या ९ देशांमधून मॅकडॉनल्ड्सची हकालपट्टी झाली आहे...
बर्गर, फ्राईज, असे फास्टफूड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. असे फास्टफूड खाण्याची इच्छा झाली की पहिले नाव आठवते ते मॅकडॉनल्ड्स. भारतातील बहुतांश शहरात आज मॅकडॉनल्ड्सचा सोनेरी रंगातील ‘एम’चा लोगो दिसतोच. अमेरिकेतील या फास्टफूड रेस्टॉरंट चेनने जवळजवळ जग पादाक्रांत केले आहे. पण जगात असेही काही देश आहेत ज्यांना या मॅकडॉनल्ड्सचे वावडे आहे. आता प्रत्येक देशाला मॅकडॉनल्ड्सचे का वावडे आहे, याची कारणे वेगवेगळी असली तरी जगात फक्त नऊ देश असे आहेत जिथे मॅकडॉनल्ड्सचा सोनेरी एम अजिबात पाहायला मिळत नाही. चला तर मग जाणून घेऊया हे नऊ देश कुठले आहेत आणि मॅकडॉनल्ड्सने त्यांचं नेमकं काय वाकडं केलं आहे.
१. बर्म्युडा –
बर्म्युडा हा एक छोट्या बेटांचा समूह असलेला देश आहे. १९९५ पर्यंत या ठिकाणी मॅकडॉनल्ड्सचे रेस्टॉरंट्स होते. पण आता एकही रेस्टॉरंट पाहायला मिळत नाही. या देशाने १९७० पासूनच परदेशी फास्टफूड रेस्टॉरंट्सवर बंदी आणली आहे. अमेरिकेच्या एका हवाई तळावर तेवढे एकच मॅकडॉनल्ड्स रेस्टॉरंट होते, पण ते हवाई तळच १९९५ साली बंद झाल्याने ते रेस्टॉरंटही बंद पडले.
२. इराण –
अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. याचा परिणाम मॅकडॉनल्ड्स सारख्या रेस्टॉरंटच्या फ्रँचाइजीवर होणे अपरिहार्य आहे. १९७९ पासून इराणमध्ये एकही मॅकडोनल्ड्सचे रेस्टॉरंट दिसत नाही. मॅकडॉनल्ड्सला पर्याय म्हणून इराणने स्वतःचे मॅशडोनाल्ड्स नावाची फास्टफूड रेस्टॉरंटची चेन सुरू केली आहे.
३. मॅसेडोनिया –
मॅसेडोनिया बाल्कन्समधील एक छोटासा देश आहे. इथे काही वर्षापूर्वी फक्त सात मॅकडॉनल्ड्सचे रेस्टॉरंट होते. २०१३ साली मॅकडॉनल्ड्सची फ्रँचाइजी चालवणाऱ्या इसमाने त्याचे लायसन्स गमावल्यानंतर हे सातही रेस्टॉरंट्स बंद करण्याची वेळ आली.
४. येमेन –
मध्य पूर्वेतील या देशाची अर्थव्यवस्था काहीशी डळमळलेली आहे. येमेन मधील अतिरेकी संघटनांनी मॅकडॉनल्ड्सला धमकी दिली आहे, की त्यांनी इथे त्यांचे रेस्टॉरंट सुरूच करून दाखवावे. आता अतिरेक्यांशी पंगा कोण घेईल. त्यापेक्षा मॅकडॉनल्ड्सने या देशात रेस्टॉरंटच नको अशी भूमिका घेतली.
५. मॉंटेनेग्रो –
२०१३ मध्ये मॅकडॉनल्ड्सने इथे एक छोटे फिरत्या स्वरूपाचे हॉटेल सुरू केले होते. या छोट्याशा देशात मॅकडॉनल्ड्सचे बस्तान बसेल का याची चाचपणी करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता. लोकांना मॅकडीचे पदार्थ आवडले असले तरी तिथल्या सरकारने स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी मॅकडॉनल्ड्सवर बंदी आणली.
