एकमेकांवर गोळ्या झाडणे हा ऑलिंपिकमध्ये खेळ होता? ऑलिंपिकच्या इतिहासातील हा अज्ञात किस्सा वाचा!!
ऑलिंपिकची सुरुवात झाल्यापासून ते आजतागायत या स्पर्धेत कितीतरी बदल होत आले आहेत. पूर्वी खेळले जाणारे काही खेळ आज खेळले जात नाहीत, तर पूर्वी ज्या खेळांना ऑलिंपिकमध्ये स्थान नव्हते तेच आज ऑलिंपिकचं मैदान गाजवत आहेत. काही खेळांच्या बाबतीत खेळ तसेच आहेत, पण त्यांची पद्धत बदलली आहे.
बंदूक द्वंद्व
पूर्वी म्हणजे १९०८ साली, ऑलिंपिकमध्ये बंदुकीने द्वंद्व युद्ध खेळले जात असे. एकमेकांविरुद्ध बंदुकीच्या गोळीचा नेम धरून प्रतिस्पर्ध्याला मात दिली जात असे. विशेष म्हणजे या स्पर्धेत जो खेळाडू पराभूत होईल त्याला मृत घोषित केले जाई. अर्थात हे फक्त घोषित करायचे म्हणून केले जाई, प्रत्यक्षात मात्र खेळाडूंच्या जीवावर बेतणार नाही याची काळजी घेतली जात असे.
या स्पर्धेतील स्पर्धकांना सर्व प्रकारची आवश्यक ती सुरक्षा पुरवलेली असे. या स्पर्धकांनी जाडजूड कपडे परिधान केलेले असत आणि तोंडावर गॉगल असलेला धातूचा मास्क लावलेला असे. शिवाय स्पर्धकाच्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्या या नेहमीप्रमाणे गनपावडर पासून बनवलेल्या नसत, तर त्या वॅक्स म्हणजेच मेणाच्या बनवलेल्या असत त्यामुळे इजा पोहोचण्याची शक्यता कमीच होती.
ऑलिंपिक खेळाचा हा प्रकार त्याकाळी खूपच लोकप्रिय होता. एक दोन ऑलिंपिक सामन्याच्या वेळी हा खेळ खेळला गेला असेल, पण त्यानंतर हा खेळ ऑलिंपिक सामन्यांतून रद्द करण्यात आला.
शॉट क्लॉक
हा देखील बंदूक द्वंद्वाचाच एक वेगळा प्रकार! यात खेळाडूला तीन सेकंदापेक्षा कमी वेळेत नेम साधता येणे आवश्यक होते. या खेळातही खेळाडूंनी पुरेशी सुरक्षेची दक्षता घेतलेली असे. अंगात धातूचे जाळीदार चिलखत परिधान केलेले असे आणि चेहऱ्यावर धातूचा मास्क. मेणापासून बनवलेली गोळी असली तरी तिचा वेग अफाट असल्याने चुकून गोळी लागलीच तर जखम होण्याची शक्यता होती आणि ह खेळाडू जखमी होत असत. त्यामुळे काही खेळाडू तर गळ्याभोवती देखील धातूचा पट्टा लावत असत. म्हणूनच एका पत्रकाराने या खेळासाठी वापरण्यात येणाऱ्या बंदुकीची गोळी बनवण्यासाठी मऊ मेण वापरले जावे अशी मागणी केली होती.
फ्री फायर
आज फ्री फायर हा एक मोबाईल गेम म्हणून ओळखला जातो, पण कधी काळी या खेळालाही ऑलिंपिकमध्ये स्थान होते. पूर्वी ऑलिंपिक सामन्याच्या वेळी बंदुकीच्या फैरी झाडणे ही एक सर्वसाधारण बाब होती. १८९६ साली अथेन्समध्ये पहिली आधुनिक ऑलिंपिक स्पर्धा भरवण्यात आली तेव्हापासून नेम धरणे हा एक या स्पर्धांचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. १९०६ साली भरवण्यात आलेल्या सामन्यात या प्रकारची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत स्पर्धक खेळाडू एकमेकांच्या पुतळ्यावर नेम साधत. हे पुतळे प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेले असत.
१९०८ सालच्या ऑलिंपिक सामन्यावेळी अमेरिका, फ्रांस, रशिया आणि स्वीडन या चार देशांतील उत्कृष्ट नेमबाजांना आमंत्रणे पाठवून बोलावून घेतले होते. यासाठी एकूण ११ नेमबाज जमले होते आणि त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मेणाच्या गोळीचा नेम धरला.
या द्वंद्वासाठी बनवलेल्या गोळ्या या मेण वापरून बनवलेल्या असल्या तरी या गोळ्याही स्पर्धकांना गंभीर इजा करू शकत होत्या. एका गोळीने एका स्पर्धकाच्या अंगठा आणि तर्जनीच्या मधली त्वचाच फाडली होती. यावरूनही ही गोळी कितपत घातक होती याची कल्पना येईलच. मेणापासून बनवेलेली ही गोळी गनपावडरच्या गोळीसारखीच दिसत असे. त्यामुळे कोणी खोडसाळपणे किंवा अनावधानाने जर या गोळ्यांची अदलाबदल केली तर फार भयावह परिस्थिती निर्माण झाली असती. म्हणजेच वरवर साधा आणि मजेशीर वाटणारा हा खेळ तितकाच घातक होता.
या सगळ्या गोष्टींचा विचार करून या खेळ प्रकारावर बंदीच घालण्याच विचार सुरू होता. इतक्यात पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले आणि जगाचा इतिहासच बदलून गेला. या सगळ्या धामधुमीत बंदूक द्वंद्वाची लोकप्रियताही कमी होत गेली. त्यामुळे हा खेळ ऑलिंपिकमधून हद्दपार झाला.
रायफल शूटींग
आज रायफल शूटींग या खेळाचा ऑलिंपिकमध्ये समावेश होत असला तरी पूर्वीचे हे द्वंद्व आणि आजचे शूटींग यात जमीन अस्मानचे अंतर आहे. पूर्वीच्या काळी खेळल्या जाणाऱ्या द्वंद्वातून प्रतिस्पर्धी खेळाडू विषयी मत्सर, द्वेष, तिरस्कार यासारख्या नकारात्मक भावना निर्माण होण्याची शक्यता होती. शिवाय, हा खेळ एकप्रकारे युद्धाला चालना आणि मान्यता देणाराही ठरला असता. पहिल्या युद्धाचे परिणाम भोगल्यानंतर कुणालाही युद्धाचे समर्थन करण्याची इच्छा उरली नव्हतीच.
मात्र रायफल शूटींग हा प्रकार तसा पूर्णतः सुरक्षित आहे, मानसिक किंवा शारीरिक पातळीवरही यात कोणाला इजा पोहोचवली जाऊ शकत नाही.
ऑलंपिकचे हे बदललेले रूप निश्चितच सकारात्मक आहे. तुम्हाला काय वाटते?