ गोष्टी नासाने शोधून काढल्या आहेत, हे माहित आहे का?

नासा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतात ते त्यांचे स्पेस प्रोग्राम्स. अंतराळ प्रवास आणि संशोधन हे जरी नासाचं मुख्य ध्येय असलं, तरी रोजच्या वापरातल्या अनेक गोष्टी आपल्याला उपलब्ध होण्यात नासाचा मोठा वाटा आहे. त्यातून आपलं दैनंदिन आयुष्य बरंच सुखकर झालं आहे. अंतराळातल्या हवेचा गंध कसा असतो किंवा अवकाशातून आपली पृथ्वी कशी दिसते हे जरी आपण बहुतेक करून कधी अनुभवणार नसलो, तरी नासाच्या संशोधनाद्वारे आणि हे उत्पादन वापरत असताना आपण जणू आकाशालाच गवसणी घातली असं वाटतं! अशीच काही उत्पादनं :

मेमरी फोम 

रात्री झोपताना मऊ गुबगुबीत उशीवर झोपण्याचा आनंद काही वेगळाच! पण यामागे किमया आहे ती मेमरी फोम नावाच्या मटेरियलची. मेमरी फोममध्ये मोठ्या प्रमाणावर हवेच्या पोकळ्या असतात. त्यामुळे त्याला एक प्रकारची लवचिकता आणि हलकेपणा प्राप्त होतो. मेमरी फोमच्या गाद्या किंवा उश्या त्यावर ठेवलेल्या वस्तूचा दाब आणि त्या वस्तूपासून मिळणारी उष्णता यानुसार वस्तूच्या आकारानुरूप आकार घेतात. त्यामुळे त्यावर झोपल्यास आरामदायी वाटतं. हे संशोधन नासाने १९८७ मध्ये केलेलं आहे. त्यांच्या टेस्ट पायलटसाठी फ्लाईटदरम्यान वापरण्यासाठी बनवलेलं हे उत्पादन आता घराघरात पोहोचलं आहे. 

डिजिटल इमेज सेन्सर

स्मार्टफोन कॅमेऱ्यापासून डिजिटल एसएलआरपर्यंत सर्वत्र वापरले जाणारे डिजिटल इमेज सेन्सर ही नासाचीच देणगी आहे. आज आपल्याला अगदी सहजपणे आणि हा केवळ फोनच्या साह्याने कुठेही फोटो काढता येतात याचं श्रेय या सेन्सर्सचं आणि या सेन्सरच्या निर्मितीचं क्रेडिट नासाचं. मुळात नासाच्या जेट प्रोपल्शन लॅब, कॅलिफोर्निया येथील संशोधकांनी कमी पॉवर वर चालणारे आणि अगदी सहजपणे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येण्याजोगे हे सेन्सर्स बनवल्यामुळे डिजिटल फोटोग्राफी आज सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहे. 

प्रिसिजन जीपीएस 

जीपीएस किंवा 'ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम'बद्दल आज आपणा सगळ्यांनाच माहिती आहे. हे तंत्रज्ञान पूर्वी बहुतेक करून जहाज आणि विमान यांचे पायलट वापरत असत. आज आपण सगळेजण वापरतो. तेही अतिशय अचूक अशा प्रणालीवर आधारलेलं. आज कितीही किचकट पत्ता केवळ स्मार्टफोनच्या साह्याने शोधता येतो. याला कारणीभूत असलेलं हे प्रिसिजन जीपीएस हेही नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबचं उत्पादन आहे. 

LED AM/PM

दोन रंगांचे हे LED ही पण एक अनोखी गोष्ट आहे. AM LED निळसर पांढरा प्रकाश देत दिवसाचा आभास निर्माण करतो, तर PM LED अँबर-तपकिरी रंगाच्या प्रकाशाने रात्रीचा. दिवसाच्या प्रकाशामुळे मेलॅटोनीन नावाच्या हॉर्मोनचं उत्पादन रोखलं जाऊन मेंदू जागृत अवस्थेत राहतो. PM बल्ब याच्या बरोबर उलट काम करतो. त्याच्या तपकिरी प्रकाशाद्वारे मेंदूला निद्रावस्थेत जाण्यासाठी आवश्यक सिग्नल मिळतो. थोडक्यात तुमची झोप अशा प्रकारे नियंत्रित केली गेली आहे, ती पण नासाच्या माध्यमातून. हे संशोधन २०१५ मध्ये नॅशनल स्पेस बायोमेडिकल रिसॉर्ट प्रोग्रॅमद्वारे केलं गेलं होतं.

