जुळ्या भावंडांची रास...मिथुन राशीच्या जन्माची कथा माहित आहे का??
हा लेख वाचण्यापूर्वी एक महत्वाची सूचना जरूर वाचा : 'बोभाटा'च्या माध्यमातून फलज्योतिष्य किंवा त्यासारख्या विषयांचा पाठपुरावा किंवा प्रचार केला जात नाही. हा लेख निव्वळ मनोरंजक माहिती आणि प्राचीन इतिहास सांगण्यासाठी लिहिला गेला आहे.
तुम्हाला आठवतच असेल बरीच वर्षे घरी नव्या बाळाचे आगमन झाले की बाळाची 'नाव-रास' शोधली जात असे. गावातला जाणकार माणूस पंचांग उघडून बाळाचे नाव कोणत्या अक्षरावरून ठेवायचे ते सांगत असे. या नावाचा संबंध जन्माला आलेल्या बाळाची राशी कोणती आहे याचे निदर्शक असायचे. त्यानंतर ही रुढी थोडी बदलली. त्याच त्या नावांचा लोकांना कंटाळा आला. राशीप्रमाणे नाव फक्त बारशाच्या दिवशी पाळण्यात घालण्यापुरतेच असा संकेत रुढ झाला. व्यवहारातील नाव- शाळेतले नाव वेगळे ठेवले जायचे.
आता त्या 'नाव-रास' परंपरेचा वापर फारसा कोणीही करत नाही. मग प्रश्न असा आहे की आधीच्या काळात 'नाव-रास' ही पध्दत का होती? त्याचे कारण सोपे आहे. त्यावेळी समाजात शिक्षणाचा प्रसार झाला नव्हता. फलज्योतिषाचा उपयोग आयुष्यात वारंवार केला जायचा. परंतु पंचांग घरी नसायचे. अशावेळी राशीचे नाव लक्षात ठेवण्याचा सोपा उपाय म्हणजे 'नाव-रास' ही पध्दत वापरली जायची.
पाश्चात्य देशात नाव राशीवरून ठेवण्याचा प्रघात नसला तरी अमुक माणसाची राशी अमुक आहे हे ठरवण्याचे आणि ते प्रमाण मानण्याचे संकेत होतेच. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य पध्दतीत एक महत्वाचा फरक असा आहे की पाश्चिमात्य देशात जन्माच्या वेळी सूर्य ज्या राशीत असेल ती रास गृहीत धरली जायची. आपल्याकडे मात्र जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असेल ती त्या बाळाची राशी सनजली जाते.
आता आपल्या डोक्यात एक प्रश्न येईलच तो असा की मग राशी का मानायच्या. हा गोंधळ निर्माण झाला अॅस्ट्रॉलॉजी आणि अॅस्ट्रॉनॉमी या शाखा एकत्र केल्यामुळे !
अॅस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्राप्रमाणे आपले अवकाश १२ भागात विभागले गेले आहे. म्हणजेच ३६० अंशाचा अवकाश १२ भागात विभागला जातो. एक भाग ३० अंशाचा! या भागांना काहीतरी नावे द्यायला हवीत, ती लक्षात रहावी म्हणून त्यांना नावे देण्यात आली. असा ३० अंशाचा अवकाश म्हणजे राशी! या राशीचा आणि फलज्योतिषातील राशी संकल्पनेचा एकत्र विचार केला गेल्याने सगळा गोंधळ निर्माण झाला.
असे असले तरी या प्रत्येक राशीच्या नावामागे काही कहाण्या जोडल्या गेल्या आहेत. त्या मनोरंजक आहे आणि मानवी इतिहासाचा भाग आहेत. त्यापैकी आज आपण वाचू या जेमिनी म्हणजे मराठीतल्या मिथुन राशीसोबत असलेल्या ग्रीक- पुराणातील कथा!
२१ मे ते २० जून या काळात सूर्य मिथुन राशीत असतो. या काळात जन्माला आलेल्यांची राशी मिथुन मानली जाते. तर मिथुनची कहाणी अशी आहे.
