कित्येक बालकांचं आरोग्य धोक्यात घातलेली लसीकरणाच्या इतिहासातली सर्वात मोठी 'कटर दुर्घटना'!!
सध्या कोरोना लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लस घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि प्रत्येकाने ती घेतलीच पाहिजे. या कोरोना लसीकरण मोहिमेवरून आणखी एका रोगाची लस नक्कीच आठवत असेल… तीच ती, 'दो बूंद जिंदगीके'वाली पोलिओची लस! बरोबर ना? एकेकाळी संपूर्ण जगाला वेठीस धरणारा हा महाभयंकर आजार आटोक्यात आणण्याचे श्रेय नक्कीच पोलिओच्या लसीला दिले पाहिजे. पण आज मात्र आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या लसीकरण मोहिमेत काही त्रुटी राहिल्या, चूक घडली आणि अपघात घडला तर? हे असं पूर्वी अमेरिकेत घडलंय … पोलिओ लसीच्या इतिहासातला एक काळा डाग म्हणून 'कटर दुर्घटना(The Cutter Incident) ओळखली जाते. त्याची माहिती पुढे वाचूच, पण तत्पूर्वी आपण लस ही नेमकी काय संकल्पना आहे ते थोडक्यात समजून घेऊया.
लस ही नेमकी काय संकल्पना आहे?
लस म्हणजे आजारापासून आपले संरक्षण करणारे औषध. थोडक्यात, आपली कवचकुंडले! एखाद्या रोगाची लस म्हणजे त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतू असतात, किंवा त्या जंतूंचा अंश असतो. ही लस शरीरात गेली तर जणू काही त्या रोगाची रंगीत तालीमच होते. लसीत सबळ जंतू नसल्याने आपल्याला रोग तर होत नाही पण आपल्या शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लस उपयुक्त ठरते. म्हणजेच लस घेतल्याने रोग टाळला जातोच, शिवाय रोगासोबत येणारे आजारपण, वेळेचा आणि पैशांचा खर्च, त्रास, मृत्यू या गोष्टीही टाळल्या जातात. इतिहास हेच सांगतो की गेली अनेक वर्षे अनेक जीवघेण्या साथी आल्या आणि आपण लशीची निर्मिती करून त्यांना वेळीच थोपवलं.
आता वळूया मूळ विषयाकडे… लस म्हणजे काय हे तुम्हाला कळलं आहेच, तर कल्पना करा, लस देताना त्यात रोगाच्या मेलेल्या किंवा दुर्बळ जंतूऐवजी रोग पसरवणारे जिवंत जंतू असतील तर? आणि ही लस शेकडो लोकांना टोचली गेली तर? काय हाहाकार उडेल ना मंडळी?
हा प्रकार अमेरिकेत खरोखर घडलाय. पन्नास आणि साठीच्या दशकात पोलिओने धुमाकूळ घातला होता. १९५२ साली आलेल्या साथीत अमेरिकेत ५७,००० लोकांना पोलिओचा संसर्ग झाला होता. त्यातल्या २१,००० लोकांना पंगुत्व आले आणि ३,१४५ लोक मृत्युमुखी पडले. त्यापुढील वर्षात आणखी ३५,००० आणि त्याच्या पुढील वर्षात ३८,००० लोकांना पोलिओचा संसर्ग झाला. पण पोलिओ अमेरिकेपुरताच मर्यादित नव्हता. संपूर्ण जग पोलिओने त्रस्त झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनाही वयाच्या ३९ व्या वर्षी पोलिओ झाला होता. पोलिओची लस निर्माण करणे अत्यावश्यक होते, पण सोबत त्यासाठी आर्थिक पाठबळ उभे करणेही तितकेच महत्वाचे होते. या लसीच्या निर्मिती संदर्भात रुझवेल्ट यांचे एक मित्र Basil O'Connor यांचा इथे उल्लेख करणे आवश्यक आहे. या गृहस्थांनी पुढाकार घेऊन लसीच्या निर्मितीसाठी सामाजिक निधी उभा करण्याची चळवळ सुरु केली. मंडळी आजही आपल्या देशात सुरु असलेल्या पोलिओ लसिकरणाच्या प्रयत्नांना सुरुवातीला आर्थिक पाठबळ 'रोटरी' या संस्थेनेच उभे केले होते.
