computer

चोवीस तास विजेचे तांडव सुरु असणारे पृथ्वीवरील एकमेव ठिकाण...यामागे काय रहस्य आहे?

पाऊस येण्याआधी आकाशात काळेकुट्ट ढग दाटून येतात, आकाशात विजा चमकू लागतात, ढगांचा मोठमोठ्याने गडगडाट चालू असतो. ढगाळ वातावरणासह होणारा गडगडाट आणि कडकडाट ऋतू बदलाचे संकेत देत असतो. ढगांचा आवाज आणि लाकाकणाऱ्या विजा हा योगायोग काही आपल्या वाट्याला रोजरोज येत नाही, त्यामुळे अशा वातावरणाबद्दल कुतूहल वाटते, थोडीशी भीतीही वाटते आणि आनंदही होतो. समजा आकाशातील विजांचे हे तांडव कधी थांबलेच नाही तर काय होईल? कल्पनाही करणे अशक्य आहे ना? पण जगात असे एक ठिकाण आहे जिथे वर्षभर वादळ आणि विजांचा कडकडाट सुरूच असतो. अगदी एका सेकंदभरासाठीही इथल्या विजांचा कडकडाट थांबत नाही. चला तर मग फार वेळ न दवडता आता आपण हे ठिकाण कुठे आहे आणि तिथे असे वातावरण का असते याची माहिती घेऊया. 

वर्षातील बारा महिने विजांचा कडकडाट होणारे हे ठिकाण व्हेनेझुएलामध्ये आहे. दक्षिण व्हेनेझुएलामध्ये  मराकाइबो नावाचे एक तळे आहे. हे तळे कातातुंबो नावाच्या नदीला जाऊन मिळते. जिथे या तलावाचा आणि नदीला संगम होतो अगदी त्याच ठिकाणी चोवीस तास हे विजेचे तांडव सुरु असते. या ठिकाणाला कातातुंबो लाईटनिंग असेही म्हटले जाते. एका तासाला ३,६०० वेळा, म्हणजेच प्रत्येक सेकंदाला एकदा इथे वीज चमकते. वर्षातून ३०० दिवस तरी इथे हेच चित्र असते. अध्येमध्ये कधीतरी ही वीज अचानकच गायब होते पण, अगदी थोड्या कालावधीसाठीच.

सुमारे गेली एक हजार वर्षे झाली असतील इथे हे विजेचे नृत्य सातत्याने सुरूच आहे. म्हणून स्थानिक लोक या नदीला ‘रिव्हर ऑफ फायर’ म्हणजे विजेची नदी असे म्हणतात. या विजेचा प्रकाश इतका प्रखर असतो की, ४०० किमी अंतरावरूनही ही वीज पाहता येते. 

निसर्गाच्या या करामतीमागे काय रहस्य आहे, हे जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनीही अनेक तर्क वितर्क लढवले आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते मराकाइबो तलावाच्या परिसरातील हवेत मिथेन वायूचे प्रमाण जास्त आहे, म्हणून इथे वीज चमकते. काही शास्त्रज्ञांच्या मते इथल्या वाऱ्याची दिशा आणि विशिष्ट भौगोलिक रचना यामुळे कदाचित इथे कायम वीज चमकत असावी. 

स्थानिक लोकांच्या मते हा त्यांच्या देवतेचा कोप आहे, म्हणूनच ही जागा अशी वर्षभर वादळी वाऱ्याने आणि विजांच्या कडकडाटाने भरलेली असते.

मराकाइबो तलावाच्या एका बाजूला पर्वताची रांग आहे. कॅरिबियन समुद्रावरून येणारे उष्ण वारे, तलावाच्या परिसरातील थंड वारे, सोबतच तलावाच्या पाण्याची होणारी वाफ या सर्वांच्या एकत्रित परिणामांमुळे इथे सतत वादळ आणि विजा होत असाव्यात असाही शास्त्रज्ञांचा कयास आहे. काहींच्या मते इथल्या जमिनीत युरेनियमचा मोठा साठा असावा जो आपल्याकडे वीज आकर्षित करीत असेल. या तलावाच्या खाली जमिनीत इंधनाचे साठे असल्याचाही दावा केला जातो. अर्थात, हे सगळेच फक्त अनुमान आहेत. या वादळ आणि विजांमागील नेमके कारण काय असावे हे याचे गूढ अजूनही उकललेले नाही. नासाचे एक संशोधक पथकही इथल्या या रहस्यमयी वातावरणाचा शोध घेत आहे. 

अधूनमधून काही काळ ही वीज अचानक गायबही होते. २०१० मध्ये तर तब्बल सहा आठवडे ही वीज दिसली नव्हती. तेव्हाही अनेकांना आश्चर्य वाटले होते. नदी आणि तलावातील पाणीही आटले होते. व्हेनेझुएलावरील एका नव्या संकटाची ही चाहूल तर नाही ना, असेही काही जणांना वाटले पण थोड्याच दिवसात पुन्हा ही वीज दिसू लागली. अधेमध्ये गायब होत असली तरी, सलग सहा आठवडे गायब होण्याची ही पहलीच वेळ होती. 

या सगळ्या घटनांमागे नेमके काय कारण असावे हे पुरेसे स्पष्ट होत नसल्याने,सध्या तरी व्हेनेझुएलाच्या या तळ्याने सर्वांनाच कोड्यात टाकले आहे. 


लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required