computer

जपान एवढे स्वच्छ कसे? जपानच्या कचरा व्यवस्थापनाची पद्धत समजून घ्या !!

जपान हा जगातला सर्वात सुंदर आणि स्वच्छ देश मानला जातो. तिथे कचरा नावालाही दिसत नाही. तिथले लोक इतके स्वच्छ आहेत की तिथली पालिका जास्त कार्यक्षम आहे, असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडतील. असे म्हणतात की जर कोणी परदेशी माणूस जपान मध्ये राहायला गेला तर तो सर्वात जास्त कंटाळतो ते कचरा वर्गीकरण करायला. कारण जपानमध्ये कचरा टाकण्यासाठी बरेच कडक नियम आहेत. नक्की काय आहेत हे स्वच्छतेचे नियम आणि तिथले कायदे हे समजून घेऊयात.

जपानमध्ये कचरा चार प्रकारांमध्ये विभागलेला आहे: ज्वलनशील कचरा, ज्वलनशील नसलेला कचरा, मोठा कचरा आणि रिसायकल करता येणारा कचरा. मोठा कचरा म्हणजे घरातल्या मोठ्या वस्तू, ज्वलनशील आणि ज्वलनशील नसलेल्या वस्तू म्हणजे ज्यांचे जळून विघटन होते आणि ज्यांचे होत नाही. रिसायकल करण्यासारखे पुठ्ठे, पेपर, बॉक्स, बाटल्या, वर्तमानपत्र वैगेरे अश्या गोष्टी येतात. कचरा गोळा करण्याचे दिवस ठरलेले असतात. त्या दिवशी कचऱ्याच्या गाड्या येऊन कचरा घेऊन जातात. तुम्ही जपानमध्ये असाल तर वर्गीकरण समजायला बराच वेळ जातो.

तिथल्या लोकांना अगदी शाळेत असल्यापासून स्वच्छतेचे धडे दिले जातात. विद्यार्थी शाळा साफ करतात. स्वछता आणि पर्यावरण संरक्षण याचे शिक्षण तिथे मोठ्या वर्गापर्यंत अनिवार्य आहे. त्यामुळे लहानपणापासूनच सवय लागते. तिथे कचरा केल्यास मोठा दंड भरावा लागतो. तिथे रस्त्यावर कचरा पेटी नाही. अनेक सरकारी पथके फिरत असतात कोणी कचरा टाकताना आढळल्यास ५ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते आणि १० मिलियन जपानी युआनचा दंडही होतो. त्यामुळे तिथे कोणी कचरा टाकतच नाही. अगदी विश्वचषक जिंकल्यावरही जपानी प्रेक्षक जल्लोष करताना कचरा रस्त्यावर न टाकता कचरा गोळा करताना दिसले. तो कचरा घरी नेऊन व्यवस्थितपणे वर्गीकरण करूनच टाकला जातो. आपला कचरा दुसऱ्याच्या कुंडीत टाकल्यासही दंड आहे. तिथे कचऱ्याचा पुनर्वापर सर्वात मोठ्या प्रमाणात केला जातो, त्यामुळे पर्यावरण आपोआप स्वच्छ होण्यास मदत होते.

इतके कडक नियम असूनही तिथले लोकं ते कसोशीने पाळतात. आपल्या देशाला कोणी नावं ठेऊ नये ही इच्छा त्यांच्या मनात कोरली गेली आहे. सहाजिकच याचा फायदा पर्यावरणाला होत आहे. पण हा फरक एका रात्रीत घडला नाही, १९६० च्या आधीचा जपान आणि नंतरचा जपान यात खूप फरक आहे. त्यावेळेला जपानी अर्थव्यवस्था आणि तिथले वातावरण ही खूप वाईट अवस्थेत होते. त्यांनी हळूहळू या गोष्टी नियमांत बसवून रुळावर आणल्या. याचा फायदा नक्कीच त्यांच्या आजच्या पिढ्यानाहीं होत आहे. 

एकूणच निसर्गाने वेळोवेळी लादलेल्या आपत्तीचा, हिरोशिमा, नागासाकीवर १९४५मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा, भूकंपाच्या नेहमीच्या टांगत्या तलवारीचा, ज्वालामुखीच्या होऊ शकणाऱ्या उद्रेकाचा, समुद्राच्या त्सुनामीचा कशाकशाचाही उगाच बागूलबुवा न करता हा देश आज खंबीरपणे उभा आहे.

निसर्गाचे संवर्धन आणि पुढच्या पिढ्यांसाठी चांगलं भविष्य हवं असे तर प्रत्येक देशाने जपानकडून नक्कीच बोध घ्यायला हवा.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required