जेमिनी -मिथुन ही राशी म्हणजे जुळ्यांची राशी समजली जाते. ही जुळी भावंडे म्हणजे कॅस्टर आणि पॉलक्स, यांच्या आईचे नाव लेडा! ही दोन्ही भावंडांची आई एक असली तरी वडील वेगवेगळे होते. या भावांच्या जन्माची कथा म्हणजे एक भारी मनोरंजक प्रकार आहे. यांची आई म्हणजे लेडा दिसायला फार सुंदर होती. इतकी सुंदर की देवांचा राजा झ्यूस तिच्या प्रेमात पडला. पण झ्यूसच्या बायकोची त्याच्यावर करडी नजर असायची म्हणून तो वेगवेगळी रुपं धारण करून हौस भागवायचा. आता लेडाला मोहात पाडण्यासाठी त्याने हंसाचे रुप घेतले आणि तिच्यासोबत संग केला. त्याच रात्री लेडाने पतीसोबत पण शय्यासोबत केली. त्यातून तिला एकाचवेळी दोघांपासून दिवस गेले आणि चार अपत्ये जन्माला आली.
दोन मुलं देवाची आणि दोन मुलं मानवाची झाली! दोन मुली आणि दोन मुलं! स्पार्टा साम्राज्याच्या राजापासून जन्माला आला तो कॅस्टर, तो मानव असल्याने तो मर्त्य होता. चिरंजीव नव्हता. त्याचा भाऊ पॉलक्स, त्याचा जन्म झ्यूस या देवतेपासून झाला होता म्हणून तो अमर्त्य होता. पुढे या दोन भावंंडांचं आयुष्य लढाया करण्यातच गेलं. त्यांच्या बहिणी पण सुंदर असल्याने त्यांचे रक्षण करणे हेही लढायांचे कारण होते. त्यानंतर हे भाऊ फोबी आणि हिलेरीया नावाच्या मुलींच्या प्रेमात पडले. पण त्या दोघींची लग्नं आधीच दुसर्यांसोबत ठरलेली होती. तेही योध्दे असल्याने या भावांवर चाल करून आले आणि एका युध्दात कॅस्टर मरण पावला तेव्हा त्याच्या भावाने त्याचे अमरत्व आपल्या भावाला पण मिळावे असा झ्यूसला आग्रह केला. झ्यूसने त्याची विनंती मान्य केली आणि कॅस्टर पण अमर झाला. त्यांच्या अमरत्वाचे चिन्ह म्हणजे जेमिनी राशी! मिथुन म्हणजेच जेमिनी राशीचे चिन्ह पण या जुळ्यांचे चिन्ह दर्शवते!
आता राशी म्हणजे बारा घरांपैकी एक घर असं समजलं, तर या घराचा मालक कोण असाही प्रश्न उभा राहतो. अॅस्ट्रॉलॉजीच्या नियमानुसार या घराचा मालक बुध हा समजला जातो. पण तो मालक का समजला जातो याचे कारण रोमन पौराणिक कथेत असे आहे की अमर देव आणि मर्त्य मानव यांच्यामधला दुवा म्हणजे बुध ग्रह !
आता बुधाचे नाव आहे 'मर्क्युरी'. मर्क्युरी म्हणजे पारा. पारा हा धातू आहे, पण तो द्रवरुप आहे, क्षणाक्षणाला तापमानाप्रमाणे रुप बदलतो म्हणजे तो 'फास्ट'आहे. तो इकडचा नाही आणि तिकडाचाही नाही. म्हणजेच तो एकदम दलाली करण्याच्या लायकीचा आहे. म्हणून बुधाला अमर देव आणि मर्त्य मानव यांच्यातला मध्यस्थ म्हटले जाते. अशा शास्त्रीय तथ्यांचा गोलमाल एकत्र करून जन्माला आली अॅस्ट्रॉलॉजी! तेव्हा आता तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर अॅस्ट्रॉनॉमीचा करा. अॅस्ट्रॉलॉजीचा नाही असा आमचा अनाहूत सल्ला आहे.
(बुध)
पण पौराणिक कथा ऐकण्यासाठी कोणाचीच मनाई नाही हे खरं आहे. अशा अनेक कथा प्रत्येक राशी आणि नक्षत्रासोबत जोडल्या गेल्या आहेत! नक्षत्रं? अरे, हो नक्षत्रं म्हणजे काय ते आणि त्यांच्या कथा काय हे तर आम्ही सांगितलेच नाही. हरकत नाही. हा लेख तुम्हाला आवडला तर पुढच्या भागात सांगूच!