६. उत्तर कोरिया –
इथली हुकुमशाही पूर्णतः अमेरिकेच्या विरोधात आहे हे तर तुम्हाला माहित आहेच. आता त्याला मॅकडॉनल्ड्स तरी अपवाद कसा असेल. तरीही उत्तर कोरियातील काही बडे नेते फक्त त्यांना खाण्यासाठी म्हणून दक्षिण कोरियातून मॅकडीच्या पदार्थांची स्मगलिंग करतात.
७. झिम्बाब्वे –
२००० मध्ये मॅकडॉनल्ड्सने या छोट्याशा अफ्रिकन देशात पाय रोवण्याचा प्रयत्न केला होता, पण हा देश तेव्हा आर्थिक संकटात होता. इथल्या लोकांना मॅकडॉनल्ड्सचे पदार्थ परवडलेच नसते. त्यामुळे इथे अजूनही एकही मॅकडॉनल्ड्सचे रेस्टॉरंट नाहीये. भविष्यात जर या देशाची आर्थिक स्थिती सुधारलीच तर कदचित मॅकडॉनल्ड्स पुन्हा प्रयत्न करेल असे वाटते.
८. बोलिव्हिया –
दक्षिण अमेरिकेतील या छोट्याशा देशात तशी मॅकडॉनल्ड्सवर कायदेशीर बंदी आणली नसली तरी २००२ मध्ये या देशातील शेवटचे मॅकडॉनल्ड्स रेस्टॉरंट पूर्णतः बंद करण्यात आले. या देशातील सरकार, नागरिक आणि मॅकडोनाल्ड्स यांच्यातील तणावपूर्ण संबंधांवर एकदाचा पडदा पडला. मॅकडॉनल्ड्सला लोकांच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही, त्यांना फक्त त्यांचा आर्थिक फायदा महत्त्वाचा आहे, अशा भावना बोलिव्हियाच्या अध्यक्षांनी व्यक्त केल्या. तिथल्या नागरिकांच्याही याच भावना होत्या. त्यामुळे मॅकडॉनल्ड्सला तिथून आपला बस्ता गुंडाळून बाहेर पडण्याशिवाय पर्यायच नव्हता.
९. आईसलँड –
झिम्बाब्वे प्रमाणेच हा देशही तीव्र आर्थिक संकटाशी झगडत आहे. २००९ पर्यंत या देशाच्या राजधानीत मॅकडॉनल्ड्सचे एकच रेस्टॉरंट होते, पण देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्यावर मॅकडॉनल्ड्सने तिथून काढता पाय घेतला. तसेही इथले नागरिक आरोग्याबाबत खूपच जागरूक आहेत. त्यामुळे सध्या तरी या देशात एकही मॅकडॉनल्ड्सचे रेस्टॉरंट नाहीये. नजीकच्या भविष्यात ही परिस्थिती बदलेल का याबाबतही काही सांगितले जाऊ शकत नाही. तरीही इथे पुनर्पदार्पण करण्यासाठी मॅकडॉनल्ड्स उत्सुक असल्याचे म्हट0ले जाते. आईसलँडमध्ये २००९ साली विकला गेलेला शेवटचा मॅकडॉनल्ड्स बर्गर आणि फ्रेंच फ्राईज आजही जपून ठेवण्यात आले आहेत.
तर हे आहेत काही देश जिथे मॅकडॉनल्ड्सचे रेस्टॉरंट अजिबात पाहायला मिळत नाहीत आणि यामागील बहुतांश कारणे ही आर्थिक किंवा राजकीय आहेत.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी
आणखी वाचा:
मॅकडॉनाल्ड फ्रेंच फ्राइज कसे बनवते तुम्हाला माहित आहे का ?
निळ्या रंगाचा लोगो असलेलं मॅक्डॉनल्ड्सचं जगातलं एकमेव आउटलेट!!