लहान बाळांसाठी जास्त आरोग्यदायी फॉर्म्युला 

मंगळावर जाणार्‍या अंतराळवीरांसाठी मील रिप्लेसमेंट (व्हॅनिला, स्ट्रॉबेरी या फ्लेवर्समध्ये विशिष्ट प्रकारे बनवलेली ड्रिंक्स, शेक्स, ब्रेड पुडिंग, फ्रिजमध्ये पूर्ण वाळवलेले आणि पाणी काढून टाकले कोरडे पदार्थ इत्यादी) तयार करताना अपघाताने नासाच्या संशोधकांना ओमेगा थ्री फॅटी ऍसिडच्या एका प्रकाराचा शोध लागला. तोपर्यंत हे ऍसिड फक्त आईच्या दुधापासून मिळतं हे माहिती होतं. हे फॅटी ऍसिड नवजात बालकांच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. आज जगभरातल्या ९० टक्के प्रॉडक्ट्समध्ये हा फॉर्म्युला वापरतात. 

अन्नधान्य दीर्घकाळ टिकवण्यासाठी फूड सेफ्टी स्टोरेज 

यासाठी नासाने पिल्सबरी या ब्रँडबरोबर भागीदारी केली आहे. दोघांनी मिळून आरोग्यदायी आणि वापरायला सुरक्षित अशी फ्रीज ड्राईड पदार्थांची श्रेणी तयार केली आहे. ती आता जगभरात उपलब्ध आहे. या प्रणालीनुसार पदार्थांचे शेल्फ लाईफ वाढवून त्यामध्ये जीवजंतू आणि केमिकल्स यांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका टाळला जातो. 

न दिसणाऱ्या अर्थात इनव्हिजिबल ब्रेसेस 

वेडेवाकडे दात सरळ करण्यासाठी आणि दातांचं सौंदर्य वाढवण्यासाठी ब्रेसेसचा सर्रास वापर केला जातो. पण निदान जोपर्यंत त्या दातांवर असतात तोपर्यंत ते फारच विचित्र दिसतं. याला पर्याय म्हणजे इनव्हिजिबल अर्थातच सहज न दिसणाऱ्या ब्रेसेस. ही कमालही नासामुळेच शक्य झाली आहे, ज्यांनी यासाठीचं पारदर्शक सिरॅमिक 3M Products या कंपनीच्या सहयोगाने बनवलं आहे. 

स्पीडो एल झेड आर स्विमसुट 

हे नासाच्या लँगले रीसर्च सेंटरचं उत्पादन त्याच्या स्लीक आणि आटोपशीर डिझाईनमुळे अल्पावधीत लोकप्रिय झालं आहे. २००८ च्या ऑलम्पिक मध्ये अनेक पदकविजेत्या जलतरणपटूंनी हा स्विमसुट वापरला होता. 

प्लांट एअर प्युरिफायर 

झाडांद्वारे उत्सर्जित होणारा वायू स्पेस स्टेशनच्या बंदिस्त वातावरणात साठून राहतो हे लक्षात आल्यानंतर नासाने इथिलिन स्क्रबर तंत्रज्ञान विकसित केलं ज्याद्वारे हा साठलेला वायू काढून टाकला जातो. पुढे हेच तंत्रज्ञान फळं आणि भाजीपाला यांसारखे पदार्थ दीर्घकाळ टिकविण्यासाठी वापरलं जाऊ लागलं. याचं कारण म्हणजे फळं किंवा भाज्या नैसर्गिकरित्या इथिलीन वायू मुक्त करत असतात. त्यामुळे त्या पिकण्याची आणि अर्थातच खराब होण्याची प्रक्रिया जलद होते. इथिलीन स्क्रबर मुळे हा साठून राहिलेला अतिरिक्त गॅस काढून टाकला जातो आणि भाज्या आणि फळं यांचं शेल्फ लाईफ वाढतं. 

