computer

कॉम्प्युटर ते कार या सर्व इलेक्ट्रॉनिक गोष्टींत लागणाऱ्या चीपचा जगभरात तुटवडा का निर्माण झाला आहे??

चणचण आणि वणवण हे दोन शब्द सध्या आपल्यामागे हात धुवून लागलेत. भारतात प्राणवायू आणि लसीची चणचण आहे आणि जनता त्यासाठी वणवण करते आहे. तिकडे अमेरिकेत निमित्त झालं 'फ्राइड क्रिस्पी' चिकन सँडवीचचं आणि ते फॅड इतकं जोरात पसरलं की आता 'चिकन'ची चणचण आहे म्हणून केएफसी, मॅकडोनाल्ड्स, पोपेयसारख्या कंपन्या चिकनसाठी धावाधाव करत आहेत. पण आजचा बोभाटाचा लेख त्याहून ही मोठ्या आणि गंभीर चणचणीबद्दल आहे. हा तुटवडा आहे येणार्‍या काळातल्या 'चिप'च्या चणचणीचा!

साठीच्या दशकाच्या सुरुवातीला रॉबर्ट नॉइसने 'चिप'चा म्हणजे इंटिग्रेटेड सर्किटचा शोध लावला. त्याने इंटेल कंपनी स्थापना केली. सिलीकॉनसारख्या स्वस्त आणि निसर्गत: सहज उपलब्ध वाळूसारख्या कच्चा मालातून आज आपण अनुभवतो आहे ती संगणक क्रांती उभी राहिली. आज आपण वापरतो तो सिलीकॉन व्हॅली हा शब्दही या चिपच्या निर्मितीमुळे जन्माला आला. आज ही 'चिप' घरोघरी पोहचली आहे. फक्त काँप्युटरच नाही, तर मोबाईल, एसी, वॉशिंग मशिन, ओव्हन, गाडी सगळीकडे चिपचा संचार सुरु झाला. पण या गडबडीत झालं असं की सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात प्रचंड वेगाने वाढ झाली, लाखो कंपन्या अस्तित्वात आल्या, पण चिप बनवणार्‍या कंपन्यांची संख्या मात्र आजही बोटावर मोजता येतील इतकीच मर्यादित आहे. सिलीकॉन स्वस्त आहे, आतापर्यंत या कंपन्या ह्व्या तेवढ्या चिप बनवत होत्या. मग आता अचानक तुटवडा का निर्माण झाला ते आता बघूया! 

१. आपण घरी बसून काम करणारे सर्वजण या दुष्काळाचं पहिलं कारण आहोत. लॉकडाऊनमुळे मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप यांची मागणी अपेक्षेबाहेर वाढली. घरी काम करायचं म्हणून सोबत एसी, एअर प्युरीफायर,ओव्हन, फ्रीज यांची मागणीही वाढली. इतकी मागणी येईल अशी अपेक्षाच नसल्याने अचानक सप्लाय कमी पडायला लागला. कोव्हिडच्या साथीदरम्यान वैद्यकीय उपकरणांचा खपही जोरात वाढला.

२ लॉकडाऊनच्या सुरुवातीला ऑटो कंपन्यांनी त्यांचे प्रॉडक्शन कमी करून टाकले, पण लॉकडाऊन शिथिल झाल्यावर गाड्यांची मागणी इतकी वाढली की चिप्स कमी पडू लागल्या. 

३. कोव्हिडमुळे तापलेल्या आंतराराष्ट्रीय संबंधांमुळे जर चीनवर बहिष्कार घातला तर चिप्स मिळणे शक्यच होणार नाही, हे लक्षात घेऊन Huawei Technologies  या मोबाईल कंपनीने भरमसाठ साठा करायला सुरवात केली. त्यांनी सुरुवात केल्यावर इतर कंपन्यांनी त्यांचे अनुकरण केले आणि एकूण ३०८ बिलीयन डॉलर्सच्या चिपचा साठा बाजारातून नाहीसा झाला. एक बिलीयन म्हणजे १०० कोटी होतात, तर ३०८ बिलियन म्हणजे किती हे आता तुम्हीच पाहा. 

४. टेक्सासमध्ये फेब्रुवारीच्या दरम्यान अचानक पडलेल्या थंडीमुळे वार्ंवार विजपुरवठा खंडीत झाला आणि सॅमसंगसह सगळ्याच कंपन्यांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. 

