computer

हापूस नाही तर आंब्यांच्या या दोन प्रजाती बाजारावर राज्य करत आहेत....त्यांच्यात काय वेगळेपण आहे?

आंबा हा फळांचा राजा समजला जातो तर आंब्यांच्या प्रजातीत हापूस हा सर्वोच्च पदावर आहे. पण किमतीच्या बाबतीत हापूस हा बराच मागे पडतो. भारतात असे दोन प्रकारचे आंबे आहेत जे सर्वाधिक किमतीला विकले जातात. या आंब्यांच्या प्रजातींची नावे तशी महाराष्ट्रात कमीच माहिती आहेत. म्हणूनच आज भारतातल्या या दोन खास आंब्यांच्या प्रजातींविषयी जाणून घेऊ या!!

तर, आंब्यांच्या या दोन जातींपैकी एकाचे नाव मुघल राणीवरून ठेवण्यात आले आहे, तर दुसऱ्याची निर्मिती थेट नवाबासाठी करण्यात आली होती. एकाचे नाव आहे नूरजहाँ तर दुसऱ्याचे नाव आहे कोहितूर. नूरजहाँ मध्यप्रदेशचा तर कोहितूर हा बंगालचा आहे. यांच्या एकेक आंब्याची किंमत हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. यांची किंमत जास्त असण्यामागे त्यांची कमी उपलब्धता हे पण एक कारण आहे. 

नूरजहाँ :आंब्यांची राणी

आजवर आंब्यांचा राजा ऐकले असेल पण नूरजहाँ मात्र आंब्यांची राणी आहे. मध्य प्रदेशातील काठीवाडा हा परिसर धबधबे, पाऊस आणि नूरजहाँ या तीन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. इथली माती आणि वातावरण हे आंब्यांसाठी पोषक मानले जाते. 

नूरजहाँ आंब्यांचा प्रवास हा अफगाणिस्तान व्हाया गुजरात आणि तिथून मध्यप्रदेश असा झाल्याचे मानले जाते. काठीवाडा येथील शेतकऱ्यांची अशी समजूत आहे की आपण एकटेच या आंब्याचे उत्पादक आहोत. हा आंबा जगातील सर्वात मोठा आंबा असल्याचा देखील दावा आहे. आंब्याचे उत्पादनच मुळी कमी होत असल्याने हा आंबा ज्याला मिळाला तो भाग्यवान समजला जातो.

या एकाच आंब्याचे वजन हे तब्बल २.५- ३.५ किलो एवढे असते तर आकाराने हा आंबा फूटभर लांब असतो. या आंब्याचे झाड १२ फुटापर्यंत वाढते. आपल्याच आंब्यांचा भार पेलण्यासाठी झाडाला आधार द्यावा लागतो. सिजनच्या सुरुवातीपासून म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारीपासूनच त्यांची बुकिंग सुरू होते. आकाराच्या मानाने किंमत ठरत हजारपेक्षा जास्त किंमतीला एकेक आंबा विकला जातो. 

मुघलांनी जेव्हा आंब्याच्या विविध जातींवर लक्ष दिले तेव्हा या आंब्याचे नाव मुघल राणी नूरजहाँ हिच्या नावावरून ठेवण्यात आले. या आंब्याला मल्लिका ए आम असेच म्हटले जाते. आज जरी या आंब्याला अच्छे दिन आले असले तरी ५ वर्षांपूर्वी हा आंबा दुर्मिळ होऊन बसला होता. पण सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढवले आहे. भविष्यात अजून जास्त शेतकरी हा आंबा पिकवू लागले तर तो देशभर पोहोचू शकतो.

कोहितूर : नवाबासाठी बनवलेला आंबा.

पश्चिम बंगालमधील मुर्शीदाबाद येथील अनेक गोष्टी नवाबाच्या राज्याच्या आठवणी दाखवतात. कोहितूर आंबा देखील त्याच गोष्टींमधील एक आहे. ज्याप्रमाणे इतर अनेक  गोष्टी नवाबाच्या देखरेखीखाली तयार करण्यात आल्या तसेच या आंब्याची जात देखील नवाबाच्या सूचनेनुसार विकसित करण्यात आली.

असे म्हणतात की, १८व्या शतकात बंगालचा नवाब सिराज उद्दौला याने हकीम अदा मोहम्मदी याला आंब्यांच्या नवीन प्रजाती शोधण्यासाठी नेमले होते. हा आंबा जेव्हा शोधण्यात आला तेव्हा तो काही काही मातब्बर लोकांपर्यंतच मर्यादित राहिला. राजेशाही कुटुंब, मोठे व्यापारी यांनाच त्याची चव माहिती होती. 

कोहितूरचा हा इतिहास, त्याची चव आणि अर्थातच मोजक्या प्रमाणात उपलब्ध असणे या गोष्टींमुळे एका कोहितूर आंब्याची किंमत ही १५०० रुपयांपेक्षा जास्त असते. याखेरीज नवाबाकडून आलेला असल्याने या आंब्याची देखरेखही नवाबी पद्धतीने होते. जसे की या आंब्याला झाडावरुन काढण्यासाठी विशिष्ट पद्धत अवलंबली जाते. आंबे खाली पडू नयेत यासाठी तागाच्या पिशव्या लावलेल्या असतात. शिवाय अगदी कमी अंतराच्या प्रवासातही कोहितूरची चव बदलते असा समज आहे. त्यामुळे आंब्याला अतिशय काळजीपूर्वक एका परिसरातून दुसऱ्या परिसरात नेले जाते. 

कोहितूरचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे. त्याला GI टॅग देऊन त्याची लागवड वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आंब्याबद्दल विशेष प्रेम आणि आदर लोकांमध्ये आहे. हा आंबा कापण्यासाठी इतर नेहमीच्या चाकूऐवजी लाकडी चाकू वापरण्यात येतो.

आता या आंब्यांची ओळख झालीच आहे तर सिजन संपण्याआधी या आंब्यांवर ताव मारून टाका राव!!

सबस्क्राईब करा

* indicates required