तब्बल ३०० वर्षांपूर्वी पर्यावरण चळवळ चालू होण्यास कारणीभूत ठरलेल्या बिश्नोई अमृतादेवींची गोष्ट!!
भारत हा निसर्गाच्या विविध रूपांनी नटलेला देश. उत्तुंग पर्वतशिखरं, जंगलं, सागरकिनारे, वाळवंट, बर्फाळ प्रदेश अशी संपन्नता आपल्याकडे आहे. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत निसर्गाकडे आपण अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे होणारा पर्यावरणाचा र्हास ही चिंतेची बाब बनली आहे. यातूनच अनेक पर्यावरण चळवळी उदयास आल्या आहेत.
भारताच्या पर्यावरण चळवळीच्या इतिहासात एका चळवळीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ती म्हणजे बिश्नोई चळवळ. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी सन १७३० मध्ये जोधपूरजवळच्या एका छोट्याशा खेड्यात खेजरीचं झाड तोडण्यासाठी आलेल्या राजाच्या सैनिकांना अटकाव करत गावातील ३६३ गावकऱ्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. याची सुरुवात झाली ती एका महिलेपासून. अमृतादेवी हे तिचं नाव. हे सर्व गावकरी बिश्नोई जमातीचे होते आणि त्यांच्या जमातीच्या धर्माच्या शिकवणुकीनुसार निसर्गाचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी हा मार्ग पत्करला होता. नक्की काय आहे त्यांचा धर्म आणि त्याची शिकवण तरी काय आहे?
'ग्रेट इंडियन डेझर्ट' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या थारच्या वाळवंटाचा जवळपास साठ टक्के भाग राजस्थानात येतो. या प्रदेशात पर्जन्यमान अत्यंत कमी आणि अनियमित आहे. येथील जमीन वालुकामय, क्षारपड असल्याने नापीक आहे. तसंच येथील हवामान अत्यंत विषम आहे. उन्हाळ्यात जवळपास ५० डिग्री पर्यंत पारा चढतो आणि वाळूची वादळं होऊन ताशी १५० किमी वेगाने वारे वाहतात. या सगळ्यामुळे या वाळवंटामध्ये झाडंझुडपं, हिरवळ अशी नाहीच. या पार्श्वभूमीवर इथे असलेल्या खेजरीच्या झाडांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
(खेजरीचे झाड)
खेजरीची झाडं म्हणजेच शमी. थारच्या वाळवंटाची जीवनरेखाच! रामायण, महाभारतात त्यांचा उल्लेख आढळतो. या झाडांचे तसे अनेक फायदे आहेत. ती सावली पुरवतात, शिवाय त्यांची पानं उंट, शेळ्यामेंढ्या, गुरं यांच्यासाठी वैरण म्हणून कामाला येतात. या झाडाच्या लाकडाचा उपयोग जळण म्हणून होतो, शिवाय याच्या शेंगा खाण्यायोग्य असतात. याची मुळं नायट्रोजन स्थिरीकरण (वातावरणातल्या नायट्रोजनचं जमिनीला उपयुक्त संयुगात रूपांतर करणं) करण्यासाठी मदत करतात, ज्यायोगे जवळपासची जमीन सुपीक व्हायला मदत होते. त्यामुळे बिश्नोई जमातीसाठी खेजरी हा कल्पवृक्ष ठरला आहे. या झाडांखेरीज इथे आढळणारे काळवीट, चिंकारा यांसारखे प्राणी आणि तितर, लावे यांसारखे पक्षी इथल्या पर्यावरणाचे घटक आहेत. त्यामुळेच सलमान खानकडून काळविटाची शिकार करण्यात आल्यानंतर त्याविरोधात बिश्नोई समाजाने जोरदार आवाज उठवला होता.
याच निष्ठूर वाळवंटाचा अजून एक अविभाज्य घटक म्हणजे खुद्द बिश्नोई जमात. या जमातीचे लोक यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषेमुळे सहज ओळखू येतात. पुरुष बहुधा पांढरे कपडे घालतात तर स्त्रिया रंगीबेरंगी घागरा चोळी. लाल, पिवळा, गुलाबी अशी रंगसंगती असलेले हे कपडे वाळवंटाच्या रखरखीत पार्श्वभूमीवर उठून दिसतात. शिवाय यांचे दागिने पण जाडजूड आणि ठसठशीत असतात. दंडात वाक्या, पायात पैंजण आणि नाकातली अर्धचंद्राकृती पट्टीसारखी दिसणारी आणि तोंड झाकणारी धातूची नथ हे यांचे खास अलंकार.
पंधराव्या शतकात होऊन गेलेल्या संत गुरु जांभेश्वर यांचे हे अनुयायी आहेत. गुरु जांभेश्वर यांनी सांगितलेले २९ नियम म्हणजे बिश्नोई जमातीची जीवनसूत्रं. मुळात बिश्नोई या शब्दाची उत्पत्तीही या २९ सूत्रांवरूनच झालेली आहे. बिश म्हणजे २० आणि नोई म्हणजे ९. थोडक्यात वीस आणि नऊ मिळून २९. तर हे लोक या २९ सूत्रांचं निष्ठेने पालन करतात. यापैकी सात नियम चांगलं सामाजिक वर्तन कसं असावं यासंबंधी आहेत, दहा नियम वैयक्तिक आरोग्यासंबंधी मार्गदर्शन करतात, चार नियम रोजच्या धार्मिक विधीबद्दल दिशा दर्शवतात, तर उर्वरित आठ नियम निसर्ग म्हणजेच आजूबाजूची झाडं आणि प्राणीजीवन यांच्या जतनाची आणि संरक्षणाची शिकवण देतात. या शिकवणीतूनच बिश्नोई जमात निसर्गाशी आणि आजूबाजूच्या कठोर वाळवंटाशी एकरूप झालेली आहे. पर्यावरणाचं संरक्षण करणं ही आपली मूलभूत जबाबदारी, नव्हे धर्म आहे असं हे लोक मानतात. त्यामुळे त्यांच्या वस्त्यांमध्ये हिरवाई फुललेली दिसते आणि हरीण, नीलगाई यांच्यासारखे प्राणी गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात.
