चुकून केसांना गोरिला ग्ल्यू लावलेल्या टेसीका ब्राऊनचं पुढे काय झालं? जाणून घ्या पूर्ण घटनाक्रम!!
"ती आली, तिने विचारलं, आणि ती हिट झाली...'' मध्यंतरी इंटरनेटवर एका रात्रीत चांगलीच प्रसिद्धी मिळालेल्या टेसीका ब्राऊन नावाच्या स्त्रीला हे वर्णन तंतोतंत लागू होतं. कोण आहे ही टेसीका ब्राऊन, आणि तिने नक्की केलं तरी काय?
अमेरिकेच्या लुईझियाना प्रांतात टेसीका ब्राऊन ही ४० वर्षांची डेकेअर चालवणारी महिला राहते. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात एका सकाळी आपली नेहमीची कामं आटपून घराबाहेर पडताना तिच्या लक्षात आलं, केस सेट करण्याचा आपला हेअर स्प्रे संपला आहे. तिच्या ब्रॅन्डचं नाव होतं गॉट टु बी ग्ल्यूड. त्यातल्या ग्ल्यूड या शब्दाने पुढचा सगळा गोंधळ माजवला. कारण घाईघाईत तिने केस सेट करण्यासाठी घरात असलेल्या गोरिला ग्ल्यू चा वापर करायचं ठरवलं. गोरिला ग्ल्यू हे पर्मनंट अडिसिव्ह आहे. त्यात पॉलियुरेथिन नावाचे पॉलिमर्स असतात. पॉलिमर म्हणजे एकाच किंवा भिन्न प्रकारच्या रेणूंच्या लांबच लांब साखळ्या. अगदी सेल्युलोज, प्रोटीन्स हेदेखील पॉलिमर्स आहेत. ते जिथे असतात तिथे त्यांच्या मूलभूत संरचनेमुळे आधार देणं, भक्कमपणे एकत्र बांधून ठेवणं हे काम ते करतात. त्यामुळे अडिसिव्हमध्येही ते असतात. लाकडाचं पाण्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून फर्निचर वगैरेसाठीही गोरिला ग्ल्यू वापरतात.
तर हे गोरिला ग्ल्यू टेसिकाने आपल्या पोनी टेलवर फवारलं आणि बाहेर पडली. काही वेळातच या ग्ल्यूने आपली करामत दाखवायला सुरुवात केली. संध्याकाळी घरी येईपर्यंत तिची वेणी दगडासारखी टणक झाली. अगदी डोक्यावर हेल्मेट असावं अशी. वेणीवर टिचकी मारल्यावर त्याचा स्पष्ट आवाज येऊ लागला. आधी टेसिकाने शॅम्पू वापरून पाहिला पण उपयोग शून्य. शॅम्पू केसांच्या आत शिरलाच नाही. एखाद्या सपाट पृष्ठभागावरून ओघळावा तसा खाली ओघळला. आता मात्र ती घाबरली. तरी आई ओरडेल या धाकाने तिने आधी आईला काही सांगितलं नाही. आपल्याला माहिती असलेले उपाय वापरून केसातला ग्ल्यू काढण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. त्याचा उपयोग होत नाही असं दिसल्यावर तिने आई आणि बहिणींची मदत घ्यायचं ठरवलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळी तेलं लावून पाहिली. पण तरीही काही होईना.
शेवटी तिने इंटरनेटची मदत घ्यायचं ठरवलं. आपला प्रॉब्लेम सांगून त्यावर काही उपाय आहे का हे विचारणारा एक व्हिडीओ तिने पोस्ट केला आणि अक्षरशः एका रात्रीत ती अपेक्षेपेक्षा जास्त प्रसिद्ध झाली. या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज, लाईक्स मिळाले. अर्थात मिळालेल्या प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाच्या होत्या. काही तिच्या मूर्खपणावरून तिचीच खिल्ली उडवणाऱ्या, काही सहानुभूती दर्शवणाऱ्या, तर काही तिच्या समस्येवर काही सल्ले देणाऱ्या. काहींनी चक्क आर्थिक मदतही देऊ केली. एवढं सगळं होऊनही मूळ प्रश्न मात्र कायम होता.
