९१ वर्षांच्या आजीबाई मायक्रोसॉफ्ट पेंटमध्ये तरुणांनाही लाजवतील अशी चित्रे काढत आहेत....ही चित्रे पाहून घ्या!!
Age is just a number ही उक्ती आपल्याला अशी कितीदा वापरायला मिळते? शिक्षणाला, कलेला, कर्तृत्वाला वयाचे बंधन नसते. मनात इच्छा असली की कुठल्याही वयात आपली आवड आपल्याला जोपासता येते. वय आपल्यापासून काहीच हिरावून घेत नाही. हेच सिद्ध करत एका स्पेनमधील ९१वर्षीय आजींनी आपल्या कलेने सर्वांना चकित करत सोशल मीडियावर हजारो फॉलोवर्स बनवले आहेत.
एका ठराविक वयानंतर हाताने सही करणेही अवघड होते. हात थरथर कापतात, डोळ्यांनी दिसत नाही, एका ठिकाणी खूप वेळ बसता येत नाही असे अनेक शारीरिक त्रास होतात. पण स्पेनमधील व्हॅलेन्सिआ शहरातल्या एका आजींनी ९१ व्या वर्षी अशी काही सुंदर चित्रे काढली आहेत की तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही! या वयात अशी चित्र काढणाऱ्या आजींचे नाव आहे कांचा गार्सिया झेरा. या वयात त्यांनी संगणकावर काढलेली चित्रं पाहून जगभरातून कलाप्रेमींची वाहवा मिळवली आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणतेही आधुनिक ॲप किंवा सॉफ्टवेअर न वापरता कांचा आजी त्यांच्या संगणकावर मायक्रोसॉफ्ट पेंटमध्ये ही सर्व चित्रे काढतात. तुम्ही ती चित्रे पहा. कमालीची रंगसंगती आणि सुबकता तुम्हाला प्रत्येक चित्रात दिसेल. एका वेगळ्या जगात नेणारी कलाकृती, एखाद्या मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकांत जशी चित्र असतात तशी काहीशी वाटतात.
दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे आजापणामुळे निधन झाले. तेव्हा त्यांना एकटेपणा जाणवू लागला. त्यांनी स्वतःला व्यस्त ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांना एक जुना संगणक मिळाला आणि त्यांनी स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी मायक्रसॉफ्ट पेंट प्रोग्रामवर वेळ घालवायला सुरुवात केली. त्यांना हळूहळू त्यातल्या खुबी समजत गेल्या आणि आजीबाई चिकाटीने चित्रकला शिकू लागल्या.
नंतर २०१७ मध्ये कांचा आजींच्या नातवंडांनी त्यांना इन्स्टाग्रामवर खाते उघडण्यास सांगितले आणि त्यावर अकाउंट उघडून पोस्ट करण्यास शिकवले. तेव्हापासून त्यांनी अनेक चित्र त्यावर पोस्ट केली. त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. conchagzaera हे त्यांच्या अकाउंटचे नाव आहे आणि आजवर त्यांनी १०० हून अधिक चित्रे पोस्ट केली आहेत. आज त्यांचे तब्बल ३०१ K फॉलोअर्स आहेत. तसेच त्यांचे हे इन्स्टाग्राम अकाउंट verfied ही झाले आहे.
त्यांना एक चित्र काढायला साधारणपणे दोन आठवडे लागतात. त्यांच्या चित्रात जुना काळ दिसतो. तेव्हाचे शहर, घरं असे अनेक संदर्भ दिसतात. त्यांच्या मूळ गावचे चित्र ही त्यांनी रेखाटले आहे. MS पेंटवर अशी रंगीत दुनिया उभारणे अजिबात सोपे नाही. खूप संयम आणि चिकाटीने त्या हे काम करतात.
या वयात इतक्या उत्साहाने नवीन काही शिकून चित्रं काढणाऱ्या आजींना कितीतरी जणांना प्रेरणा देत आहेत. कोणतीही नवी गोष्ट शिकण्यात वयाची आडकाठी येत नाही हाच संदेश कांचा आजी सर्वांना देतात.
लेखिका: शीतल दरंदळे