(Basil O'Connor)
सन १९५४. पोलिओचा कहर सुरूच होता. संशोधक रात्रंदिवस पोलिओची लस बनवण्याचे प्रयत्न करत होते आणि तशातच जोनासा साल्क या संशोधकाला पोलिओची लस बनवण्यात यश मिळाले. अपंग होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिकन नागरिकांना संजीवनीच मिळाली. आता जशी काही कंपन्यांना कोरोनाची लस बनवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे तसेच तेव्हाही अमेरिकेत काही कंपन्यांना पोलिओची लस बनवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.अनेक बालकांना या लसीचे डोस देऊन पोलिओपासून बचाव करण्यात येत होता. पण, सगळे सुरळीत सुरू असताना एक मोठी चूक घडली. एके दिवशी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे कार्यरत असणाऱ्या बरनिस एडी नावाच्या महिला संशोधकाच्या लक्षात ही चूक आली. नवीन आलेल्या लसींचे नमुने तपासणे हे या बरनिस एडीचे काम होते. तिला असं आढळून आलं की कटर लॅबमधून आलेल्या नमुन्यांमध्ये पोलिओचे चक्क जिवंत व्हायरस आहेत! तिने तातडीने ही बाब वरिष्ठांना कळवली.
(बरनिस एडी)
लोकहो, राजकारणी लोकांचे काम कसे असते हे आपण बघतोच आहोत. सध्याही लसींचा तुटवडा पडत असताना एकीकडे जनक्षोभ सांभाळणे आणि दुसरीकडे आपली प्रतिमा मालिन होऊ न देणे ही कसरत त्यांना करावी लागत आहे. तेव्हाही असंच घडत होतं. लोकांकडून पोलिओ लसीची मागणी प्रचंड वाढत होती. मग एडीने दिलेल्या इशाऱ्याकडे साफ दुर्लक्ष केलं गेलं आणि त्या वर्षी तब्बल १,२०,००० बालकांना जिवंत व्हायरस असलेल्या कटर लॅबच्या पोलिओ लसी टोचल्या गेल्या! विचार करा मंडळी… एक एक लस म्हणजे जणू जिवंत बॉम्बच होता. बालकांना रोगमुक्त करण्याऐवजी रोगाची सामूहिक शिकार बनवण्यात आलं. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. जवळपास चाळीस हजार लहान मुलांना 'अबोरटीव्ह पोलिओ' झाला. यात जोराचा ताप येणे, घसा दुखणे, डोकेदुखी, उलट्या, अंगदुखी वगैरे त्रास मोठ्या प्रमाणावर होतात. ५१ मुलांना प्रत्यक्ष पोलिओ झाला आणि त्यांना पंगूत्व आलं. त्यातील पाच मुले आत्यंतिक त्रासाने दगावली.
इतकं झाल्यानंतर मात्र सरकारला जाग आली आणि कटर लॅबच्या लसींचे वितरण थांबवण्यात आले. मात्र घडायचे ते नुकसान घडून गेले होते. शिवाय, या लसींमुळे पोलिओचे संक्रमण वाढतच होते. मृत्यूंची संख्या आता पंचवीसपर्यंत वाढली होती. मग सरकारने ताबडतोब सर्व कंपन्यांच्या लसीचे वितरण थांबवले आणि परत एकदा तपासण्या-पडताळण्या करून मगच लस वितरित करण्याचा निर्णय घेतला. कटर लॅबोरेटरीवर पुढे खटला भरला गेला. त्यांना आर्थिक दंड ठोठावला गेला. १९७४ साली कटर लॅबोरेटरी बायरने विकत घेतली आणि त्यानंतर कटर लॅबोरेटरी हे नाव विस्मृतीत गेले. आजही अमेरिकेत 'कटर दुर्घटना' ही सर्वात मोठ्या औषधी दुर्घटनांपैकी एक मानली जाते. यानंतरच्या काळात आपण वापरतो ती चार थेंबाची 'ओरल' लस आली.
लस निर्मिती, वितरण ते प्रत्यक्ष लस देणं यामध्ये कुठेही अपघात घडू शकतात. त्यामुळं लशींची परिणामकरकता आणि महत्त्व कमी होत नाही. सुरवातीच्या काळातच एका मोठ्या दुर्घटनेला सामोरे गेलेली पोलिओ लसीकरण मोहिम आजच्या घडीला जगातल्या सर्वात यशस्वी आरोग्यमोहिमांपैकी आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा बोभाटाच्या वाचकांसमोर एक नम्र निवेदन काही घटना भूतकाळात घडल्या म्हणून आज लस घेण्यास तुम्ही नकार देऊ नका. शक्य तितक्या लवकर तेव्हा लस घ्या. वेळ लागत असेल तर अॅपचा वापर करून सतत कुठे लस उपलब्ध आहे ते बघा . सध्याच्या अडचणी तात्पुरत्या आहेत. त्यातूनही मार्ग मिळेळच. तुमच्या आणि परिवाराच्या स्वास्थ्यासाठी लवकरात लवकर लस घ्या !
लेखक: अनुप कुलकर्णी