स्क्रॅच रेझिस्टंट चष्म्याच्या काचा 

हीही अशीच एक अनमोल देणगी आहे. अंतराळवीरांच्या हेल्मेटच्या काचा आणि जलशुद्धीकरण यंत्रातील पडदे म्हणजेच मेम्ब्रेन यांच्यात सुधारणा करण्यासाठी नासाने वापरलेलं तंत्र पुढे चष्मे, गॉगल्स आणि सेफ्टी मास्क यांच्यासाठी वापरात आणलं गेलं

व्हॅक्युम क्लिनर 

चंद्राच्या पृष्ठभागावरच्या माती आणि दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी नासाने जी साधनं वापरली होती त्यांचं सुधारित स्वरूप म्हणजे आज आपण वापरतो ते व्हॅक्युम क्लिनर्स. ही साधनं हाताळायला अतिशय सोपी होती आणि अत्यंत कौशल्यपूर्वक त्यांनी नमुने गोळा केले. त्यामुळे त्यांचा सगळीकडे मोठ्या प्रमाणावर वापर होणार हे उघड होतं. 

स्पेस ब्लँकेट्स

नासाची स्पेस ब्लँकेट्स १९७३ मध्ये स्कायलॅब ३ मिशन दरम्यान निर्माण केली गेली. त्यांचा मूळ हेतू सूर्यापासून सॅटॅलाइटचं संरक्षण करणं हा होता. आता ती सर्व इमर्जन्सी आणि फर्स्ट एड किटचा अविभाज्य घटक बनली आहेत आणि दरवर्षी शेकडो लोकांचा जीव वाचवत आहेत. 

कॉक्लीअर इम्प्लांट 

१९७० च्या दशकापर्यंत श्रवण यंत्रांचा दर्जा अत्यंत सुमार होता. ती ना धड आवाज ऍम्प्लिफाय करू शकत ना त्याची सुस्पष्टता वाढवू शकत. त्यावेळी ऍडम किसिया या नासाच्या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनिक सेन्सिंग प्रणालीतील सुधारणा, टेलिमेट्री म्हणजेच दूरच्या स्रोतांकडून आलेली माहिती विश्लेषणासाठी ट्रान्समिट आणि रेकॉर्ड करणे तसेच साऊंड व व्हायब्रेशन सेन्सर्स यांचा उपयोग करून श्रवण यंत्रांमध्ये बरेच बदल केले. हे मॉडिफाइड कॉक्लीअर इम्प्लांट कानात बसवल्यानंतर डिजिटल सिग्नल्स वापरून श्रवण क्रियेत वापरले जाणारे मज्जातंतू उद्दीपित करत असल्यामुळे अधिक स्पष्ट आवाज ऐकू येत असे. 

स्निकर कुशनिंग जेल 

अंतराळवीरांचे सूट आणि इतर साधनं हलकी करण्याच्या प्रयत्नात नासाने ब्लो रबर मोल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे सुटची निर्मिती केली. त्यामुळे त्याचं वजन एक-तृतीयांशने कमी झालं. शिवाय हे अग्निरोधक मटेरियल ऍथलिट्स वापरतात त्या स्निकर्समधील सोल मध्ये वापरलं जाऊ लागलं. यामुळे पायाच्या टाचांना आणि बोटांना आवश्यक ते कुशन मिळून हालचाल आरामदायी होण्यास मदत झाली. 

रेडियंट होम इन्सुलेशन

अंतराळयान आणि स्पेस स्टेशन्सवरील तापमान सामान्य करण्यासाठी नासाने ४० वर्षांपूर्वी रेडियंट बॅरियर तंत्रज्ञान विकसित केलं होतं. पण २००४ पर्यंत त्याचा घरांसाठी वापर होत नव्हता. या बॅरियर तंत्रज्ञानाचं नाव होतं ईगलशील्ड. होम इन्सुलेशनची कार्यक्षमता वाढविण्यासाठी, हीटिंग आणि कूलिंगसाठी होणार खर्च आणखी कमी करण्यासाठी ते वापरलं जाई.

 

लेखिका: स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required