आता एकच उपाय शिल्लक होता- तो म्हणजे वैद्यकीय उपचार. त्यासाठी टेसीका लुईझियाना इथल्या सेंट बर्नार्ड पॅरिश हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे तिला सलाईन वॉटर आणि ऍसिटोनयुक्त नेलपॉलिश वाईप्स देण्यात आले, जे तिला घरच्याघरीही वापरता येण्यासारखे होते. पण हे सोपं नव्हतं. ही प्रोसेस प्रचंड वेळखाऊ होती. शिवाय भयंकर वेदनादायी. एवढं करून त्याचाही म्हणावा तसा परिणाम होत नव्हता. तिने एकदा आपली वेणी कापून टाकण्याचाही प्रयत्न केला, पण त्याचाही उपयोग झाला नाही. यादरम्यान केसांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होण्याचाही धोका होता. महिनाभरात केसांची अजिबात वाढ न होणं हे गंभीर लक्षण होतं. स्काल्पला ऑक्सिजन न मिळाल्याने केसांची मुळं कायमची मृत होण्याचा धोका होता. हा सगळा काळच परीक्षा पाहणारा होता.
जवळपास महिनाभर हा त्रास सोसल्यावर एका अनोळखी फोनने तिचं आयुष्य बदललं. पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने तिला सांगितलं, की बेव्हर्ली हिल्स येथील सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. मायकेल ओबेन्ग याने तिच्यावर सर्जरी करण्याची तयारी दाखवली होती. एरवी १२ हजार ५०० डॉलर्स एवढा खर्च येणारी ही शस्त्रक्रिया तो विनामूल्य करणार होता. (टेसिकानेही या सर्जरीसाठी जमवलेले पैसे मग धर्मादाय खर्च केले.) १० फेब्रुवारीला ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. मेडिकल ग्रेडेड अडेझिव्ह रिमूव्हर, MGD नावाचा घटक, ऍसिटोन, ऑलिव्ह ऑइल आणि कोरफड यांच्या मदतीने तिला या ओझ्यातून मुक्ती मिळाली. मुळात केमिस्ट्रीचा विद्यार्थी असलेल्या ओबेन्गला प्रत्येक पॉलिमरसाठी ते विरघळेल असा सॉल्व्हन्ट (द्रावक) अस्तित्वात असतो हे माहीत होतं. प्रत्यक्ष वापराआधी त्याने आपला फॉर्म्युला मानवी केस लावलेल्या एका डमीवर वापरून पाहिला. यात यशस्वी झाल्यावरच त्याने टेसिकाची 'केस' हातात घेतली. केसांमध्ये जणू सतत मुंग्या नाच करताहेत असं वाटणाऱ्या टेसिकासाठी ही सर्जरी म्हणजे जणू पुनर्जन्मच होता.
एका रात्रीत सोशल मिडीया सेन्सेशन ठरलेली टेसीका ब्राऊन आता या माध्यमाचा गांभीर्याने विचार करतेय. आर्थिक उत्पन्नाचा स्रोत म्हणून त्याचा वापर करता येईल का या दृष्टीनेही तिची चाचपणी सुरू आहे. अनेकांनी यावरून तिच्या मूळ हेतूवर शंका व्यक्त केली आहे. अर्थात प्रसिद्धी म्हटली की या गोष्टी ओघाने आल्याच.
पण या सगळ्या प्रकरणाला एक कारुण्याची किनार आहे. याचा एक पैलू असाही आहे जो माणूस म्हणून आपल्यालाही आतून हलवून सोडतो. ते आहे तिने हे सगळं करण्यामागचं मानसशास्त्रीय कारण. अमेरिकेत गोरे- काळे वर्णभेद अजूनही लोकांच्या मनातून संपलेला नाही. आजही काळ्यांवर स्वतःला सिद्ध करण्याचं प्रेशर आहे. गोऱ्या लोकांच्या तुलनेत आपण कमी पडायला नको, या गोष्टीचा पगडा आहे. आपली राहणी, प्रेझेंटेशन नीटनेटकंच असायला हवं हा या भूमिकेचाच एक भाग. असेही आफ्रिकन वंशाच्या लोकांचे केस मॅनेज करायला कठीण, त्यात ते व्यवस्थित सेट न करता बाहेर जाणं म्हणजे जणू गुन्हाच! बाहेर एखाद्या गोऱ्या स्त्रीपुढे आपण गबाळं, अजागळ दिसायला नको या विचाराने टेसिकाने केस सेट करण्यासाठी समोर दिसलेला ऑप्शन पटकन स्वीकारला आणि त्याची जबरदस्त किंमत मोजली. आता तिने केलं ते चूक की बरोबर? तुम्हाला काय वाटतं?