५. फक्त गाड्या बनवणार्‍या फोर्डसारख्या मोठ्या कंपन्यांचा विचार केला, तर सध्या ६० बिलीयन डॉलरची मागणी मार्चपासून अजूनही बाकी आहे. जसजसे दिवस जातील तसतसा हा आकडा फुगतच जाईल. साहजिकच चिपचा पुरवठा आणि किंमत यात तफावत वाढतच जाणार आहे.

साहजिकच आता मनात विचार येईल की जर इतकी मागणी असेल आणि भविष्यात वाढत जाणार असेल तर नवे प्लँट उभे राहतील. पण अडचणीचा भाग असा आहे की चिप्स बनवणार्‍या कारखान्यांसाठी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करावी लागते. हा धंदा व्हॉल्यूमचा आहे. म्हणजे एका तासात बनणार्‍या चिप्स जितक्या जास्त, तितका भांडवलाचा बोजा कमी होतो. त्यामुळे २४ तास प्रॉडक्शन करावे लागते. आता हा प्रॉडक्शनचा नियम सगळ्याच कारखान्यांना लागू पडतो. पण चिप्स बनवल्या तरी एका बॅचमध्ये किती टक्के चिप्स 'परफेक्ट' बनतात, त्यावर पुढचे सगळे गणित अवलंबून असते.

चिप्स बनवण्याची फोटोलिथोग्राफी कार्यप्रणाली दोषरहीत करायलाच बरीच वर्षे लागतात. हवामानातला थोडासा बदल, धूळीचे प्रमाण यावरही बरेच काही अवलंबून असते. पाणि आणि वीज अतिशय मोठ्या प्रमाणात वापरली जाते. या सगळ्यांचा विचार केला तर नवे उत्पादन ताबडतोब शक्य नाही हे लक्षात येईल. या क्षेत्रात अ‍ॅपल, एनव्हिडीया, क्वालकॉम यांसारख्या कंपन्या आहेत, पण त्या चिप डिझाईन करणार्‍या कंपन्या आहेत. चिप बनवणार्‍या कंपन्या फारच कमी आहेत. त्या कंपन्यांचे काय प्रयत्न चालू आहेत ते पण आता बघूया.

प्रत्येक कंपनीच्या चिपचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी होत असतो. त्यामुळे सगळ्या मोठ्या कंपन्यांचा भर ग्राहक टिकवून धरण्यात आहे.  चिप्स बनवणार्‍या कंपन्यांमध्ये एक नंबर आहे तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरींग कंपनी (TSMC). या कंपनीचा उत्पादनातला हिस्सा इतर कोणत्याही कंपनीपेक्षा जास्त आहे. साहजिकच ही मोनोपॉली म्हणजेच एकाधिकार आहे तसा ठेवण्यासाठी मोठी गुंतवणूक करायला त्यांनी सुरुवात केली आहे.

यानंतर सॅमसंगचा नंबर लागतो. त्यांच्याकडे 'मेमरी' चिप्स या प्रकारावर जास्त भर आहे. इनव्हिडीया आणि क्वालकॉम हे त्यांचे मुख्य ग्राहक आहेत. त्यामुळे त्यांना धरून ठेवण्यातच त्यांना रस आहे. इंटेल या क्षेत्रातील पहिली कंपनी आहे. त्यांचा भर लॅपटॉपसाठी लागणार्‍या चिप्सवर आहे. इतर क्षेत्रात त्यांचा प्रभाव नाही. अनेक चीनी कंपन्या चिप्स बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना हवे तसे यश मिळालेले नाही. या सर्व परिस्थितीचा विचार करून अमेरिकन सरकारने वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहनात्मक योजना जाहीर केल्या आहेत. नवे  5G नेटवर्क आणि आर्टीफिशीअल इन्टेलिजन्स आहे त्या अडचणीत आणखी भर टाकणार आहे. या दोन्ही तंत्रांमध्ये सध्या आहे त्यापेक्षाही चांगल्या दर्जाच्या चिप्सची गरज पडणार आहे. 

आता आपण आपल्यापुरता विचार करायचा झाला तर इतकंच लक्षात ठेवायला हवं आहे की येत्या वर्षात लॅपटॉप आणि मोबाईल यांचे भाव वाढणार आहेत , तेव्हा खरेदी करायची तर आताच करा!

सबस्क्राईब करा

* indicates required