१२२ वर्षांच्या आयुष्यात ११७ वर्षे सिगरेट ओढणारी जगातली सर्वात वयोवृद्ध व्यक्ती !!
'शतायुषी भव' , '१०० वर्ष आयुष्य आहे तुला' ही वाक्य आपण सहज आशिर्वाद किंवा शुभेच्छा म्हणून देत असतो. म्हणजे सामान्यतः १०० वर्ष आयुर्मान हे सगळ्यात मोठे मानले जाते. माणसाच्या आयुष्याच्या कल्पना साधारण वयाची साठी हे निवृत्ती आणि नंतर १५, २० वर्षे व्यवस्थित राहिलो तरी चांगले आयुष्य जगलो असे मानले जाते. पण एका म्हाताऱ्या आजींचे वय किती असावे? चक्क १२२ वर्षे आणि १६४ दिवस. फ्रान्सच्या या आजींचे नाव जगातील सर्वात वयोवृद्ध म्हणून नोंदवले गेले आहे. हा विक्रम आजही अबाधित आहे.
फ्रान्सच्या जीन लुईस काल्मेंट असे त्यांचे नाव आहे. २१ फेब्रुवारी १८७५ ला जन्मलेल्या जीन ४ ॲागस्ट १९९७ रोजी मरण पावल्या. त्या तब्बल १२२ वर्षे जगल्या, म्हणजे पॅरिसचा आयफेल टॉवर बनण्याच्या सुमारे १४ वर्षांपूर्वी! इतके दीर्घायुष्य आजवर कुणालाही लाभलेले नाही.
जीनचे लग्न १८९६ साली दूरच्या चुलतभावाशी फर्नांड निकोलस कॅलमेंटशी झाले. तो खूप श्रीमंत होता. तिला जगण्यासाठी कष्ट पडले नाही. सगळ्या सुखसोयी पायाशी होत्या. त्यांनी पूर्ण लक्ष तब्येतीकडे दिले. पोहणे, टेनिस खेळणे, सायकल, स्केटिंग त्यांना खूप आववडायचे. वयाच्या १०० पर्यंत त्या सायकल चालवत होत्या. त्यांचा आहारदेखील चांगला होता. जेवणात ऑलिव्ह ऑईल वापरायच्या. त्वचेलाही त्या तेलाने मसाज करायच्या. मर्यादित प्रमाणात वाईनही त्या घेत. चॉकलेटची त्यांना खास आवड होती. दर आठवड्याला जवळजवळ १ किलो (2 पौंड 3 औंस) ,चॉकलेट त्यांनी खाल्ले आहेत. वयाच्या २१ वर्षांपासून त्यांनी सिगारेट ओढायला सुरुवात केली आणि ११७ वयाची असताना सोडली. परंतु दिवसाला दोन सिगारेट हा नियम त्यांनी स्वतःसाठी घातला होता, तो कधी मोडला नाही.
त्यांची जवळची माणसे म्हणजे पती, मुलगी आणि नातू फार लवकर वारले. परंतु जीन यांना वारसाने संपत्ती मिळाली नाही. मग त्यांच्या वडिलांनी ती राहत असलेल्या घराशी "रिव्हर्स मॉर्गेज” द्वारे जीन जोवर जिवंत आहे तोपर्यंत तिला ठराविक रक्कम देणार असा करार केला. त्यात तिचा उदरनिर्वाह सहज होणार होता, तेव्हा जीन ९० वर्षांच्या होत्या. परंतु तीस वर्षाने वकिलाचा मृत्यू झाला. नंतर वकिलाचे कुटुंब तिला ठरलेले पैसे देत राहिले. अस म्हणतात तिला दिलेली रक्कम ही घराच्या किमतीपेक्षा दुप्पट झाली होती.
वयाच्या ११३ वयापर्यंत त्या स्वतःची काम स्वतः करत होत्या. पण एक दिवशी त्या पडल्या आणि हाड मोडल्याने ११५ वर्षांपासून त्या व्हिलचेयर वापरू लागल्या. त्यांचे एक स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे त्या खप बुद्धिमान आणि विनोदी स्वभावाच्या होत्या. त्यांच्या दीर्घायुष्याचे हे एक कारण मानले जाते. ११४ वर्षी त्यांनी एका चित्रपटात छोटीशी भूमिकाही केली, तसेच १२० व्या वर्षी त्यांचे रेकॉरडींगही केले. त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच होता.
त्यांच्या वयावरून काही वादही झाले, परंतु ते काही सिद्ध झाले नाही. त्यामुळे आज तरी जीन आजींचा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही.
लेखिका: शीतल दरंदळे