तर असंच एक गाव जोधपुरपासून १८ किलोमीटर अंतरावर होतं. त्याचं नाव होतं खेजर्ली. इतर वस्त्यांत प्रमाणेच हे गाव हिरवंगार होतं. इथे खेजरीची झाडं विपुल प्रमाणात होती. नेमकी हीच गोष्ट गावासाठी संकट ठरली.
त्यावेळी जोधपूरचे महाराज अभयसिंग यांनी नवीन राजवाडा बांधायला घेतला होता. त्या काळात बांधकामासाठी सिमेंट म्हणून मुख्यतः चुनखडी, वाळू आणि पाणी यांचं मिश्रण वापरलं जात असे. चुनखडी तयार करण्यासाठी भट्टीमध्ये उच्च तापमानाला चुन्यावर प्रक्रिया केली जाई. त्यासाठी या भट्ट्या सतत चालू ठेवाव्या लागत आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर इंधनाची गरज भासे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लाकूड हवं होतं. ही गरज अर्थातच या खेजरीच्या झाडामुळे भागवली जाणार होती. त्यासाठी महाराजांची माणसं खेजरली गावापाशी आली.
तारीख होती ११ सप्टेंबर १७३०. गावातली खेजरीची झाडं तोडण्यासाठी मोठ्यामोठ्या कुऱ्हाडी घेऊन आलेली ती अनोळखी माणसं पाहून गावातील एक महिला- अमृतादेवी- पुढे सरसावली. तिच्या लक्षात आलं की ही माणसं ही झाडं तोडण्यासाठी आलेली आहेत. झाड तोडणं किंवा झाडाच्या कुठल्याही भागाला इजा पोहोचवणं हे त्यांच्या धर्मानुसार निषिद्ध होतं. त्यामुळे सुरुवातीला अमृतादेवीने या माणसांना विरोध करून पाहिला. पण राजाचे सैनिक या विरोधाला जुमानणार नाहीत हे तिच्या लवकरच लक्षात आलं. एव्हाना बाहेरची गडबड ऐकून तिच्या तीन मुलीही अंगणात आल्या होत्या. शेवटी अमृतादेवीने एका खेजरीच्या झाडाला मिठी मारली.
'प्राण देऊन मला एक जरी झाड वाचवता आलं तरी ते खूप मोलाचं ठरेल' अशी तिची यामागची भावना होती. त्या सैनिकांना मात्र त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. त्यांनी तिच्यासकट झाडावर कुर्हाडीचे घाव घालायला सुरुवात केली. अशाच एका घावाने तिचं शिर धडापासून वेगळं केलं. तिच्या मुली भेदरलेल्या नजरेने आणि धक्का बसलेल्या विषण्ण मनाने हे पाहत होत्या. त्यांची आई गेली तिथं त्यांच्यासाठी सगळं संपलं. त्यांनीही मग आईच्या पावलावर पाऊल टाकत खेजरीच्या झाडांना आणि पाठोपाठ येणाऱ्या मरणाला कवटाळलं.
एव्हाना ही बातमी आजूबाजूच्या गावात वार्यासारखी पसरली. बाजूच्या ८३ गावांमधले बिश्नोई जमातीचे लोक खेजर्लीमध्ये जमले. तिथे त्यांनी एक छोटी सभाच घेतली. त्या सभेची निष्पत्ती होती एक अनोखी शपथ! 'गावात तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक खेजरीच्या झाडासाठी एका माणसाने आपल्या प्राणांचं बलिदान द्यायचं' त्या एकाच दिवशी ४९ गावांमधील ३६३ ग्रामस्थांनी निसर्ग रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वतःचं रक्त सांडताना आपल्या बाजूने अहिंसा धर्माचं पूर्णतः पालन करत मरण पत्करलं.
ही गोष्ट महाराजा अभय सिंग यांच्या कानावर गेली तेव्हा त्यांना चांगलाच पश्चात्ताप झाला. बिश्नोई जमातींची क्षमा मागून त्यांनी बिश्नोईंच्या आजूबाजूला असलेल्या झाडांना आणि पशुपक्ष्यांना पूर्णतः संरक्षण मिळावं असा फतवा काढला. आजही ही प्रथा कायम आहे आणि बिश्नोई जमात निसर्गाची प्राणपणाने काळजी घेत आहे.
नंतरच्या काळात देशात चिपको आंदोलनासारख्या अनेक पर्यावरणविषयक चळवळी झाल्या, परंतु देशातले आद्य पर्यावरणवादी म्हणून बिश्नोई जमातीचं स्थान कायम आहे. असं असलं तरी त्यांच्या दृष्टीने मात्र ते केवळ त्यांच्या धर्माच्या शिकवणीचं पालन करत आहेत. २०१९ मध्ये एका बिश्नोई महिलेचा स्वतःच्या बाळाबरोबरच एका हरणाच्या पिल्लाला स्तनपान करत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो लोकांसाठी चर्चेचा विषय ठरला तरी त्यातून या जमातीची निसर्गाशी जुळलेली नाळ दिसून येते.
विकासाच्या नावाखाली सर्वत्र पर्यावरणाचा विध्वंस सुरू असताना या जमातीच्या रूपाने अजूनही आशेला जागा आहे.